ते माझे घर! ते माझे घर! ध्रु.
आजी आजोबा वडील आई
लेकरांसवे कुशीत घेई
आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर!१
कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर!२
भिंती खिडक्या दारे नच घर
छप्पर सुंदर तेही नच घर
माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर!३
परस्परांना जाणत जाणत
मी माझे हे विसरत, विसरत
समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर!४
मन मुरडावे, जुळते घ्यावे
सुख दुःखाना वाटुन घ्यावे
भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर!५
ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर!६
बलसंपादन गुणसंवर्धन
धार्मिकतेची सोपी शिकवण
अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment