घागरियाच्या छंदा,
एक पाय नाचव रे गोविंदा ! ध्रु.
बालरूप तव इवले इवले
असंख्य डोळे निवले निवले
आनंदाच्या कंदा ! १
नवनीताने वदन माखले
हास्य मुखावर प्रसन्न खेळे
भुललो काम नि धंदा ! २
घराघरातुन तुझेच दर्शन
हवे हवेसे मना बालपण
तुझिया मधे मुकुंदा ! ३
नको नकोसे वसन तनावर
सात्त्विक सुंदर ध्यान दिगंबर
नंदाच्या आनंदा ! ४
रांगत रांगत श्रीहरी येशी
कडेवरी तू नकळत बसशी
सिंहासनी गोविंदा ! ५
बोल बोबडे गाणे झाले
उभे राहणे नर्तन झाले
श्रीहरी परमानंदा ! ६
गोकुळ हे तर सदनों सदनी
माधव मुकुंद नामच वदनी
मनो नभीच्या चंदा ! ७
तहान सरली भूक हरपली
ब्रम्हानंदी लागे टाळी
नमितो बालमुकुंदा ! ८
कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(१९८७ साली बाळकृष्णावर लिहिलेली ही कविता . बहुतेक कुठल्याश्या लहानग्याला पाहून ही कविता सुचली असावी).
My grandson loves this bhavani. Thanks for publishing it. My Ajji sang this to my daughter 32 years ago and now thanks to you I can sing it to my natu 😀
ReplyDeleteBhajan
ReplyDelete