Sunday, May 14, 2017

या देहातच सगळे वसले हे ज्‍या कळले तो ज्ञानी..






ब्रह्मा विष्‍णु आणि महेश्‍वर अशी त्रिमूर्ती घ्‍या ध्‍यानी
या देहातच सगळे वसले हे ज्‍या कळले तो ज्ञानी ! ध्रु.
       वात पित्‍त कफ त्रिदोष जरी ते राखावा त्‍यांचा तोल
       समप्रमाणा महत्‍त्‍व देता मोदाचे येती डोल
       नरतनु सुंदर साधन झाले बनण्‍याला आत्‍मज्ञानी ! १
शैशव यौवन वार्धक्‍य ही ते एका देही अनुभवितो
आज्ञा होता नश्‍वर देहा धरेवरी सोडुन जातो
निजधामाचा अर्थ कळेना शोकी बुडतो अज्ञानी ! २
       जशी भावना विचार तैसा कर्माचा होतो जन्‍म
       सात्त्विक सुंदर भावभावना सद्धर्माचे हे मर्म
       रजोतमाला वेसण घाली तरीच होशी तू ज्ञानी ! ३
भोजन पचन नि विसर्जनाची सांगड घाली तूच पहा
काय नि कितिदा खावे प्‍यावे तूच प्रयोगा करी पहा
मनी शांतता तनी वज्रता परिणामासी घेध्‍यानी !४
       पोटापुरते धन मिळवावे हाव हावरी नको नको
       पचेल तितके सेवत जावे अन्‍नावर वासना नको
       वासुदेवमय विश्‍व वाटता अवघे जगही वाखाणी ! ५
दया क्षमा शांती या भगिनी माहेराला आणाव्‍या
संवादाने आचरणाने सदा सर्वदा सुखवाव्‍या
स्‍वर्ग धरेवर ऐसा आणी नकोस होऊ अभिमानी ! ६
       विवेक आणिक विचार बांधव त्‍याग सोबती घे तिसरा
       जोड तिघांची तुला लाभता हीच दिवाळी हा दसरा
       संतुष्‍टाला सणच सर्वदा सज्‍जन गेले शिकवूनी ! ७
शेती सेवा अथवा करिशी कुठलाही तू व्‍यापार
परिश्रमाला सदा सिद्ध हो जरा न घेई माघार
जशी सचोटी तशी चिकाटी सोन्‍याला चढु दे पाणी ! ८
       मिळते जुळते घेता वाढे तनामनाची श्रीमंती
       कलही त्‍याला सदैव कटकट पळभर ही ना विश्रांती
       अनंत ठेवी तसे राहता सुख शांती येती सदनी ! ९
अंतरातला राम पहाण्‍या ध्‍यानाला तू बैसावे
श्‍वासावरती जपा करावे देहभानहीविसरावे
नरास नारायण जी करते गीता माता उद्धरणी ! १०
       शेवटचा दिस तरी सुखाचा आधी घेई ध्‍यानांत
       शिक्षण वर्तन कथन हिताचे नि:स्‍वार्थी तो निभ्रांत
       जे ज्‍याचे त्‍या परत द्यायचे ठेवावे इतके ध्‍यानी ! ११

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

१५॰१२॰१९८६

No comments:

Post a Comment