जिथून आलो तिथे पोचता यात्रा होते पुरी
जन्म नि मरण ही दोन्ही टोके हाती धरतो हरी ! ध्रु.
मर्यादेतच जगता येते घ्या तर हरिनाम
तळमळ तगमग द्या द्या सोडुन जवळच श्रीराम
ध्यान करावे नाम स्मरावे असार संसारी ! १
आला दिसला गेला विरला कळे न हा गुंता
आधी कोठे मागुन कोठे प्रश्न पडे चित्ता
मी माझे मज शल्य राहते पीडित अभ्यंतरी ! २
देहापासुन देह जन्मला खात्री न ये देता
उपाय ठरतो अपाय केव्हा न ये कुणा सांगता
जीवनरेखा कसा वाढवी कुणीही ध्वनंतरी? ३
हात जोडले मस्तक झुकले उदरी पिशवीत
जाताना कर ते जुळवावे नाम मुखे घेत
सकाळ जन्म नि मरणहि संध्या जीवा ध्यानी धरी ! ४
विकार म्हणजे रोग मोह तो नश्वर देहाचा
विवेक पथ्यच विचार औषध मी श्रीरामाचा
आस न माझी उरो वेगळी भक्त प्रार्थना करी ! ५
किती जगावे मुळी न अपुल्या हाती जरि असले
कसे जगावे गीताईने सुंदरसे शिकवले
देहांतर स्वाभाविक मनुजा ज्ञानी भय ना धरी ! ६
शब्द जोडतो शब्द तोडतो मधाळ मित बोलणे
कौतुक ते भरभरून करता प्रेम लाभते दुणे
रोग जरी प्रारब्धे आला हरि शुश्रुषा करी ! ७
अनंतातुनी अनंताकडे जीवन या नाव
हरि नावाडी पैलतिराला लावतसे नाव
उगमी, मध्ये, विलयातहि नित नामच सोबत करी ! ८
हरिपाठाला गाता गाता आश्वासन लाभे
मनोबोध तो म्हणता म्हणता पाठांतर शोभे
शुभेच्छाच ती तप्ताच्या शिरि शीतल छाया धरी ! ९
हरि नाचवितो तसे नाचता वय वाढत गेले
तन म्हातारे तरुण वासना आश्चर्यच घडले
आपुलकीची दिठी परंतु हरि भक्तावर धरी ! १०
मरणाचे जर कारण जन्मच जन्म वासनेमुळे
सद्गुरुराया पार निखंदुनि टाकी सगळी मुळे
सो s हं मधला अहं घालवी कृपा एवढी करी ! ११
तिथि द्वादशी कडवी बारा सुयोग जुळला खरा
स्वानंदाचा ज्या त्या हृदयी झुळझुळलासे झरा
चरणशरण मी स्वरूपनाथा रामा जवळी धरी ! १२
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.९.१९९६
No comments:
Post a Comment