Thursday, May 11, 2017

भक्तिपथावर चाल माणसा हयगय कसली करू नको..


ज्‍या सत्‍याची पूजा करिशी त्‍या देवा विस्‍मरू नको
भक्तिपथावर चाल माणसा हयगय कसली करू नको! ध्रु.

तळमळ तळमळ निशिदिनि होई सौख्‍य कसे ते गवसेना
मृगजळ भुलवी पुढे पुढे परि धाव मृगाची थांबेना
हाव हावरी करिते फरफट इरेस नसत्‍या पडू नको !

कर्मभोग जरी चुकला नाही स्‍मरण हरीचे सुख देते
जे द्यावे ते तैसे घ्‍यावे प्रेम न का द्यावे वाटे
सुख दुसऱ्याचे मान आपुले लेशहि त्‍सर करू नको !

मनात आली कृती चांगली मुहूर्त वेड्या बघू नको
आधारा दे हात स्‍वये तू अंगचोर तू नू नको
भक्तिभाव जे मनी वाढवी त्‍या हरिभजना मुकू नको !

धन हे येते तैसे जाते गर्वाने तू का फुगशी
हितचिंतक ते आप्‍त खरोखर उत्‍कर्षी का विस्‍मरशी
सत्‍यदेव पूजाच सुसंधी यज्ञचक्र थांबवू नको !  ४

मनोबोध वा हरिपाठ वा अभ्‍यासाला तू घेई
ज्‍योत ज्‍योतिने लागे तैसी जे कळले सांगत जाई
नारायण संकल्‍पा पुरवी संकोचाचे नाव नको !  ५

लाच घेत तो विकला जातो तळतळाट ये गरिंबांचा
या रूपे वा त्‍या रूपे वा झाडा नाही चुकायचा
मार्ग लांब जरि परिश्रमाचा सत्‍याश्रय तू सोडु नको !

कर्ज काढुनी घरात वस्‍तू श्रीमंती छे भीक खरी
श्रीखंडाहुन झोपडीतली मीठभाकरी बरी बरी
स्‍वतंत्र नि:स्‍पृह डरे न कोणा चुकून मिंधा होउ नको !

परद्रव्‍य वा परदारा वा अभिलाषा बाळगू नको
कामक्रोध नरकाची दारे दैत्‍यधर्म अनुसरू नको
नर नारायण धर्मपालने श्रीरामा विस्‍मरू नको !  ८

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

श्री सत्यनारायणावर जुलै १९८२ मध्ये रचलेला "फटका" हा काव्यप्रकार.  

No comments:

Post a Comment