मी कधी कुठे भेटेन प्रश्न मुळी नाही
देहात आपुल्या मनुजा मजला पाही ! ध्रु.
तू वाचत जाई गीता ते चरित्र माझे भक्ता
कर्तव्य आदरे घडता का करावयाची चिंता?
हे जीवन आहे वीरा दीर्घ लढाई !१
अवतरलो कारागारी मी प्रकाश घन अंधारी
बंधनेच तुटली सारी, यमुनाही दोघा तारी
जननीस मुके परि ध्येय विसरलो नाही!२
मृत्यूचे भय मम मामा, त्या धाडियले निजधामा
देहाहुन भिन्नच आत्मा, अंशरूप तो परमात्मा
खेळलो शिशुपणी वृत्ती खिलाडू राही !३
तू वासुदेव हरि गा रे सुखवती सुगंधी वारे
झणि गोकुळात तू जा रे सौंगडी भेटती सारे
जाती न, पाडली खाती ध्यानी घेई !४
कार्यात चिकाटी श्रद्धा तर हरेक होई योद्धा
स्वातंत्र्य लाभते बद्धा सिद्धीची आस न सिद्धा
प्रतिकूल सर्व जे वीरा अनुकुल राही !५
घ्या सहकार्याच्या टिपऱ्या सुटल्याच अडचणी साऱ्या
विघ्नांचा पुरता बोऱ्या भिडताच सदा सत्कार्या
तो अशक्य शब्दच माझ्या लेखी नाही !६
रघुकुलातला जो राम यदुकुलात तो मी श्याम
देहाचे करूनी धाम आत्मा घे क्षण विश्राम
देहोsहं भ्रांती स्वप्नातहि ना काही !७
तू स्मरशी तेव्हा तेथे ध्यानातच तुजला भेटे
अंतर ते सगळे सरते रोमांचित काया होते
गोपाष्टमी अथवा कालाष्टमी ती होई !८
ज्ञानेश्वर आळंदीचा तो एकनाथ पैठणचा
नामदेव पंढरपुरचा तुकयाही त्या देहूचा
साहित्य तयांचे देही करत विदेही !९
दोषांना दुर्लक्षावे गुण तेवढेच उचलावे
का कोणाला निंदावे? वैर ना विकत ते घ्यावे
रे अनेकातला एकोपा मी तो ही !१०
मी माझे सहज गळू दे, तो कर्ता उमज पडू दे
हा काळ सुखे बदलू दे मन खंबीरच राहू दे
प्रतिभा श्रीरामा शब्द शब्द सुचवे ही !११
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment