Saturday, February 17, 2018

तो काळ असाही होता.

तो काळ असाही होता तो काळ असाही होता! ध्रु.

त्या स्वतंत्रता समरात
तळपली निमाली ज्योत
लावुनी पणा निजप्राणा ‘वासुदेव’ गेला होता ! १

हे स्वराज्य गेले गेले
हे शल्य अंतरी सलले
भीमासम गट युवकांचा मनि अग्नी फुलवित होता ! २

यत्ना जधि यश न मिळाले
मन क्षणभर हिंपुटि झाले
बलिदान न वाया जाते शिकविते जनांना गीता ! ३

जरि राख चितेची झाली
ठिणगी परि चेतुनि उठली
सातत्या न पडो खंड वाटले असे भगवंता ! ४

या स्वदेशमुक्तीसाठी
क्रांतिचि ध्वजा उंचविती
नरवीर रत्नहारीचा तो ‘कौस्तुभ’ जन्मत होता ! ५

लव धर्म हातुनी झाला
तो कधी न वाया गेला
पार्थास बोधिले कृष्णे उपदेश बिंबला होता ! ६

सामान्य रयत घाबरली
स्वत्वाते मुकली भुलली
दडपवि मन परकी सत्ता तो काळ असा होता ! ७

प्रभु निद्रित होता चित्ती
ओळखही पटली नव्हती
थर जाड जाड विस्मृतिचा हृदयांवर जमला होता ! ८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:

Post a Comment