रोगी कसला? तूही निरोगी
आरोग्याची गा गाणी
निसर्ग असतो मित्र खरोखर
निसर्गचक्रा वाखाणी! १
श्वसनावरती हवे नियंत्रण
नकोस टाकू तू धापा
पंप मजेशीर तूच चालवी
यंत्र हृदय, यंत्री बाप्पा! २
भय कसले रे सांग मला तू
कर्ता भोक्ता नसशी तू
कडेवरी आईच्या बालक
नको बाळगू तू किंतू! ३
उत्साहाने ऊठ राजसा
पाउल टाकाया लाग
जमेल तैसा वेग वाढतो
विश्वासाने तू वाग! ४
डॉक्टर गुरुजी तू विद्यार्थी
करून दाखव तू प्रगती
सहकाराने विश्वासाने
नातीगोती दृढ होती ! ५
भूक लागणे हे भाग्याचे
थोडे थोडे परि खावे
पचे अन्न ते औषध ठरते
मर्यादेने वागावे ! ६
सावधान! हा तुला इशारा
नियतीने तुजला दिधला
सत्संगाने श्रवणे मनने
मार्ग जाहला तुला खुला! ७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८ ऑगस्ट २००४
No comments:
Post a Comment