शेगावीच्या गजानना। शांत करी माझ्या मना
येऊ दे माझी करुणा। तुला तरी।।१।।
लावी मला नित्यनेम। आचारात भरो प्रेम।
सर्वांचेच असो क्षेम। भाव देई।।२।।
निराशेने ग्रासे मन। कण कण झिजे तन
जीव जाई वेडावून। का न कळे।।३।।
अश्रू नाही तरी दुःख। हृदयास पोळे शोक
काय तुझे हे कौतुक। उमजे ना।।४।।
तुझी दया तुझे ज्ञान। तुझी दृष्टी तुझे गान
तुझे स्मरण सन्मान। अध्यात्माचा।।५।।
निरोगी तू करी मन। निरोगी तू करी तन
सोsहं सोsहं हे स्फुरण। जाणवू दे।।६।।
तुझी पोथी मला गीता। तुझी पोथी मला माता
तुझा हस्त शिरी आता। राहो देई।।७।।
साठविता कुजे द्रव्य। दान देता वाढे द्रव्य
वाहते हे खरे द्रव्य। खरी गंगा।।८।।
आसक्ती हा महारोग। वैराग्यच तुझा योग
भोगूनीच सारे भोग। ज्याचा त्याचा।।९।।
भूक नाही निद्रा नाही। तृषा नाही शांती नाही
विवेकाची जोड नाही। आयुष्यात।।१०।।
वासना ही दुःखमूळ। माझे माझे पोटशूळ
घालवी हे सारे खूळ। मनातून।।११।।
स्वये सोसलासे त्रास। मारत्यास दिला रस
क्षमा कन्या ही औरस। मायबापा।।१२।।
अलिप्तता शिकावी ही।तटस्थता शिकावी ही
योगमाया शिकावी ही। ऐशी उर्मी।।१३।।
सर्वांभूती देव ज्ञान। सर्वांभूती दया ज्ञान
सर्वांभूती एक प्राण। साक्षात्कार।।१४।।
चिलीम ही तुझ्या करी। धूर सोडी ही अंबरी
ऊर्ध्व दृष्टी तशी करी। उपदेशी।।१५।।
दिगंबरा निर्विकारा। धैर्यधरा तदाकारा
मूर्तिमंत हे ओंकारा। नमस्कार।।१६।।
तुझे नाम गजानन। विघ्ने करी निवारण
अंतरी या प्रकाशून। पुढे नेई।।१७।।
चालवी तू उपासना। नित्य बोधी माझ्या मना
सत्याच्याच आचरणा। मला दाव।।१८।।
आत्मनिंदा महापाप। आत्महत्या महापाप
औदासीन्य महापाप। नको नको।।१९।।
तुझी प्रीती निरांजन। तेवो मनी गजानन
विकल्पांना पिटाळून। लाव देवा।।२०।।
प्रसादाचे दिले दान। रामा दिले पदी स्थान
येथ प्रचीती प्रमाण। दिली खूण।।२१।।
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६/२७.२.१९८८
दास डोंगरी राहातो...
ReplyDeleteयातील "बाहतसे" या शब्दा विषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.
संपर्क कसा करावा?
हे काव्य श्रीराम आठवले यांचे आहे आणि ते आता हयात नाहीत. त्यामुळे सांगु शकत नाही. मराठी भाषा तज्ञ लोकांकडून कळू शकते.
ReplyDelete