Sunday, November 20, 2022

घे अशी त्रिमूर्ती ध्यानी..

हा ब्रह्मा म्‍हणजे देह तो जगती आला! आला 
श्रीविष्‍णू पालनकर्ता शिव शासनास सजलेला! ध्रु.  

जल पृथ्‍वी वायु तेज आकाश एक झालेले 
तनु होउन भूमीवरती ब्रह्मा हे आले आले 
विसरतो न जीव महेशा अनुसंधानी तो रमला! १ 

तो पालनकर्ता विष्‍णु शिकवितो न्‍याय अन् नीती 
देहाला सांभाळावे व्‍यसनांनी होई माती
जर कोठे पाय घसरला श्रीशंकर करि शिक्षेला! २ 

‘मी देह न पहिला पाठ’ तो पुन्‍हा पुन्‍हा गिरवावा 
झिजणारे चंदन सांगे तो परोपकारि झिजावा 
आळसे गंजतो देह तो परिश्रमे कमवावा! ३ 

सहकारे कामे होती कलहाने होतो नाश 
स्‍वार्थाने मत्‍सर माजे ये गळ्यात मृत्‍यूपाश
सद्बुद्धि सावरे तोल सद्गुरु आत बसलेला! ४  

तू कशास होसी खिन्‍न उद्योगे सगळे होते 
अपयशेहि लाभे सिद्धी येतसे प्रचीती येथे 
तू सोडी लोभ फलाचा योगेश्वर सांगुन गेला! ५ 

‘मी करतो’ गर्व फुकाचा “करणार नाही” हा हट्ट 
प्रकृती घडविते कार्य भगवंता धर रे घट्ट 
निर्लेप गगन ते कैसे शिकविते धडा सकलांला! ६ 

मन धावतसे बाहेर वैराग्‍ये अंतरि वळवी 
शिव गंगाधरही तुजला प्रेमाने संयम शिकवी 
घे अशी त्रिमूर्ती ध्‍यानी जे कळले सांग जगाला! ७ 

गुरुदेवदत्त तू गाई कर सर्वस्‍वाचे दान 
देता नच सरते वित्त गा माणुसकीचे गान 
गुरुवार असा हा नित्‍य हृदयात हवा ठसलेला! ८ 

कल्‍पना : ज कृ देवधर 
शंब्‍दांकन : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२९.०६.१९८९ 
योगिनी एकादशी (गुरुवार)

No comments:

Post a Comment