सुखासाठी खटपट व्यर्थ व्यर्थ जाते
भुलोनिया मृगजळा हरिण धाव घेते!ध्रु.
भुलोनिया मृगजळा हरिण धाव घेते!ध्रु.
मुळात प्रपंच खोटा
त्यात सुख शोधू जाता -
कण ही न गवसे हाती, निराशाच होते!१
प्रपंच हा नाही माझा
असे केवळ रामाचा
मनी वागविता भाव, वृत्ति शांत होते!२
ईशकृपा करिते काम
आळविता आत्माराम -
शरण गेलिया रामाते कृतार्थता भेटे!३
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७८ (१८ मार्च) वर आधारित काव्य.
प्रत्येक जण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांस वाटत असते व त्याकरिता जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कोणास सुख झाले आहे? आपली लोभाची हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कोणी कधी तृप्त झाला आहे का? प्रपंचच जेथे खोटा तेथे सुख कसले मागता? प्रपंच माझा नाही, तो रामाचा आहे, असे म्हणा म्हणजे झाले. हे दिसण्यास सोपे आहे, पण आचरणात आणण्यास अत्यंत कठीण आहे. ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही. याकरिता रामाला अनन्य भावाने शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावे. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. खरोखर राम तुम्हांस सुखी करील.
No comments:
Post a Comment