Saturday, May 31, 2025

तुला शरण आलो रामा तुझाच मी झालो!

तुला शरण आलो रामा
तुझाच मी झालो!ध्रु.

देह विसराया, 
निर्गुणात जाया
सहवास लाभण्यास 
नाम घेत आलो!१

धरूनिया करी, 
देहातीत करी
विसर पाड वासनांचा 
काकुळती आलो!२

नामरुची दे दे
संतसंग दे दे
तुझा लाभ हाच ध्यास
नामी गुंतलेलो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५२ (३१ मे) वर आधारित काव्य.

मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा व उत्तम भक्त होय. भगवंतप्राप्ती शिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे. जो काळ भगवत्स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. गुरुआज्ञा प्रमाणाचे बीज निर्गुणातच आहे हे लक्षात ठेवावे. देहातीत व्हायला गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे? भगवंत माझा असे म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. भगवंताला शरण जावे व त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्मांचे व शास्त्रांचे सार आहे.

Friday, May 30, 2025

सर्व विसरोनी राम आठवावा!

सर्व विसरोनी राम आठवावा!ध्रु.

अकर्तेपणाने आचरिणे कर्म
तेणे खचित होत आपुलासा राम
भागल्या जिवासी नाम हा विसावा!१

प्रपंचाचा ध्यास कशास जिवास?
आस नव्हे आहे कंठालागि फास
प्रारब्धावरी देह हा टाकावा!२

मनापासुनी हो आठवीता राम
रुचतसे देवा साधन निष्काम
घडोघडी हाचि विवेक करावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५१ (३० मे) वर आधारित काव्य.

Thursday, May 29, 2025

छंद जडला मज नामाचा!

राम माझा, मी रामाचा
छंद जडला मज नामाचा!ध्रु.

स्मरण हेच पुण्य, विसर हेच पाप
विस्मरणे पोळतील खचित त्रिविध ताप
राम हा स्वामी मनाचा!१

संकटे आली तरीही तीहि रूपे राघवाची
यानिमित्ते पर्वणी ये रामनामाच्या जपाची
ध्यास लागो राघवाचा!२

कर्म करिता गुंतवीते, तत्फलाची हीन आशा
प्रभु दुरावे, मन झुरावे हे निमंत्रण सर्वनाशा
तनमने मी राघवाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५० (२९ मे) वर आधारित काव्य.

भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे "मी रामाला विसरलो" हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. कोणत्याही स्थितीत वृत्ती कायम राखणे, हेच योगाचे सार आहे. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. संकटेही आपल्या कर्माचेच फळ असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली, तर ती आपल्याला समाधान देते. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे व भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे; आणि समाधान हा गुणही सर्वांचा तोच आहे.

Saturday, May 24, 2025

भगवंताचे नाम घ्यावे, श्रीरामाचे नाम!

भगवंताचे नाम घ्यावे, श्रीरामाचे नाम!ध्रु.

जिव्हा दिधली जी देवाने
ती लागावी रामकारणे
प्रभुनामांतरि सुधामाधुरी -
नाम सदा सुखाधाम!१

देहावरती प्रेम केवढे
का नामा मग आढेवेढे?
नामाकरिता नाम जपावे -
राहुनिया निष्काम!२

समाधान नामांतरि आहे
राम नाम होउनिया राहे
विकल्प सगळे जातिल विलया -
हसता अंतरि राम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४५ (२४ मे) वर आधारित काव्य.

आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल काय? आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा. जसे तुम्ही देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. अश्रद्धा उत्पन्न झाल्यास आपले पापच आड येते असे समजा व त्यावेळेस नामस्मरण करीत जा. नाम व्यवहाराकरिता उपयोगात आणू नका. नामस्मरण नामा करताच करीत जा, म्हणजेच खरा आनंद तुम्हास मिळेल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू व स्वाभाविक आहे. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे भगवंताचे नाम होय.

Monday, May 19, 2025

तुझे प्रेम लाभू दे, तुझे वेड लागू दे!

तुझे प्रेम लाभू दे
तुझे वेड लागू दे!ध्रु.

मुखी नाम अंतरि राम
हृदय बनो भगवद् धाम
भजन रंगु दे!१

प्रार्थितसे भक्ती रामा
पुरवि पुरवि इतुक्या कामा
नाच नाचु दे!२

राम माउली गे माझे
लडिवाळ तान्हे तुझे
तृप्त होऊ दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४० (१९ मे) वर आधारित काव्य.

घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसे आई व मुलांचे प्रेम असते, तसे भगवंताचे प्रेम लावावे व त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे. असा नियम आहे की, ज्याला आतबाहेर भगवंताचे प्रेम आले, तो भजनामध्ये नाचत असता त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे, ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचे प्रेम लागले, की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. भगवंताचे प्रेम यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. आपण भगवंताचे प्रेम वाढवण्याची कृती करावी, त्याकरिता आपलेपणा, अनुसंधान व सत्संग हेच तीन उपाय आहेत. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. भगवंताच्या नामाला नीति हे पथ्य आहे. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभसाध्य आहे. जो अडाण्यातील अडाणी आहे, त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. मूल जसे आईच्या अंगावर नाचते त्याप्रमाणे आपण भगवंतापाशी मूल होऊन त्याचे प्रेम लुटावे.

Sunday, May 18, 2025

ध्यानि घ्यावे हे नराने वृत्ति कोठे गुंतते!

ध्यानि घ्यावे हे नराने
वृत्ति कोठे गुंतते!ध्रु.

ती स्थिरावो
शांत होवो
हाचि वर मन मागते!१

वृत्ति बदले
जगहि बदले
अंधता ही बाधते!२

राम स्मरणे
शरण जाणे
गूढ सगळे उकलते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३९ (१८ मे) वर आधारित काव्य.

माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे काही खरे नाही. मी सुखी कशाने होईन? हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले, पण या जगात पूर्ण सुख व पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही, त्याबाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो, त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते, आता उरले पन्नास टक्के, त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले. आपली वृत्ति सारखी बदलत आहे आणि जगही सारखे बदलत आहे त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असते. भजन, पोथीवाचन वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या, तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. गाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशीयात्रा घडत नाही, यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना, त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही, आपली वृत्ति भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. वृत्ति स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्ति सारखी राहणे याचे नाव समाधि होय. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान शांति व सुख आहे.

Monday, May 12, 2025

दिसे कसा भगवान? आड जर येताहे अभिमान!

दिसे कसा भगवान?
आड जर येताहे अभिमान!ध्रु.

अभिमानाची वाढे हरळी
गढूळले मन, वृत्ती मळली
देहोऽहं ही भ्रांती करिते जिवालागी बेभान!१

प्रभुनामाची कास धरावी
भगवद्भजनी गोडी यावी
सोऽहं सोऽहं अनुभव येण्या गावे प्रभुगुणगान!२

कोणाविषयी द्वेष नसावा
सर्वांभूती राम दिसावा -
भगवंताचा विसर न व्हावा तारक भाव महान!३

रचयिता  : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३३ (१२ मे) वर आधारित काव्य

वाचेने कोणाचे मन दुखवू नये, व देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. नेहमी सत्य व गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. अभिमानाचे विष जेथे येते तेथे नामाची आठवण ठेवावी. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. तुमचा विसर मला पडू देऊ नका, असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. तो तुमच्या सहाय्यास आल्यावाचून राहणार नाही.

Sunday, May 11, 2025

थोडे वाचावे परी ते कृतीत आणावे!

थोडे वाचावे परी ते कृतीत आणावे!ध्रु.

नको वदाया केवळ उक्ती 
कृती घडविते जगती प्रगती 
वेदांताचे मर्म आचरणि सहजपणे यावे!१

स्वतःस शिकवा जग सुधारले 
दुर्गुण विसरा जग सुखावले
कृतीविना जे बोल बुडबुडे जलात समजावे!२

कर्म घडू दे नको फलाशा 
सेवा करता सुटु दे आशा
कर्मफुलांनी पूजन करूनी धन्य धन्य व्हावे! 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३२ (११ मे) वर आधारित काव्य.

थोडेच वाचून समजून घ्यावे व ते कृतीत आणावे, नाही तर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. म्हणून नुसते वाचितच बसू नये. थोडेच वाचावे पण कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे.  जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वतःला सुधारा की त्यामानाने जग सुधारेलच. वस्तु ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुख-रूप मानतो. कर्मास सुरुवात करताना, फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते; कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे उधारीचा नाही असे सर्व संतांचे सांगणे आहे.

Saturday, May 10, 2025

देह रामाचा, मन रामाचे आठी प्रहरी वद वद वाचे!

देह रामाचा, मन रामाचे
आठी प्रहरी वद वद वाचे!ध्रु.

भगवंताची उपासना
दूर करिते यातना
येता जाता उठता बसता -
नाम घ्यावे राघवाचे!१

शीण आला जरि तना
जोर करिती वासना
वादळा शमवावयासी -
ध्यान करणे राघवाचे!२

होणारे ते चुकत नाही
तदिच्छेने घडत राही
भक्ति याविण वेगळी ना -
चरण स्मरणे राघवाचे!३

राम देता राम घेता
राम आहे भोवता 
त्याविना जगती न कोणी -
होउनी निःशंक नाचे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३१ (१० मे) वर आधारित काव्य.

Thursday, May 8, 2025

जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची!

जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची!ध्रु.

रामाचे नित स्मरण असावे
देहांतरि मन नच गुंतावे
विषयांचे भय सरेल घडता कृपा रामचंद्राची!१

जिथे जिथे वावरते वृत्ती
तिथे तिथे देवाची वस्ती
शरण गेलिया श्रीरघुनाथा वार्ता नुरे भ्रमाची!२

रामाविण सुख कशात नाही
अनुभव कथिती असे प्रत्यही
मन गुंताया राघवचरणी धार धरा नामाची!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२९ (८ मे) वर आधारित काव्य.

शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातील एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे तसे, आजारामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे व त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ति आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्ती शिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ति आड आल्याशिवाय राहात नाही. हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर.

Wednesday, May 7, 2025

देव आणि भक्त यात आड येत मान

काय ऐसे जवळी, ज्याचा अभिमान?
देव आणि भक्त यात आड येत मान!ध्रु.

देहबुद्धि नाचवीते 
देहबुद्धि भ्रमवीते 
देह नव्हे आपण याचे उरे कुठे भान?१

म्हणो जग भला, भला 
म्हणो दे वा वेडा खुळा 
देवाचरणी वहावा मान - अपमान!२

देव कर्ता करविता 
देव एकच चालवीता 
गुरुकृपा देते शिष्या विवेकाचे दान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२८ (७ मे) वर आधारित काव्य.

मानाला कारण अभिमान होय. हा अभिमानच भगवंताच्या व आपल्यामध्ये आड येतो. खरे पाहता अभिमान बाळगण्यास आपल्याजवळ असे आहे तरी काय शक्ती? की पैसा? की कीर्ती? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत.   हा अभिमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धि ही देहबुद्धि नाहीशी झाली पाहिजे. चांगले, वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावा. ही देहबुद्धि, हा अभिमान जायला सद्गुरुचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी, मी त्यांचा आहे असे म्हणावे. सद्गुरु तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशांचे ऐकण्यात विशेष आहे. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथाच्या वाचनाची गरज आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे, हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार?

Friday, May 2, 2025

प्राणमोल द्यावे गावे - ॐ राम कृष्ण हरि!

 ॐ

प्राणमोल द्यावे गावे -
ॐ राम कृष्ण हरि! 
ॐ राम कृष्ण हरि!ध्रु.

विकार जे दंगा करती 
पुरी पुरी फजिती करती 
चला करू गुरुचा धावा 
ॐ राम कृष्ण हरि!१

विसंगती जेथे तेथे 
मनी येत भलते सलते 
चित्तशुद्धि होण्या गाऊ 
ॐ राम कृष्ण हरि!२

वस्त्र वासनांचे फिटू दे, 
अहंसर्पिणी ती मरु दे 
ममत्व ते सरण्या गाऊ 
ॐ राम कृष्ण हरि!३

सहा अक्षरी हे नाम 
सफल करी मंगल काम 
प्रेमदीप शिकवी जप हा 
ॐ राम कृष्ण हरि!४

दत्त अंश स्वामी माझे 
विश्वरूप स्वामी माझे 
शिरोधार्य आदेशच हा 
ॐ राम कृष्ण हरि! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९ जानेवारी १९९४

Thursday, May 1, 2025

नामस्मरणे मन निर्मळ होते

नामस्मरणे, नामस्मरणे मन निर्मळ होते 
गंगाजळ बनते!ध्रु 

तम मावळते 
सत्त्व उगवते 
बुद्धि शुद्ध होते!१ 

स्वार्थ संपतो 
परार्थ सुचतो 
"मी तूपण" सरते!२ 

नाम मला दे 
असे जो वदे 
त्या शुचिता वरिते!३ 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२२ (१ मे) वर आधारित काव्य 

दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय मनुष्याच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले असता भगवंत वश होतो हे काही खरे नाही. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. उपवास घडावा याची मौज आहे, ती उपवास करावा यामध्ये नाही. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतपासून दूर नेतात पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्यांनी विचारले तर, "तुझे नामच मला दे" हे त्याच्याजवळ मागणे याचे नाव निष्कामता होय. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास! कृपा करील रघुनाथ खास..