थोडे वाचावे परी ते कृतीत आणावे!ध्रु.
नको वदाया केवळ उक्ती
कृती घडविते जगती प्रगती
वेदांताचे मर्म आचरणि सहजपणे यावे!१
स्वतःस शिकवा जग सुधारले
दुर्गुण विसरा जग सुखावले
कृतीविना जे बोल बुडबुडे जलात समजावे!२
कर्म घडू दे नको फलाशा
सेवा करता सुटु दे आशा
कर्मफुलांनी पूजन करूनी धन्य धन्य व्हावे!
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३२ (११ मे) वर आधारित काव्य.
थोडेच वाचून समजून घ्यावे व ते कृतीत आणावे, नाही तर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. म्हणून नुसते वाचितच बसू नये. थोडेच वाचावे पण कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वतःला सुधारा की त्यामानाने जग सुधारेलच. वस्तु ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुख-रूप मानतो. कर्मास सुरुवात करताना, फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते; कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे उधारीचा नाही असे सर्व संतांचे सांगणे आहे.
No comments:
Post a Comment