ॐ
॥श्रीकृष्ण॥
फलश्रुती
हरिगीतापाठ नित्य गाता गाता
बोले कृष्णमाता भाविकाशी । १
एकेक अध्याय कळू लागे थोडा
भावार्थाचा पेढा गोड लागे । २
निरोगी ती काया निरोगी ते मन
साधू लागे ध्यान साधकाला । ३
स्वकर्म करावे नित्य जीवेभावे
गोविंदा अर्पावे वाटतसे । ४
मीच तो अर्जुन मीच तो माधव
ऐसा ऐक्यभाव वाढू लागे । ५
वाचावा हा पाठ लिहावा हा पाठ
विवरावा पाठ देवळात । ६
देह हे देऊळ आत्मा हा गोपाळ
नाम घेता काळ अनुकुल । ७
भावसाक्षरता भाषणी मृदुता
अंतरी शांतता सर्वकाळ । ८
स्वरुपानंदांनी घेतलीसे सेवा
दिला गोड मेवा स्वानंदाचा । ९
कृतज्ञ श्रीराम जोडूनीया हात
वळे आत आत सावकाश । १०
No comments:
Post a Comment