Friday, December 27, 2013

क्षेत्र गोंदवले



क्षेत्र गोंदवले 

नामे दुमदुमले रसरसले
क्षेत्र गोंदवले ॥ ध्रु. ॥

पंढरीच्या वाटेवर हे
उभे कधीचे आहे हे
भावे गहिवरले ॥ १ ॥

माणदेशचा परिसर हा
मळा भक्तीचा फुले पहा
पीक गच्च दाटले ॥ २ ॥

समर्थ पुनरपि अवतरले
नामरंगि हे रमलेले
पुण्य फळा आले ॥ ३ ॥

लहानसे जरी हे गाव
शबरीचा भोळा भाव
रामहि विसावले ॥ ४ ॥

राम राम सीताराम
राम राम जय जय राम
घनगर्जन चाले ॥ ५ ॥

Monday, December 16, 2013

गाऊ आरती आरती सद्गुरुरायाची - गुरुदेव दत्त



गाऊ आरती आरती सद्गुरुरायाची
नुरेल भक्ता कसली चिंता जन्ममरणाची! ध्रु.

सुरवरमुनिजनयोगि निरंतर दत्ताते ध्याती
वर्णन याचे कठिण कठिणतर श्रुति म्हणती नेति
हारपता मन नुरेल वार्ता भेदाभेदाची!१

सद्भावे साष्टांगे नमिता दारी उभा ठेला
प्रसन्न होउनि सद्गुरुराये आशीर्वाद दिला
सबाह्य अभ्यंतरी दत्त मी जाणिव नित्याची!२

वाचा आता वरे मूकता, डोळेही भरले
अतिपावन सद्गुरुचरण मी हृदयावर धरले
पूजा ऐसी घडली हातुनि दत्तात्रेयाची!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

मन माझे रंगो दत्तात्रेयाच्या भजनी - गुरुदेव दत्त



भजनाच्या अंती सद्‌गुरुपाशी हेच मागणे -

मन माझे रंगो - दत्तात्रेयाच्या भजनी!ध्रु.

वीणा सुंदर हाती घ्यावी 
जगताची जाणीव सरावी 
जनी असो वा विजनी!१

मृदुंग घुमू दे, झांज वाजु दे
स्वरतालांचा मेळही जुळं दे
दत्तनाम नित वदनी!२

"औदुंबर जणु घर मग माझे -
दत्तराज आसनी विराजे 
प्रचीती यावी अशनी, शयनी!३

भस्म ललाटी शांतवीत मन 
अश्रू नयनी - आत्मनिवेदन 
सद्‌गुरु रमोत श्रवणी!४

रुद्राक्षांची गळ्यात माळ 
सहजच शमवी दाहक जाळ 
मन पवनासह पोचो गगनी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
( श्री गुरुदेव दत्त)

दत्ताचे ध्यान लागले - गुरुदेव दत्त


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - गुरुदेव दत्त


Sunday, December 15, 2013

दत्तराज गुरुवरा दर्शने कृतार्थ आम्हा करा - गुरुदेव दत्त



"देव भावाचा भुकेला" त्याला भक्ती द्यायची आणि जिंकून घ्यायचे. संतांच्या हृदयी असणारा भगवंताविषयाचा उत्कट भाव अत्युत्कट असतो - साधकालाही हा भक्तिभावच महत्त्वाचा वाटतो. त्याची दर्शनाची भूक अतितीव्र होते. तो म्हणतो - 

+++++++

दत्तराज गुरुवरा,
दर्शने कृतार्थ आम्हां करा!ध्रु.

भक्तिभाव द्या ऐसा उत्कट 
नाममात्र ही नुरेल संकट 
कोटिकोटि वंदन तुम्हाला - 
दीनजनां उद्धरा!१ 

जेथे जेथे मन हे जाईल 
तेथे तेथे तुम्हास पाहिल 
अन्यन्यभक्ती, पूर्ण विरक्ती
द्या हो द्या यतिवरा!२ 

गुरुगीताही गाता गाता 
सदेहपणी लाभेल मुक्तता - 
द्या जिज्ञासा, धीरही द्या द्या 
प्रार्थितसे गुरुवरा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्री गुरुदेव दत्त)

अतिथि रुपातुनी असा प्रकटशी तू माझ्या सदनी - गुरुदेव दत्त


 

परमेश्वर भक्ताला कोणत्या स्वरुपात दर्शन देईल कांही सांगता येत नाही. भाविक भक्ताला 'अतिथि' मध्येंहि देव दर्शनाचा लाभ होतो. तो अतिथिदेवांना हात जोडून भारावलेल्या स्वरात म्हणतो -

+++++++

अतिथिरुपातुनी असा प्रकटशी - 
तू माझ्या सदनी!ध्रु

नमनासाठी हात जोडता 
भूदेवाचे स्वागत करता 
तुझ्यात मी अन् मदंतरी तू 
जाणवते तत्क्षणी!१

काय पामरे तुजला द्यावे 
शरण जाउनी तुझेच व्हावे 
धवलचंद्रिका हृदयी प्रकाशे 
गेलो मी न्हाऊनी!२

प्रेमे दिधले हसत सेविले 
दयाघना मज अंकित केले 
तहान शमली, क्षुधा हरपली 
मी नित्याचा ऋणी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्री गुरुदेव दत्त)

ठेविला पदकमली माथा - गुरुदेव दत्त


भक्ताला अंतरंगातील मलीनता तीव्रतेने जाणवत असते. ते निर्मळ होण्यास देवाने साह्य करावे असे त्याला उत्कटतेने वाटते म्हणून तो भाववेगाने म्हणतो..

++++++

गुरुराया, दत्ता ठेविला पदकमली माथा!ध्रु.

आशा बेडी वेगे तोडी 
सोडिव सगळी अवघड कोडी 
म्हणुन आळवित वेळोवेळी 
पूर्णा श्रीमंता!१

मी पण माझे पूर्ण सरु दे 
कुवासनांचे वादळ शमु दे 
म्हणुनि वाहतो या गीतातुनि 
मंत्र -पुष्प-अक्षता!२

वैराग्याची ध्वजा उंचवी 
अवजड भारहि तूच पेलवी 
चराचरावरि चालतसे नित 
गुरो तुझी सत्ता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्री गुरुदेव दत्त)

Saturday, December 14, 2013

"दत्तगुरुंची माया मस्तकी औदुंबर छाया" - गुरुदेव दत्त

दत्तगुरुची माया
मस्तकि औदुंबर छाया!ध्रु.

शय्या भूमी, दिशा पांघरुण
'दत्त, दत्त' मुखी नामोच्चरण
विभूति रक्षितसे काया!१

रुद्राक्षांची कंठी माळा
तेज चढविते तीच तपाला
तन लागे डोलाया!२

किती नमावे, कितीदा ध्यावे
गीती गावे, मनी भरावे
पद लागति नाचाया!३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

"दत्तगुरु सर्व काही मज देतो" - गुरुदेव दत्त

सर्व काही देतो मज दत्तगुरु
जगदुद्धारास्तव अवतारु!ध्रु.

काखे झोळी, पुढे श्वान
सानासवे होती सान
ते अनाथ - दीना आधारु!१

भूत-प्रेतबाधा सरे
याचसाठी त्यास स्मरे
मग नित्यानंद चित्तात भरु!२

कमंडलुतील जल
विकारांस शमविल
गुरुमहिमा गायनि उच्चारु!३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, December 13, 2013

"दत्त हृदयी, दत्त हृदयी, दत्त हृदयी बैसले" - गुरुदेव दत्त

दत्त हृदयी दत्त हृदयी दत्त हृदयी बैसले
चित्त ध्यानी चित्त ध्यानी चित्त ध्यानी रंगले!ध्रु.

ज्ञान वैराग्यास येथे आश्रयो लाभला
आत्मविद्या मुक्त येथे भोगताहे सोहळा
लक्षदीपक एकवेळी अतरंगी तेवले!१

जनि जनार्दन साक्ष येथे अनुभवाने लाभते
विश्वसंचारात दृष्टि व्यापकासी देखिते
मिटुनि लोचन श्रीगुरुसी पाहिले, पाहिले!२

स्तवन करण्या शब्द अपुरे जाणवे, जाणवे
मौनपालन क्षण न मजला साहवे, साहवे
बोबडे वच म्हणुनि काही हृदय वेडे बोलले!३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले. 

"तटतटा तुटत भवबंध दत्तराजाचा लागे असा छंद" - गुरुदेव दत्त

दत्तराजाचा लागे असा छंद
तटतटा तुटत भवबंध! ध्रु.

आवडी साठली पोटी
गुरुनामची मग ये ओठी
देह नाचे होउनी बेबंद!१

संजीवन स्पर्शी ऐसे
लोहास स्पर्शिले परिसे
अनुभवा येत आनंद!२

जधि प्रश्न उठतसे कोsहम्
डमरुतुनि उत्तर सोsहम्
मग पंडित हो मतिमंद!३

गुरुभक्तिवेल सरसरली
फळीफुली फुलोनी आली
चहुदिशा दरवळे गंध!४

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

"दत्त दत्त दत्त ध्यास लागला जीवा" - गुरुदेव दत्त

दत्त दत्त दत्त ध्यास लागला जिवा
या जिवास सद्गुरु भेटवी शिवा! ध्रु. 

लागला तुझा लळा
अंतरी फुले मळा
पुष्पहार गुंफण्यास घेतला नवा!१

तुझ्या स्मृतीत रंगलो
तीर्थरुप जाहलो
भक्तिमधुर विसरवी तत्क्षणी भवा!२

तूच शब्द सुचविले
भाव त्यात ओतले
गायनात भक्तिगंध वाटतो हवा!३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले. 

Thursday, December 12, 2013

गुरुविण कोण करी सांभाळ - गुरुदेव दत्त


गुरुविण कोण करी सांभाळ !ध्रु


गुरुमाऊली, गुरुसावली
पथिकालागी गुरु वाटुली
माता लाजे ऐसी असते, गुरु माता स्नेहाळ!१

सोऽहंची अंगाई गाते
हलक्या हाते ती थोपटते
चंदनाहुनी शीतल भासे, मन नुरते ओढाळ!२

दातेपण हृदि असे संचले
औदार्यच वस्तीला आले
ब्रह्मरसाचा तिचिया राज्यी, आठी प्रहर सुकाळ!३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

"अनसुयेचे भाग्य उजळले ब्रह्मा विष्णु शिव घरीही आले" - गुरुदेव दत्त


अनसूयेचे भाग्य उजळले 
ब्रह्मा विष्णू शिव घरी आले!ध्रु.

ही तर माझी गुणी लेकरे
वत्सल धेनू जणू हंबरे
मधुर रुदनस्वर कानी भरले!१

दिव्यत्वाचा स्पर्श क्षणाला
कालगतीचा ठेका चुकला
जननीपद साध्वीस लाभले!३

अमृतकिरणे दृष्टी वर्षते
मंगलगीते माता गाते
सुदैव सहजची गाली हसले!३

नक्षत्रे या घरात आली
याही मासी ये दीपवाळी
बघता बघता ध्यान लागले!४

- श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Wednesday, December 11, 2013

"दत्त गुरुंच्या खडावा, माझ्या मनीचा विसावा" - गुरुदेव दत्त

माझ्या मनीचा विसावा,
दत्तगुरुंच्या खडावा!ध्रु. 

आसवांची फुले झाली
भावभरे ती वाहिली
सोsहं अनाहतनाद, तनामनात घुमावा!१

चारी वेद श्वान झाले
अनुसरणी रंगले
लीनभाव ऐसा काही साधकास प्राप्त व्हावा!२

गुरुपदे पडती जेथे 
मृत्तिका मी व्हावे तेथे
सेवा घडण्या हातून, यावा अंतरी ओलावा!३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले 

"दत्त नाम या मुखात सतत राहु दे" - गुरु देव दत्त

दत्तनाम या मुखात सतत राहु दे 
मिटल्या नयनात रुप मधुर हासु दे!ध्रु. 

चरण चालु देत सदा 
मन नमिते दत्त पदा
त्यागातच सौख्य श्रेष्ठ नित्य लाभु दे!१

'सोs हं' ला मी स्मरता
विश्वरुप होत स्वतः
श्रीगुरुस भावभरे क्षेम देऊ दे!२

श्रद्धा तर कल्पतरु
अंतरात वसवि गुरु
पायघड्या देहाच्या पंथि पसरु दे!३

दर्शनसुख नाम देत
परब्रह्म ये कवेत
दास्याने दत्तासी हृदयि दडवु दे!४ 

- श्रीराम बाळकृष्ण आठवले 

"दत्त दयाघन, दत्त दयाघन" - गुरुदेव दत्त

दत्त दयाघन, दत्त दयाघन, वृष्टि कृपेची करा !ध्रु. 
चातकापरी तृषार्त आम्ही
रंगरंगलो सद्गुरु नामी
अमृतमय किरणांची धारा शीघ्र आम्हांवर धरा !१

सोsहं बोधा चित्ती ठसवा
'एकं सत्' वदनातुन वदवा
नवनीताहुन मृदुलमृदुलतर अंत:करणे करा !३

जगदाधारा विश्वाकारा
खुले करा हो मुक्ति द्वारा
वात्सल्याने आम्हा बालका क्षणभर हृदयी धरा !४

- श्रीराम बाळकृष्ण आठवले 

मी बांधीन स्वरपूजा - "गुरुदेव दत्त"

येत्या सोमवारी "दत्त जयंती" आहे.  त्यानिमित्त "गुरुदेव दत्त" या "ओंकार संगीत साधना" ने सादर केलेल्या कार्यक्रमातील गाणी रोज या ब्लॉगवर अपलोड करत आहे.  गाणी अर्थातच माझे वडील कै. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेली आणि निवेदन ही त्यांचेच.


वंदन घे घे गुरुराजा, बांधिन स्वरपूजा
मी बांधिन स्वरपूजा!ध्रु.

गानकलेचा अमोल ठेवा
तू सोपविला मज गुरुदेवा
शब्द अडे माझा!१

विविध राग रागिण्या लाभल्या
सूरसागरा सरिता आल्या
उदार गुरुराजा!२

विविध भावना या शब्दांकित
अनुभविताना तनु रोमांचित
कंपित स्वर माझा!३

ऋण राहू दे असे मस्तकी
कृतज्ञतेची करुन पालखी
मिरविन गुरुराजा!४

रचयिता ; श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, November 5, 2013

रंगभूमिदिन.


संगीतं वादनं नृत्यम्
संवादः स्वगतं तथा ।
एभिः समृद्धशीले हे
रंगभूमे नमोऽस्तुते ॥

अर्थ : संगीत, वादन, नृत्य, संवाद तसेच स्वगत या अंगांनी परिपूर्ण असणार्‍या हे रंगभूमी तुला आमचा नमस्कार असो.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, November 1, 2013

दिवाळी आली.

स्वागतं दीपमाले ते
अंतर्बाह्यं प्रकाशय ।
वन्दे त्वां सादरं देवी
त्वं लक्ष्मीस्त्वं सरस्वती ॥

अर्थ : हे दीपावली तुझे स्वागत असो.  तू बाहेर प्रकाश पाडतेस आता आमची मनेही उजळून टाक.  साक्षात लक्ष्मीरूप आणि सरस्वतीरूप असलेल्या तुला (देवीला) मी आदराने वंदन करतो.  

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Sunday, October 20, 2013

स्वामी स्वरुपानंद, पावस यांच्यावर लिहिलेली काकड आरती..

स्वामी स्वरुपानंद, पावस यांच्यावर कै. श्रीराम आठवले यांनी लिहिलेली काकड आरती त्यांच्याच आवाजात

Saturday, October 5, 2013

घटस्थापना

घटस्थापना

आदौ घटं स्थापियत्वा
देवीं दुर्गां स्मरेततः ।
अरीणां विषये भक्त्याम्
दाक्ष्यं नित्यं अपेक्षितम् ॥

अर्थ : प्रथम घटस्थापना तर करायची देवी दुर्गेचे स्मरण करीत राहायचे भक्तीचे क्षेत्रच असे आहे की साधकाने छुप्या शत्रुंपासून नित्य सावधच असायला पाहिजे.  नवरात्र जागवायचे ते याचसाठी.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, September 29, 2013

स्मरणम्

१९८५ मध्ये पितृपक्षानिमित्त तरुण भारत मधे छापून आलेले माझ्या वडीलांनी लिहिलेले हे सुभाषित. सध्या चालु असलेल्या पितृपक्षानिमित्त.....

स्मरणं पूर्वसूरीणाम्
साधकः सफलो भवेत् ।
कृतज्ञश्च यत्नशीलः
प्रगतो विजयी भवेत् ॥

अर्थ : आपल्या कुळातील आजवर होऊन गेलेल्या पूर्वजांचे पुण्यस्मरण केल्यानेच साधक धन्य होईल. कृतज्ञ आणि यत्नशील असा तो त्याच्या मार्गावर बराच पुढे जाईल आणि विजयीही होईल.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Sunday, September 15, 2013

गणपतीच्या गोष्टी - गोष्ट चौथी

गणपतीच्या गोष्टी - गोष्ट चौथी
लेखक आणि वाचक - कै. श्रीराम आठवले

Thursday, September 12, 2013

गोष्टी गणपतीच्या - गोष्ट तिसरी


गणेश! गणपती! गणनाथ! 

कोणतेही नाव उच्चारा ना! 
राहतोच तो आपल्या डोळ्यांपुढे उभा! 
भव्य मस्तक! बारीक पण लुकलुकते डोळे! 
इकडे तिकडे हलणारी सोंड! विशाल असे उदर! 
झळाळणारा पीतांबर! डोळे दिपविणारा रत्नजडित सुवर्ण मुकुट!
कुणालाही अडकवून ठेवणारा पाश!
विघ्नांवर तुटून पडणारा तळपता परशू! 
पांढरा शुभ्र टपोरा मोदक! आश्वासन देणारा डौलदार पंजा! 
अहो वर्णन तरी कसे करायचे गजाननाचे? 
मनामनांचा स्वामीच आहे हा श्रीगजानन! 
बाप्पा हे तर अगदी खेळीमेळीचे संबोधन! 
असा गणपती करील ते आपल्या कल्याणाचेच 
असा विश्वास असतो गणपती भक्तांचा! 
लेखन कलेचा ओनामा करून देतो हा गणपती! 
जो गणाधीश आहे तो गुणाधीश असणारच नव्हे का? 
तर मिटाना आपापले डोळे आणि आणा ध्यानात गणेशाचे रूप-स्वरूप आनंद लुटा आता अमूप!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोष्टी गणपतीच्या)

गणपतीच्या गोष्टी - गोष्ट दुसरी.


गोष्टी गणपतीच्या - गोष्ट पहिली.





अरे बनविता माझी मूर्ती किती रंगता बाबांनो 
गणपती बाप्पा लय आवडता, कळते माया पोरांनो 
मंगलमूर्ती गाता कीर्ती शब्दच फेर जसे धरती 
माती पाणी तेज पोकळी परस्परांना सावरती 
पाण्याचा ओलावा सरला तरीहि भक्तीने भिजला 
मूर्ती आली आकाराला पहा कशी, दाटला गळा 
जडणघडण करताना असली काळिज जे लकलक करते 
श्रीगजानन जय गजानन मलाच ओळखता येते 
आनंदाचे नाव मोरया चिंता गेल्या विलयाला 
चिंतामणी आणू या आपण परिसर गंधे परिमळला 
अमूर्त आले आकाराला आगळाच हा आनंद 
ब्रह्मा जो सृष्टीचा कर्ता त्याचा धरला का छंद 
बाप्पा या ना सदना लवकर, उठा उचलतो हातात 
वेल जपतसे फुला तसे हो हळवेपण या चित्तात 
आनंदाचे आसू झरती श्रावणझड ही थांबेना 
लगीन लाजे असली घाई, मलाही हासू आवरेना 
मूर्ती हसली, मूर्तिकारही निरोप देता रडवेला 
ग्राहकराजा कृतज्ञ मोठा मूर्ती घेता गलबलला 
सांभाळावे एकामेका नकळत झाला संस्कार 
गणपती बाप्पा मूर्ती तुमची तुमच्यावाणी दिलदार 
अशा ओळी वीस, एकवीस दुर्वा घ्या 
आपलेच घर बाप्पा, घरात या आम्हा घ्या!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
#गोष्टी गणपतीच्या

Wednesday, September 11, 2013

"मागणे श्री गणेशाला"



अण्णांनी (कै. श्रीराम आठवले) लिहिलेले व अण्णा आणि आई यांनी म्हटलेले "मागणे श्री गणेशाला" हे गणपती स्तोत्र.

मंगलमूर्ती गजानना रे प्रभात समयी उठवावे 
सिद्धिविनायक हेरंबा देहशुद्धिला  प्रेरावे 
हे विद्याधर मोरया शुचिर्भूत मी नित व्हावे 
श्री गणनाथा आचार्या अथर्वशीर्ष ही मज यावे 
गणाधीश तू दासाचा संघिकपण अंगी यावे 
सिंदुरचर्चित हे बाप्पा सूर्योपासक बनवावे 
मोदकप्रिय हे शिवकुमरा अन्नब्रह्म हे ठसवावे 
हे लंबोदर विघ्नहरा मन माझे सुस्थिर व्हावे 
अनादि तैसा अनंत तू इथे तिथे दर्शन द्यावे 
चिंतामणि तू परमेशा आत मला बघता यावे 
शिवकुमरा हे शुभंकरा कार्य विधायक घडवावे 
समाजपुरुषा हे देवा मी माझे विलया जावे 
श्रोता वक्ता लेखक तू सार वेचता मज यावे 
ब्रह्मरसाचा मोदक दे उदात्त उन्नत मन व्हावे 
विवेकशुंडा कशी हले सूक्ष्मदृष्टीचे भान हवे 
लंबोदर पीतांबर हे संघटनेचे सूत्र हवे 
हे सुखकर्त्या ओंकारा सोसाया सामर्थ्य हवे 
भालचंद्र हे योगींद्रा अवघड ते सोपे व्हावे 
एकदंत हे वरदात्या जिज्ञासूपण पुरवावे 
मनरमणा हे महोत्कटा विश्वात्मक मज बनवावे 
राम वाहतो या दूर्वा अध्यात्मी रमता यावे 

।।मंगलमूर्ती मोरया।।
  

Monday, September 9, 2013

"गणपतीच्या गोष्टी"

आज गणेश चतुर्थी त्यानिमित्त ब्लॉगवर रोज अपलोड करत आहे कै. श्रीराम आठवले यांनी लिहिलेले "गणपतीच्या गोष्टी" त्यांच्याच आवाजात. 

Thursday, September 5, 2013

शिक्षक दिन.

शिक्षक दिन 

पाठशालां गृहं मत्वा
शिष्ये स्निह्यति मातृवत् ।
चारित्र्यनिर्मितौ तज्ज्ञः
शिक्षकः कौतुकास्पदः ॥

अर्थ : शाळा आपले घरच असे समजून शिक्षक शिष्याला अपत्य समजून मातेचे प्रेम देतात.  विद्यार्थ्यांचे चारित्र्य निर्माण करण्यात तज्ज्ञ असे शिक्षक नक्कीच कौतुकास पात्र आहेत.  

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Thursday, August 1, 2013

लोकमान्य पुण्यस्मरणम् !

निर्भयः सत्यवादी च
पत्रकारो धुरंदरः ।
कर्मयोगी तपो त्यागी
तिलक स्तिलकोपमः ॥

अर्थ : अत्यंत निर्भय असणारे, सत्य तेच बोलणारे, धुरंदर असे पत्रकार शिवाय कर्मयोगी, तपस्वी, त्यागी अशा टिळकांना उपमा टिळकांचीच.  त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. 

Monday, July 22, 2013

सद्गुरु महिमा


गुरु: सत्त्वं गुरुस्तत्त्वम्
गुरु: सर्वत्र विद्यते ।
विना गुरुकृपां केन
प्राप्तं ज्ञानं कुतः कदा ॥


अर्थ : (गुरु कोणी एकच व्यक्ती नव्हे तर) गुरु सत्त्व आहेत, गुरु हेच सनातन तत्त्व आहेत. गुरु सर्वकाल आणि सर्वत्र आहेत. गुरुकृपेविना कोणाला कधी आणि कोठून आत्मज्ञान प्राप्त झाले आहे?  

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, July 9, 2013

आषाढस्य प्रथम दिवसे - अर्थात महाकवि कालिदास स्मरण.

आज आषाढाचा पहिला दिवस. १९८४ साली लिहिलेले आणि  तरुण भारत मध्ये छापले गेलेले हे सुभाषित

’आषाढस्य प्रथम दिवसे’ मेघदूतं पठामः
वारंवारं कविकुलगुरुं कालिदास स्मरामः ॥
यस्य प्रज्ञा खलु भगवती, लेखनं भावगर्भम्
नाट्यं, काव्यं मनसि स्वनितं तं कथं विस्मरामः ?

अर्थ :  आज आषाढाचा पहिला दिवस.  चला मेघदूत वाचू.  पुन्हा पुन्हा कवि कुलगुरु कालिदासांचे स्मरण करु.  त्यांची प्रज्ञा खरोखरीच ऐश्वर्यशालिनी आणि लेखन भावसमृद्धच.  कालिदास म्हणताच मनात नाट्य,  काव्य ध्वनित होऊ लागते. त्याला आपण कसे विसरु शकणार. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, April 19, 2013

श्री रामचंद्र गुणगान

२००१ साली माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि श्री शिधये यांनी प्रकाशित केलेले हे काव्य परत देत आहे दोन ओळींच्या प्रत्येक कडव्यात पहिली ओळ श्रीराम गुणवर्णन असून दूसरी ओळ जपमंत्र आहे एकदा हे काव्य वाचल्यावर एक माळ जप आपोआप होतो काव्य गेय असून छोट्या वा मोठ्या समूहात एकत्रित गायल्याने आनंदपूर्ण जप सहज होतो

रामचंद्र गुणगान (ध्वनिमुद्रित- या चालीवर म्हणता येते व जप ही होतो)


श्री रामचंद्र गुणगान

श्रीराम जयराम जय जय राम ॥ध्रु.॥
मानसमोहन मेघश्याम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१॥
दशरथनंदन राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२॥
भवभयभंजक हे श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३॥
तृप्त होतसे आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४॥
जानकिजीवनरंजन राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५॥
पालट घडवी मंगल नाम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६॥
सगुण सावळा सीताराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७॥
पवनसुतप्रिय स्वामी राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८॥
मखसंरक्षक कुमार राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९॥
नीरजलोचन राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०॥
आश्वासक अतिवत्सल राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥११॥
रसिकराज हे रघुपती राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१२॥
करुणानिधि हे मेघश्याम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१३॥
पुरुषार्थाचा प्रेरक राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१४॥
मोक्षश्रीचा दाता राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१५॥
मर्यादापुरुषोत्तम राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१६॥
पतितोद्धारक प्रभु श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१७॥
विश्वंभर हा मेघश्याम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१८॥
अजपाजप चालव श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१९॥
ध्येय ध्याता ध्यानहि राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२०॥
पदनतवत्सल प्रभु श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२१॥
हृदय होतसे मंगलधाम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२२॥
निर्वासन मज करतो राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२३॥
भरतानुग्रह राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२४॥
कुशल संघटक नायक राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२५॥
प्रेमाश्रुजल मेघश्याम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२६॥
प्रणवरूप प्रभु आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२७॥
सूत्रधार श्रीराजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२८॥
अधिष्ठान धर्माचे राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥२९॥
सत्यसंध तो रघुपति राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३०॥
हृदयनिवासी आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३१॥
सत्संकल्पा पुरवि राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३२॥
तुलसीचे सर्वस्वच राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३३॥
राघवेंद्र श्रीस्वामी राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३४॥
मन पवनासी जोडत राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३५॥
गगनि नेतसे आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३६॥
रघुपति राघव राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३७॥
रघुकुलभूषण राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३८॥
अंतस्थित नित आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥३९॥
अमृतधारा बरसे राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४०॥
साधन घडवी दयाळ राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४१॥
चारहि वाणी तो श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४२॥
अंगुलि धरुनी चालवि राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४३॥
आंजनेय श्रद्धा श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४४॥
सोहं हंसः प्रभु श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४५॥
अद्वयानुभव आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४६॥
विकार विरवी शांताराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४७॥
वरदहस्तही आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४८॥
स्नेहलदृष्टी मेघश्याम
श्रीराम जयराम जय जय राम ॥४९॥
प्रजानुरंजक राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५०॥
अनुसंधाना बनला नाम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५१॥
सज्जनरक्षक राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५२॥
आज्ञापालक कुमार राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५३॥
अक्षर अक्षर आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५४॥
सज्जनगडचा स्वामी राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५५॥
वरदहळीसी श्रीधर राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५६॥
दासबोध अन् आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५७॥
मनोबोधही प्रभु श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५८॥
आत्मबुद्धिही आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥५९॥
समर्थप्रिय तो विवेक राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६०॥
नाम वदवि हे साक्षी राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६१॥
पराशांति दे आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६२॥
मना सुमन करि दयाळ राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६३॥
रामायण घडवी श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६४॥
दे संरक्षण संकटि राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६५॥
व्रतनिष्ठा दे आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६६॥
जलौघ शरयूचा श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६७॥
सर्व सुखाचे निधान राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६८॥
घनतिमिरांतरी शुक्रच राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥६९॥
आत्मशक्तिचा दाता राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७०॥
क्षात्रत्वाचा दर्शक राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७१॥
सन्मतिदायक उदार राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७२॥
नवनीताहुन कोमल राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७३॥
वज्राहुनही कठोर राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७४॥
चंदनाहुनी शीतल राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७५॥
परमार्थाचा परिमल राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७६॥
कोदंडधारी राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७७॥
सत्योपासक साधक राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७८॥
आजानुबाहु आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥७९॥
पीतांबरधारी श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८०॥
प्राजक्ताचे सुमनहि राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८१॥
साहित्यातील सात्विक राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८२॥
कार्यविधायक तो श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८३॥
पवित्र परिसर तो श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८४॥
निर्भयमानस सीताराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८५॥
सुवर्णचंपक राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८६॥
कैवल्याचा दाता राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८७॥
स्तोत्रांचा हा स्त्रोतच राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८८॥
श्वासोच्छ्वासी भरला राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥८९॥
निरुपाधिक हा आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९०॥
प्रेमस्वरूप आहे राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९१॥
वात्सल्याचा सागर राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९२॥
स्थितप्रज्ञ पुरुषोत्तम राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९३॥
भक्तांचा विश्रामहि राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९४॥
उत्कट भव्यहि राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९५॥
स्वामी माझा राजाराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९६॥
अंतकाळि सोडविता राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९७॥
तीर्थाचेही तीर्थच राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९८॥
आत्मस्थित हा आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥९९॥
उपासना जो चालवि राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१००॥
प्रखर विरक्ती आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०१॥
आश्चर्याचा विषयच राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०२॥
उदात्त उन्नत मेघश्याम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०३॥
नीलाकाशी दिसला राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०४॥
नित्यमुक्त शाश्वत श्रीराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०५॥
आत्मनिवेदन आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०६॥
परात्पर गुरु आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०७॥
अनुसंधाना राखत राम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०८॥
हरि ॐ हरि ॐ आत्माराम
श्रीराम जयराम जय जय राम ॥१०९॥

॥इति॥






















Thursday, April 11, 2013

सर्वच क्षण मुहूर्ताचे

शुभारंभं कदा कुर्यात्
यदा चित्तं समुत्सुकम्
समः सिद्धौ असिद्धौच
क्षणाः सर्वे सुमंगलाः ॥

अर्थ : एखाद्या सत्कार्याला हात कधी घालावा?  जेव्हा चित्त त्या कार्यास अतिशय उत्सुक असेल तेव्हा.  
यश अथवा अपयश दोन्हीची तयारी ठेवावी.  कारण तसे पाहिले तर सगळेच क्षण मंगल नव्हेत का?

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, March 17, 2013

मन थोडे मोठे करा


गुणज्ञ रसरसारज्ञ
मानव शृणुमे वचः ।
प्रोत्साहनं सदा दत्स्व
वचसा, गुरुचेतसा॥

अर्थ :  
हे मानवा, खरोखर तुला गुणांची पारख आहे, तू रसिक आहेस, कोणत्याही गोष्टीचे मर्म लगेच जाणतोस, तर माझे हे वचन ऐक तू मन मोठे करून (सत्कार्याला) बोलून दाखवून प्रोत्साहन देत चल.

Sunday, March 10, 2013

महाशिवरात्रीनिमित्त




१९९६ मधे महाशिवरात्रीनिमित्ताने छापलेली अण्णांची ही अजुन एक कविता


स्मशानवासी शंकर स्मरणे
कैलासावर मने पोचणे
सांब सदाशिव हर हर म्हणणे
काळाचे भय मुळी न धरणे ॥१॥

जो पाठवितो, तो बोलवितो
जो खेळवितो, तो झोपवितो
जो धोपटतो, तो थोपटतो
उग्र भासतो, सौम्यच असतो ॥२॥

शंकर शंकर नाम शुंभकर
तो विश्वेश्वर तो करुणाकर
तोच सदाशिव तो भूतेश्वर
महाबळेश्वर ओंकारेश्वर ॥३॥

कोणी वंदा, निंदा कोणी
ढळे न कधि आसनावरुनी
तृतीयनेत्रे काम जाळुनी
जनां रक्षिले तत्पर ध्यानी ॥४॥

नंदी वाहन सखी पार्वती
गंगा धरली माथ्यावरती
त्रिशूळ शोभे एका हाती
सोहं डमरू दुस-या हाती ॥५॥

कंठ विषाने झाला काळा
जुमानले ना कळिकाळाला
रामनाम दे पराशांतिला
गौरीहर हरिध्यानी रमला ॥६॥

नरनारींची एकरूपता
उभयांचा गुणसंगम होता
महेश नारी नरहि तत्त्वता
भेदाभेदांची नच वार्ता ॥७॥

प्रातःकाली  संध्याकाळी
नामजपाने शांती लाभली
साधकास तर नित्य दिवाळी
आत्मप्रभा देहात फाकली ॥८॥

पुनरपि जननं पुनरपि मरणं
कालचक्र फिरतेच असू दे
व्याघ्रांबर फणिवरधर शंकर
अभयदान देतसे दिसू दे ॥९॥

असुनि नसावे नसुनि असावे
शिवापासुनी हेच शिकावे
मंदस्मित वदनी विलसावे
तत्त्वचिंतनी रंगुनि जावे ॥१०॥

अकरा कडवी महेश लिहवी
श्रीरामाला तोच जागवी
जे जे कळले जनांस शिकवी
हर हे सांगे तिमिर घालवी ॥११॥




ॐ नमः शिवाय

महाशिवरात्रीच्या दिवशी १९९६ साली छापलेली एक कविता आत्ता सापडली ती येथे देत आहे

ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय ॥ध्रु.॥

शिवमंदिरी मी नित जावे
दर्शनास आतुर व्हावे
त्वरा करुन धावत पाय
ॐ नमः शिवाय ॥१॥

शिवनामाचा छंद जडो
शिवकार्यी तनु अंति पडो
याविण मागू काय?
ॐ नमः शिवाय ॥२॥

शिवस्मरण करता घडता
पटे जगण्याची सार्थकता
अता न सोडी शिवपाय
ॐ नमः शिवाय ॥३॥

कोण राहते तनावरी?
शिव शिव जिव्हे वेग करी
जीवन वाया जाय
ॐ नमः शिवाय  ॥४॥

पुत्राची ममता सोडी
पतिपत्निंची ती जोडी
चिलयाही करि साह्य
ॐ नमः शिवाय  ॥५॥

एकतारी घे तू हाती
चिपळ्यांना ही कर साथी
शिवस्तुति तू गाय
ॐ नमः शिवाय  ॥६॥

उतर पाय-या हळू हळू
मन लागे बघ उजळू
शीतल होइ काय
ॐ नमः शिवाय  ॥७॥

शिवलीलामृत वाचावे
तरीच मी शिव म्हणवावे
चिंतन शुद्ध उपाय
ॐ नमः शिवाय  ॥८॥

स्मशान नाही वर्ज्य कधी
मरण स्मरे तो खरा सुधी
आतुन बदलत जाय
ॐ नमः शिवाय  ॥९॥

द्वंद्वांना उल्लंघावे
तरीच नरजन्मा यावे
असाध्य जगती काय?
ॐ नमः शिवाय  ॥१०॥

अकरा अकरा बहु अकरा
कुवासनांचा हो कचरा
शिवनाम राम नित गाय
ॐ नमः शिवाय  ॥११॥

श्रीराम बाळकृष्ण आठवले





Wednesday, March 6, 2013

श्री समर्थ रामदास नित्य वंदितो


आज श्री रामदास नवमी.  त्यानिमित्त दिवाळीमध्ये प्रकाशित केलेल्या माझ्या वडिलांच्या गाण्यांच्या (अण्णांची गाणी) ध्वनिमुद्रिकेतील "श्री समर्थ रामदास नित्य वंदितो" हे गाणे.  गायक आहेत प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे.




श्रीसमर्थ रामदास नित्य वंदितो ! ध्रु.

यत्न देव थोरला
साधकास दाविला
त्या प्रभूस कर्मपुष्प नित्य अर्पितो ! १

स्वस्वरूपज्ञान ते
अमृतत्व पाजते
निश्चयास येत धार नित्य पाहतो ! २

ना निराश व्हायचे
रडायचे कुढायचे
जिद्द अंगी चेतली ठाम ठाकतो ! ३

दासबोध वाचनी
ध्यानि आणि चिंतनी
श्रीसमर्थ बोलती बोल ऐकतो ! ४

बिंदु सिंधु होतसे
व्यक्ति राष्ट्र होतसे
संघकार्य हेच हे भाव बाणतो ! ५

आत्मदेव चोरला
अंतरंगि शोधला
तोच तोच तोच मी! सत्य जाणतो ! ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 



Saturday, January 26, 2013

स्वराज्य म्हणजे जबाबदारी


१९८५ मध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त तरुण भारत मधे प्रकाशित झालेले माझ्या वडीलांचे हे सुभाषित.

स्वराज्यमात्मविश्वासः
सन्मार्गः साधुदर्शितः ।
दर्शनं स्वस्वरुपस्य
स्वराज्यं कार्यभावना ॥

अर्थ :  स्वराज्य म्हणजे आत्मविश्वास,  साधुसंतांनी स्वतः आचरणपूर्वक दाखवून दिलेला सन्मार्ग.  त्या वाटेने जाऊन ’मी कोण’ हे कळले म्हणजे स्वरुपदर्शन होते व कार्यभावना दृढ होते.

Sunday, January 13, 2013

सण संक्रांतीचा



संक्रातीनिमित्त माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि १९८५ मध्ये तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित


एतद् संक्रमणं सत्यम्
भाषामाधुर्यवर्धनम् ।
सौहार्देन पराशान्त्या
सत्यं च मधुरं वद ॥

अर्थ

आपल्या बोलण्यातील माधुर्य जाणीवपूर्वक वाढविणे हेच खरे संक्रमण नव्हे का? अत्यंत स्नेहभावाने शांतवृत्तीने सत्य व मधुर बोलत जा.