Monday, February 25, 2019

प्रकटले गजानन शेगावी

घटना किति अद्भुत मानावी
प्रकटले गजानन शेगावी!ध्रु.

वद्य सप्तमी माघाची
मूर्ति विलसली योग्याची
थक्कित होती मेधावी!१

भाव न उरला आपपर
सिद्धयोगि हा दिगंबर
शिते लीलया वेचावी!२

नासाग्री खिळली दृष्टी
दिव्य दिसे वदनी दीप्ती
ब्रह्मखूण की पटवावी!३

भावार्थ कृतीचा उमजेना
अन्नात देवपण दिसेचना
मौनेच सत्कृती जाणावी!४

शिरि भास्कर तळपे तमा नसे
देहावर योगी कधी असे?
नित आत्ममाधुरी चाखावी!५

विश्वासी साधे समरसता
भाविका भावली सात्त्विकता
स्मरणातही वृत्ती रंगावी!६

ब्रह्मेच चराचर व्यापियले
मग भेद सहजची मावळले
अद्वयानुभूती लाभावी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.७.१९७६

गजानन महाराजांवरील भूपाळी.

प्रभात झाली श्रीगजानना आता जागावे
कृपादृष्टिने पहा आम्हांसी इतुके ऐकावे!ध्रु.
शेगावाच्या पुण्याईचे पाय घरा लागले
कृपाछत्र या कृपानिधीने शिरावरी धरले
भक्तिगीत मी वीणेवरती आनंदे गावे!१
गिन गिन गिनात बोते म्हणता येताती डोल
विटू लागते मन विषयासी सावरतो तोल
लाभ आगळा याहुनि कुठला? भजनी रंगावे!२
फुले पसरली चरणांजवळी चित्ती परिमळली
प्रभातकाली कानी आली सोsहंची मुरली
कोsहं सोsहं सुखसंवादे जीवन व्यापावे!३
शिवशंकर हे दिगंबरा मज द्या आशीर्वाद
क्षमा करावे आजवरी जे घडले अपराध
मीठभाकरी बरी भक्तिची ऐसे वाटावे!४
दासगणूंनी ग्रंथनिमित्ते केला उपकार
निराकार निर्गुणही झाले पुढती साकार
अवधूता मज तूचि सांग तुज कसे आळवावे?५
अपंग कोणी दिसता डोळा नयन पाझरावे
करुणाकर कर साह्य द्यावया आतुरसे व्हावे
दयाभाव जागण्या अंतरी आम्हां स्पर्शावे!६
सिद्धयोगि संतांच्या राजा मानुनि घ्या सेवा
श्रीरामासी चरणासन्निध नित्याचे ठेवा
शांत दांत त्या सपदि करावे योगी रमवावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
७.७.१९७६

Tuesday, February 19, 2019

वंदना


कोटी कोटी कंठात निनादे, आज हीच प्रार्थना
माधवा स्वीकारी वंदना!ध्रु.

धन्य तुझी भारतभूभक्ती
तनाधनाची ना आसक्ति
तच्चरणी अर्पियली मुक्ती
नव्या युगाचा मूर्त दधीचि तू धन्य तुझी साधना!१

देशभक्तीचे गीत गाइले
मनामनांचे सूर जुळविले
अमित वैभवे संगीत नटले
तव कार्यातुनि क्षणाक्षणाला लाभतसे चेतना!२

सारुनि दुरि विस्मृतीची छाया
राष्ट्रजीवना उजळा द्याया
भेदभावना जाण्या विलया
'हिंदुराष्ट्र जय हिंदु देश' ही फुलवितसि गर्जना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
६ फेब्रुवारी १९५६ (दापोली)

Monday, February 18, 2019

जयजयकार करा! जयजयकार करा..


रामकृष्ण जय, परमहंस जय
जयजयकार करा! जयजयकार करा!!ध्रु.

देवत्वाची सजीव मूर्ती
त्या गुरुदेवा अमुची प्रणती
मांगल्याचा येथुनि वाहे खळाळता मधु झरा!१

चारित्र्याचा सतेज भास्कर
करुणेचा हा अपार सागर
उक्तीउक्तीतुनी प्रगटतो भगवद्भाव खरा!२

चरित्र वाचन अनुभव अद्भुत
परमेशाचे स्तवन कंठगत
सत्य एक परमात्मा बाकी आभासच सारा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, February 17, 2019

प्रभात काली महाराज द्या नामाचा छंद!



प्रभात काली महाराज द्या नामाचा छंद!
राम नाम हे कृष्णच आता नामच गोविंद!ध्रु.
मना मोहवी हातामधला चिपळ्यांचा ठेका
झांज झणझणे मनें सोडला विषयांचा हेका
समरस झालों जगास भुललो गाता बेबंद!१
नामच भक्षण, नामच प्राशन, श्वसन नाम झालें
गाता गाता अश्रु अनावर गालांवर झरले
मिटल्या नयनीं दिसू लागला समूर्त आनंद!२
एकतारी ही छेडित राही रामनाम धून
सरींवर सरी मधेच हसते श्रावणीय ऊन
गगनवेध घेउनी भरारे पक्षी स्वच्छंद!३
चैतन्याचा स्रोत सद्गुरो असाच पुरवा हो
नामावरला प्रेमा अमुचा वृद्धिंगत राहो
सोsहं सोsहं नाद अनाहत येऊ दे मंद!४
माता रामच, पिताहि रामच, बंधु श्रीराम
स्वामी रामच, हें हि वदविता केवळ श्रीराम
विश्वात्मक वृत्ती तोडू दे देहाचे बंध!५
प्रसन्नता ये माहेराला लेकुरवाळी हो
प्रमोद, शांती बाळे आली संगे घेउनि हो
गोकुळांत या उसळू लागे अनाम आनंद!६
नाम कर्म हें, नाम ज्ञान हें, नामच हें भक्ती
नामच पुरवी तना मनाला सात्त्विकशी शक्ती
अनुसंधानी रामा ठेवा, पुरवा हा छंद!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराजांची आरती..


गोंदवलेकर महाराजांची गाऊ आरती! गाऊ आरती!
अमृतधारा पिउनी हरखे हृदयाची धरती!ध्रु.
आपुल्या हृदयाची धरती!

नाम रसायन औषध नामी निर्मळ होण्याला
स्वभाव बदले, मधुरपणा ये बोलाला कृतिला
सद्गुरुचरणी सगळी तीर्थें निवास करताती!१

दुजें न कोणी ठसे जधि मनीं भय सगळे सरले
एकपणाचा अनुभव देण्या भक्तिकमळ उमले
'राम कृष्ण हरि' नाम साधवी  ध्यानातहि प्रगती!२

पुन्हां पुन्हां हे भाविक डोळे भरभरूनी येत
सारे सात्त्विक भाव  वेगळ्या जगांत नेतात
अभावितपणे कृतज्ञतेने कर माझे जुळती!३

जरि न पाहिलें नामयोगि हे अंतरात आले
आले हृदयासनी माझिया हळूच ते बसले
महाराज मग बहुविध सेवा  करवुनिया घेती!४

घर मज गमले, श्रीगोंदवले झाला आनंद
भजनसोहळा पुरा रंगला दे मग आल्हाद
दर्शन नाम, प्रसाद नामच सदगुरु देताती!५

"मी तुमचा हो, तुम्हीं माझे" अनुभव हा द्या हो
रामरूप जग महाराज हो मम दृष्टी पाहो
नामीं रति द्या भजनि रमाया द्या अंतःस्फूर्ति!६

नाम नि नामी एकरूप जधि रामनाम एक
चिंतन देई आणुनि ध्यानी ज्ञानाची  मेख
श्रीरामाला लावा हृदयी ठेवा कर माथी!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराजांची आरती (audio)