Sunday, February 17, 2019

प्रभात काली महाराज द्या नामाचा छंद!



प्रभात काली महाराज द्या नामाचा छंद!
राम नाम हे कृष्णच आता नामच गोविंद!ध्रु.
मना मोहवी हातामधला चिपळ्यांचा ठेका
झांज झणझणे मनें सोडला विषयांचा हेका
समरस झालों जगास भुललो गाता बेबंद!१
नामच भक्षण, नामच प्राशन, श्वसन नाम झालें
गाता गाता अश्रु अनावर गालांवर झरले
मिटल्या नयनीं दिसू लागला समूर्त आनंद!२
एकतारी ही छेडित राही रामनाम धून
सरींवर सरी मधेच हसते श्रावणीय ऊन
गगनवेध घेउनी भरारे पक्षी स्वच्छंद!३
चैतन्याचा स्रोत सद्गुरो असाच पुरवा हो
नामावरला प्रेमा अमुचा वृद्धिंगत राहो
सोsहं सोsहं नाद अनाहत येऊ दे मंद!४
माता रामच, पिताहि रामच, बंधु श्रीराम
स्वामी रामच, हें हि वदविता केवळ श्रीराम
विश्वात्मक वृत्ती तोडू दे देहाचे बंध!५
प्रसन्नता ये माहेराला लेकुरवाळी हो
प्रमोद, शांती बाळे आली संगे घेउनि हो
गोकुळांत या उसळू लागे अनाम आनंद!६
नाम कर्म हें, नाम ज्ञान हें, नामच हें भक्ती
नामच पुरवी तना मनाला सात्त्विकशी शक्ती
अनुसंधानी रामा ठेवा, पुरवा हा छंद!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment