Monday, February 25, 2019

गजानन महाराजांवरील भूपाळी.

प्रभात झाली श्रीगजानना आता जागावे
कृपादृष्टिने पहा आम्हांसी इतुके ऐकावे!ध्रु.
शेगावाच्या पुण्याईचे पाय घरा लागले
कृपाछत्र या कृपानिधीने शिरावरी धरले
भक्तिगीत मी वीणेवरती आनंदे गावे!१
गिन गिन गिनात बोते म्हणता येताती डोल
विटू लागते मन विषयासी सावरतो तोल
लाभ आगळा याहुनि कुठला? भजनी रंगावे!२
फुले पसरली चरणांजवळी चित्ती परिमळली
प्रभातकाली कानी आली सोsहंची मुरली
कोsहं सोsहं सुखसंवादे जीवन व्यापावे!३
शिवशंकर हे दिगंबरा मज द्या आशीर्वाद
क्षमा करावे आजवरी जे घडले अपराध
मीठभाकरी बरी भक्तिची ऐसे वाटावे!४
दासगणूंनी ग्रंथनिमित्ते केला उपकार
निराकार निर्गुणही झाले पुढती साकार
अवधूता मज तूचि सांग तुज कसे आळवावे?५
अपंग कोणी दिसता डोळा नयन पाझरावे
करुणाकर कर साह्य द्यावया आतुरसे व्हावे
दयाभाव जागण्या अंतरी आम्हां स्पर्शावे!६
सिद्धयोगि संतांच्या राजा मानुनि घ्या सेवा
श्रीरामासी चरणासन्निध नित्याचे ठेवा
शांत दांत त्या सपदि करावे योगी रमवावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
७.७.१९७६

No comments:

Post a Comment