Monday, March 4, 2019

हर हर महादेव बोला.....

हर हर महादेव बोला!
हर हर महादेव बोला!ध्रु.
डम डम डम डम डमरू वाजे
आशुतोष हा महिमा गाजे
भावभक्तिला भुलतो माझा शिवशंकर भोळा!१
कैलासीचा हा तर राणा
जगावेगळा याचा बाणा
एकांताच्याही एकांती चिंतनात गढला!२
सागर मथिता सुधा मिळाया
विषच उसळले ऐशा समया
प्राशुनि ते रोधियले कंठी साहत दाहाला!३
जाचक गमता कामवासना
ज्वालांनी जाळियले मदना
काम नियंत्रित पोषकधर्मा कळले जगताला!४
गायन वादन नर्तन रुचते
नाट्यकला अंगात खेळते
कधि घनगंभिर कधी हासरा भालचंद्र भासला!५
गिरिजापति नंदीवर बसला
सावकाश सर्वत्र विहरला
आदिनाथ हा आदिगुरु हा वंदनीय सकलां!६
गंगा झेलुनि जटामंडली
सरिताधारा सुसह्य केली
हा गंगाधर पापतापहर चरणशरण सकलां!७
मृत्युंजय हा जिवा विसावा
तप्तांसाठी जल शिडकावा
व्याघ्राम्बर हा स्मशानवासी उद्धारक गमला!८
चिताभस्म हा तना लिंपतो
विरक्तीभास्कर कसा तळपतो
पूर्ण विरागी तरि गृहस्थ हा आदिनाथ आगळा!९
नागराज रुळलासे कंठी
रामनाम नित ओठांवरती
सहजसमाधिधन वश ज्याला शशिशेखर हसला!१०
नटराजाचे पूजन करुया
दिली भूमिका उत्तम करुया
जीवन नाटक सुखान्त व्हावे प्रार्थूया त्याला!११

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.०१.१९९६

No comments:

Post a Comment