Wednesday, April 3, 2019

आळवी शिव भैरवी...

जीवनाच्या सांजवेळी
दीपकळी का थरथरावी?
तेल आले सरत का ते
देव जवळी बोलवी
आळवी शिव भैरवी!ध्रु.
चारित्र्य प्रभु श्रीरामसे
चातुर्य अंगी कृष्णसे
पावित्र्य गंगेचे जसे
गांभीर्य वदनी सिंधुसे
लीन अवघे ईशचरणी, यत्न थकले मानवी
आळवी शिव भैरवी!१
सोडूनि देउनि नांगर
धर्मार्थ केला संगर
नच द्वेष अथवा मत्सर
शिवला मनाला रतिभर
प्रभुकार्य हे निजकार्य ना हा भाव जीवा तोषवी
आळवी शिव भैरवी!२
संकल्प जे रुजले मनीं
ते निर्मिले नारायणी
सिद्धीस त्यांना नेउनी
कृतकृत्य केले जीवनी
कर्तृत्व केवळ आपुले आभास अवघ्या नाचवी
आळवी शिव भैरवी!३
द्वैतास थारा ना अतां
वरण्या सजे सायुज्यता
साफल्य माला घालिता
तृप्तीच पावे तृप्तता
जाणीव देहाची नुरे मन रंगले ते राघवी
आळवी शिव भैरवी!४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment