या देही या जन्मी जाणव नित्य प्रभाती जिवा शिवा
उमाधवा हे सदाशिवा!ध्रु.
शिव शिव म्हणता मन शिव होई
मन शिव तनु रोमांचित होई
शीतल गंधित वायुलहर गारवा गोडवा तिचा हवा
सत्य नि सुंदर ते शिव असते
त्यांचे चिंतन उपकारक ते
श्रवण नि कीर्तन स्मरण शिवाचे व्हावे हा तर ध्यास जिवा
थोडे तरी उतरावे लागे
मनहि न बघते वळून मागे
तुझी पिंड दिसताक्षणि नयना सदानंद लाभला जिवा
धवल फुले ती गंध चंदनी
धवल चंद्रिका प्रकाशे मनी
अभिषेकाची ही जलधारा देत गारवा तप्त जिवा
हे गंगाधर हे फणिवरधर
हे शशिशेखर हे गिरिजावर
ज्ञानज्योती पिंडच गमते शिवभक्ता आलोक हवा
सृजन नि विकसन तसे विसर्जन
तिन्ही अवस्थांचे अवलोकन
तूच करविशी आदिनाथ हे वंदनीय श्रीगुरुदेवा
तू मृत्युंजय हरवि मरणभय
रहस्य उकलुन फेडी संशय
नाथसंप्रदायी जो झाला त्या पाठी तू असशि शिवा
शिव हर शंभो महादेव तू
गणनाथाचा वंद्य पिता तू
तव प्रिय गिरिजा प्रथमा शिष्या नमन तुला रे सदाशिवा
सुरसेनानी जन्मा येवो
असुरांचे साम्राज्य संपवो
या हेतूने नियती जोडी गिरितनयेशी तुझा दुवा
अप्रिय दाहक गिळता यावे
वाण सतीचे मज पेलावे
युक्तीसह दे शक्ति आणखी नकोच काही उमाधवा
श्र्वासावरती पूर्ण नियंत्रण
प्रसन्न मन अन् सुस्थिर आसन
अभ्यासा रामास बसवुनी स्वरूपदर्शन घडव शिवा
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२.२.१९९६