Friday, July 1, 2022

तुझ्या दर्शनासी आलो


तुझ्या दर्शनासी आलो, तुझ्या दर्शनासी!
मान लवे माझी वीरा तुला वंदिण्यासी!ध्रु. 

वंदनास कर जुळलेले बहुत बोलले 
ध्यानमग्न योग्यासम तू मना भासले
कृतार्थ हे डोळे उत्सुक अश्रुसिंचनासी!१

मदनलाल मुद्रेवरती तेज भास्कराचे
कृतार्थता तुझिया शरिरी मुग्ध नृत्य नाचे
तूच गुरु तव करणीने वंदनीय होशी!२

मातृभूमि ऋण फेडावे हविर्भाग व्हावे
मशालिने हौतात्म्याच्या पंथ दाखवावे
घनतिमिरी झोत प्रभेचा तसा शोभलासी!३

हौतात्म्य न वाया जाते मार्गदीप होते
जणू इंद्रपद तुज लाभे हेच मनी येते
मान सुखे फासा देशी ध्येयरूप होशी!४

एक शब्द देतो तुजशी तुझी देववाणी
घुमेल या विश्वामाजी जशी वेदवाणी
सुखेनैव भोगी वीरा शांतिच्या सुखाशी!५

मायभू न जोवरि मुक्त पुनःपुन्हा यावे
कार्यपूर्ति व्हावी यास्तव चक्र ते फिरावे
भारतीय युवकांलागी देव जाहलासी!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment