Thursday, July 14, 2022

हरायचे ना थकव्यापुढती मनापासुनी घ्या हो नाम

हरायचे ना थकव्यापुढती
मनापासुनी घ्या हो नाम
श्रीराम जय राम! जय जय राम!ध्रु.

थकवा मोठा विकार आहे
प्रगती मधला अडसर आहे
छुपा शत्रु हा, या वैऱ्यावर
चला सोडू नामाचे बाण!१

नाम स्मरता राम अंतरी
काम कराया येइ सुरसुरी
सुरेल सुंदर आलापीही
करून जाई मन सुखधाम!२

अभिमन्यूचे शौर्य दाखवा
बाजीप्रभुसम खिंडहि लढवा
नवीन वाचन, नवीन चिंतन
तनामनाला दे विश्राम!३

कधी दीनता नये पत्करू
अनाथ ना मी असे लेकरू
नित्य लागते कसास निष्ठा
नैष्ठिक तो बलवान!४

उपासनेने बळ मिळवावे
उपासनेला जन लावावे
बलशाली बलभीम रोवतो
भूवर चरणां ठाम!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.०३.२००५

No comments:

Post a Comment