Tuesday, October 24, 2023

श्रीरामकृपेचे वैभव हे घ्‍या ध्‍यानी, घ्‍या ध्‍यानी!

श्रीरामकृपेचे वैभव हे घ्या ध्यानी! घ्या ध्यानी!ध्रु.

जे घडते ते त्याची सत्ता
जे लाभे ते त्याची मत्ता
रामनाम घ्या उठता बसता तसे निरंतर जनि विजनी!१

दुःखा विषयी घृणा नको
सुखविषयक लालसा नको
राम ठेवु दे कसेहि अपणा रंगायाचे तद् भजनी!२

भगवद् भजनी वृद्ध रमू दे
कर्तव्यी रत युवक असू दे
भगवत्प्रेमा साधे केवळ रामचंद्र नामोच्चरणी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २३१ (१८ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

आपापल्या परिस्थितीचा जर अनुभव पाहिला तर असे खचित आढळून येईल की आपले हे सर्व वैभव केवळ श्रीरामकृपेचेच आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून, कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका अगर खेद करू नका. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून समाधानात राहा. वाईटाबद्दल कंटाळा नको किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. "रामा! तू ठेवशील त्यात आनंद मानीन" अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. जे मागाल ते मात्र हिताचे मागा. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगताचा स्वामी होईल याबद्दल खात्री बाळगा. म्हातारे असतील त्यांनी भगवत् भजनात आपला वेळ घालवावा व तरुण असतील त्यांनी भगवत्स्मरणात कर्तव्याला चुकू नये, हाच समाधानाचा मूलमंत्र आहे व यातच सर्वस्व आहे. भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल.

No comments:

Post a Comment