श्रीरामाचे नाम घेत जा दिवस असू दे रात्र असो।
तोच खरा रे रक्षणकर्ता भाव जागता मनी वसो।ध्रु.
भल्या पहाटे वायुलहर ये तुला भाविका जागवते।
शांत सुशीतल वातावरणी अभ्यासा प्रेरक होते।
रघुनाथाला पहिले वंदन शुभारंभ हा असा असो।१
मन हे सज्जन समर्थ वदती त्याचा राख जरा मान।
कलाकलाने नामी रमवी मुक्तीचा चढ सोपान।
नव्हे देह मी मी तर साक्षी अलिप्तता वर्तनी वसो।२
मोहकरूपे व्यसने सजली कांचनमृग ती तू जाण ।
सावधान तो खरा सुदैवी कमलपत्र उदकी मान।
आकाशाला लेप न कसला तसे तुझे मन शुद्ध असो।३
जे जे ओघे काम येतसे रामाचे ते समजावे ।
ते तर आहे ईश्वरपूजन - जीवेभावे सजवावे ।
ती समरसता रुचते रामा तत्त्व मनावर पूर्ण ठसो। ४
दुसऱ्याचा कर विचार आधी देहभावना जाईल।
मी माझे जर मावळलेले सत्याचा रवि उगवेल।
प्रकाशकिरणे आनंदाची तनामनाला स्नान असो।५
कर्तव्याचा विचार आधी ते आचरिता कल्याण।
निर्धाराने पुढे चालता सुखदुःखे तू सम मान।
आत्मारामच सर्व करवितो अशी भूमिका असो असो।६
जा एकांती बैस आसनी डोळे मिटुनी पहा जरा।
अजपाजप चालला अखंडित शांतिसुखाचा झरे झरा।
श्रीरामाच्या सहवासाचा आत्मप्रत्यय येत असो।७
जे जे चुकले सांग तयाला दयाराम तो क्षमा करी।
पडत्याला तो हात देउनी सावरणारा भाव धरी।
स्वभाव माझा सुधारेन मी निश्चय ऐसा ठाम असो। ८
श्रीरामाचे जीवन शिकवण रामायण तू गात रहा।
कसा बोलतो कसा वागतो विचार ऐसा करत रहा।
नामच घडवी पालट आतुन नामस्मरणी खंड नसो।९
जनी जनार्दन जनसेवेस्तव चंदनसम तन झिजवावे।
नश्वर तन हे जाई जावो - कीर्ति रुपाने उरवावे।
विवेक आणिक विचार यांची उभ्या जीवनी साथ असो। १०
कुटुंब अपुले प्रयोगशाळा स्त्रिया बालके विश्राम।
राम पहावा देहो देही सुख देता हासे राम।
रामराज्य ते घरात येते, आणायाचा ध्यास असो। ११
मन कोणाचे नच दुखवावे नियम वर्तनी ठेवावा।
कृती बोलकी उक्तीपेक्षा आचरणी गोडवा हवा।
अहंकार दैत्यास वधाया नामरसायन मुखी असो।१२
बोलायाची नसे कथा ती आचरिण्याचा परमार्थ।
पारायण हे संस्काराला साधक घेतो ध्यानात।
सद्भावे सद्भाव वाढवू नित्य नवा संकल्प असो।१३
( चाल - पोटापुरता पसा पाहिजे )
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले