Sunday, February 25, 2024

पावना मना! सज्जना मना! धरी अंतरी रामभावना!

ॐ श्रीराम समर्थ 

पावना मना ! सज्जना मना ! 
धरी अंतरी रामभावना ! ध्रु.

व्यर्थ ना अडायचे 
हिंपुटी न व्हायचे
करित जा सुखे ध्यानसाधना!१

देहबंध तोड तोड 
आत्मतत्त्व जोड जोड 
नित्य देत जा मार्गि प्रेरणा!२ 

सत्त्वशील तू मना 
धैर्यशील तू मना 
रामपदि रहा माझिया मना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.१०.१९७६

मज सोपी करूनी सांगा भगवद्‌गीता!

विनवणी

मज सोपी करूनी 
सांगा भगवद्‌गीता!

तळमळे शिष्य हा 
आत्मज्ञानाकरता !

मज हृदयी सद्‌‌गुरु 
विवेक होउन बसता!

आधार आपला असता 
कुठली चिंता!

अवघडही गोष्टी 
सोप्या होती आता!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, February 23, 2024

भवभय जाण्या औषध नाम! श्रीराम! श्रीराम!! श्रीराम!!!

श्रीराम ! श्रीराम !! श्रीराम!!! धृ.

नाम घेत जा 
मना आत जा 
दाह शमविण्या औषध नाम ! १ 

ज्ञान लाभते 
विरक्ति वरते 
रामचिंतनी मन सुखधाम ! २

भाव बळावे 
दुःख पळावे
आत्मोकर्षा साधन नाम! ३ 

समाज राम
सद्‌‌गुण राम 
दीनांचा कनवाळू राम ! ४

भक्ति विरहिता 
छळे व्यग्रता 
भक्ता तारक पोषक नाम ! ५

संशय जाई 
निश्चय येई 
बहुत बहुत गुणकारी नाम ! ६

कितीहि दुर्घट 
टिके न संकट 
भवभय जाण्या औषध नाम! ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.०९.१९७९

भगवंत हवा हा ध्यास हवा!

वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका.

भगवंत हवा हा ध्यास हवा!ध्रु.

न लगे दुसरे 
मन त्यास स्मरे 
आळवी सदा ते सदाशिवा!१ 

जप हा चाले 
तनु ही डोले 
नामेच तारिले किती जिवा !२ 

वासना नको 
भवपाश नको 
प्रभूनामच शीतल शिडकावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २०७, २५ जुलै वर आधारित काव्य

Saturday, February 17, 2024

मज हाती धर, शिकवी गीता!

हे मुरलीधर, गोवर्धनधर, 
मज हाती धर, शिकवी गीता! ध्रु.

नश्वर तन परि ते तर साधन 
ते झिजवावे जैसे चंदन
नित्यकर्म जे रुचु दे मजला-
स्वधर्मपालनि दे तत्परता! १

आत्म्याचे अमरत्व पटव रे 
साधनेत सातत्य टिकव रे 
अहंकार नच शिवो मनाला -
जीवनास दे यज्ञयोग्यता!२

प्रकृति कर्मे घडवुनि घेते 
कर्तेपण मिरवती नेणते 
त्रिगुणांनी जन असे जखडले 
मुक्त करी रे त्रिगुणातीता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, February 16, 2024

यत्न सारखा करीत जावा


यत्न सारखा करीत जावा-
यश हे निश्चित येते। ध्रु.

विचार करणे 
मन आवरणे
प्रगतिपथी ते नेते!१

श्रवणे मनने 
नामस्मरणे 
विकारवशता विलया जाते!२ 

विजनी जावे
मौन धरावे 
निर्मत्सर मन होते!३

मृदु बोलावे 
जन निववावे 
कृतार्थ जीवन होते!४ 

जे बोलावे 
कृतीत यावे
नीतिसंपदा वरते!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.१२.१९७४
समर्थ रामदासांच्या जीवनावर आधारित काव्य.

Thursday, February 15, 2024

राम कर्ता ! भावना ही सर्वदा ठेवी मना !

राम कर्ता ! भावना ही सर्वदा ठेवी मना ! ध्रु.

मीपणासी सोड आधी
संपली मग पूर्ण व्याधी
राम मिळण्या आड येते, ती खुळ्या रे वासना !१

टाकणे निंदा पराची
सोड आशा परधनाची
माय अपुली वत्सला रे जी दिसे तुज अंगना!२

वासनांची आहुती दे
'तोच मी' हे जाणवू दे
भाव हा वृत्तीत मुरता माधुरी ये जीवना! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २८१,  ७ ऑक्‍टोबर वर आधारित काव्‍य

व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्यभावाने शरण जा. 

परस्त्री मातेसमान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा. या तीन गोष्टींना फार सांभाळा.
 
भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते ते टाकणे, म्हणजे यज्ञ करणे होय. या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी.

नर-नारायण अर्जुन-माधव अद्वैताचा अद्भुत अनुभव !

खरोखर अनेकदा प्रश्न पडतो अर्जुन खरेच अज्ञानी होता का? की त्याने अज्ञानाचे सोंग घेतले होते ?
भगवंताच्या स्‍नेहसुखाचा लाभ कोणाला नकोसा वाटेल?
अर्जुनाची भूमिका देहाभिमानी माणसाची तर भगवंत बोलत आहेत देहातीत अवस्थेतून.
खरोखर ही नर-नारायणाची जोडी पाहून मनात येते-

++++++++++

नर-नारायण अर्जुन-माधव
अद्वैताचा अद्भुत अनुभव ! ध्रु. 

त्या आठविता डोळे झरती
वंदन करण्या कर हे जुळती
दिव्य जोडी ही भारतवैभव!१
 
सांख्ययोग हा माधव गमतो
कर्मयोगिसम अर्जुन नटतो
शिवशक्ती जणु युगुलच अभिनव!२

कृष्‍णसखा वेल्‍हाळ लाभता
अर्जुन अपुले लाड पुरविता
श्रोते स्‍मरती लोभस शैशव!३
 
देहि अर्जुन विदेही माधव
लटक्‍या द्वैती दाविति पाटव
दुग्‍धशर्करा सुयोगसंभव!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, February 11, 2024

उपासना रामाची करू या

ॐ 
श्रीराम समर्थ

उपासना रामाची करू या-
उपासना रामाची! ध्रु.

रामच कर्ता, रामच भोक्ता
तयासारखा अन्य न दाता 
भक्ती बलवंताची ! १

व्यक्ती व्यक्ती रामच आता 
समष्टीत रामास पाहता 
महती सामर्थ्याची! २

रामराज्य यावे भूवरती 
हीच कामना जनी संप्रती 
आशा सश्रद्धाची! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०४.१९७६

मना धन्य तूं - तुझ्याचपाशी रामदास बोलले! त्यांनी तुजला गौरविले!

श्रीराम समर्थ

मना धन्य तूं - तुझ्याचपाशी रामदास बोलले!
त्यांनी तुजला गौरविले! ध्रु.

समर्थ स्वामी ! समर्थ स्वामी! 
जा जा रंगुनि पवित्र नामीं
भाग्य असे की संतकृपेने सुमन तुझे झाले !१

आज्ञाधारक तू हि कसा पण ?
थक्कित झाले अवधे जीवन 
बोध जरी हा सान त्यात तर वेदसार आले!२ 

निमित्त केले तुला मना रे 
आत्मसुख दिले सकल जना रे
मना नमन तुज करण्यासाठी भाविक कर जुळले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, February 10, 2024

राधाकृष्ण जय कुंजविहारी



राधाकृष्ण जय कुंजविहारी 
मुरलीधर गोवर्धनधारी ! ध्रु.

मनामनातिल भक्ती राधा 
श्रीकृष्णाची तिजला बाधा 
वेड लावतो श्याममुरारी!१ 

उपवनातुनी चिंतन स्फुरते 
नामस्मरणच कीर्तन बनते 
सोऽहं सोऽहं घुमे बासरी!२ 

कृष्ण कृष्ण जय गाता गाता 
जीवन अवघे गमते गीता 
गोपगड्यांचा हरि कैवारी!३

सहकाराचा मंत्र आगळा
गोवर्धनगिरी कसा पेलला
वेधु लावतो श्रीगिरिधारी!४

ओघे आले कर्म करावे 
फलाशेत ना कधि गुंतावे 
कानी पडते कृष्णबासरी!५

त्या भक्तीचे नावच मुक्ती 
जीवन जगण्याची ही युक्ती 
कळेल त्याला जो अवधारी!६

स्वभावास या औषध आहे 
नामरसायन नामी आहे 
वैद्यराज तो असे श्रीहरी!७ 

उत्साहाने जीवन जगणे 
सगळे जग आनंदे भरणे 
हेच शिकवते टिपरी टिपरी!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०६.१९८७

Wednesday, February 7, 2024

डोळे मिटुनि पाहे श्रीराम आत आहे!

डोळे मिटुनि पाहे
श्रीराम आत आहे!ध्रु.

फिरणे नको जनांत
ठायी रहा निवांत
तुज गूज सांगताहे!१

धर प्रीत राघवी रे
कर भक्ति राघवी रे
सत्संगि तोच आहे!२

शिव भेटता जिवाला
विश्राम प्राप्त झाला
बहु धन्य वाटताहे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.११.१९७६

Tuesday, February 6, 2024

नाम करी निष्काम !

श्रीराम समर्थ 


नाम करी निष्काम ! ध्रु.

रघुपति राघव 
तू नित आठव 
घेत राहा तू नाम ! १ 

प्रभुगुण गाता 
स्वरूपि मिळता 
मन हो मंगलधाम ! २

श्रम हे सरती 
लाभे शांती 
मना सुमन करि नाम! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

भय सोडुनि दे, मना धीर धर!

भय सोडुनि दे, मना धीर धर!ध्रु.

देहरक्षणा यत्न केला
तो तो अंती वाया गेला
जाणुनि हे तू रामचरण धर!१

रघुनाथासम स्वामी असता
कसली भीती कसली चिंता?
शाश्वत त्याचा त्वरे ध्यास धर!२

काळ जवळि ये जरि ग्रासाया
सोडवी न तुज पुत्र नि जाया
साहाय्य होईल राम धनुर्धर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
केदार (हरि तुम हरो जन की भीर)

Saturday, February 3, 2024

नाम जपावे अविराम- संकटि धावत श्रीराम !

ॐ श्रीराम समर्थ

नाम जपावे अविराम- 
संकटि धावत श्रीराम ! ध्रु.

भाव धरावा 
राम पहावा
विदेहपण देइल नाम! १

पदि मन रमले-
संकट कुठले ?
भक्तच बनतो सुखधाम ! २

भाव जसा हो
देव तसा हो
अनन्यास रक्षक राम! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०७.१९७७ शुक्रवार

Friday, February 2, 2024

संवादाची साध कला!

संवादाची साध कला!ध्रु.

वाद तुटावा
भेद मिटावा
आळव आळव घननीळा!१

स्नेह वाढु दे
भाव भरू दे
विश्वंभर विश्वी भरला!२

संशय सरू दे
विवाद विरू दे
जो परमार्थी तोच भला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०७.१९७७