Saturday, February 10, 2024

राधाकृष्ण जय कुंजविहारी



राधाकृष्ण जय कुंजविहारी 
मुरलीधर गोवर्धनधारी ! ध्रु.

मनामनातिल भक्ती राधा 
श्रीकृष्णाची तिजला बाधा 
वेड लावतो श्याममुरारी!१ 

उपवनातुनी चिंतन स्फुरते 
नामस्मरणच कीर्तन बनते 
सोऽहं सोऽहं घुमे बासरी!२ 

कृष्ण कृष्ण जय गाता गाता 
जीवन अवघे गमते गीता 
गोपगड्यांचा हरि कैवारी!३

सहकाराचा मंत्र आगळा
गोवर्धनगिरी कसा पेलला
वेधु लावतो श्रीगिरिधारी!४

ओघे आले कर्म करावे 
फलाशेत ना कधि गुंतावे 
कानी पडते कृष्णबासरी!५

त्या भक्तीचे नावच मुक्ती 
जीवन जगण्याची ही युक्ती 
कळेल त्याला जो अवधारी!६

स्वभावास या औषध आहे 
नामरसायन नामी आहे 
वैद्यराज तो असे श्रीहरी!७ 

उत्साहाने जीवन जगणे 
सगळे जग आनंदे भरणे 
हेच शिकवते टिपरी टिपरी!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०६.१९८७

No comments:

Post a Comment