Thursday, October 31, 2024

सावध, सावध होई!

जय जय रघुवीर समर्थ

जे दिसते ते नाश पावते, 
टिके न जगती काही 
सावध, सावध होई!ध्रु.

आकाराला जे जे येते 
काळमुखी ते भक्ष्यच ठरते
भ्रमी न कसल्या राही?१

वेदश्रुति ही ऐसे बोलत 
निर्गुण ब्रह्मचि असते शाश्वत 
ते तू शोधुनि पाही!२ 

"तत् त्वम असि" हा बोध आगळा
जाणुनि हो रे जगावेगळा 
निर्लेपत्वा घेई!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०४.१९७५

खालील श्लोकावर आधारित काव्य.

दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।
अकस्मात आकारले काळ मोडी॥
पुढे सर्व जाईल काही न राहे। 
मना संत आनंत शोधूनि पाहे॥

जे डोळ्यांना दिसते ते कोटिकल्प-शाश्वत टिकणारे नाही. जेवढे म्हणून आकाराला येते ते सगळे काळ मोडून टाकतो. पुढे (प्रलयकाळी तर सगळ्याचा नाश होईल) म्हणून मना (ह्याहून वेगळे) संत (शाश्वत) आणि आनंत काय आहे हे शोधून पाहा.

Tuesday, October 29, 2024

तोच खरा हिंदु


सिंधुस्थाना स्मरता उसळे हृदी भक्तिसिंधु -
तोच खरा हिंदू!ध्रु. 

इथे जन्मतो, इथे वाढतो 
राष्ट्रजीवनी तो समरसतो
प्रदेश धर्म नि वंश त्रयी ने गंगाजलि बिंदू! १ 

सिंधूपासुनि सुरू जाहली 
जी सिंधू ते जाउनि मिळली
ती भारतभू जया पुण्यभू - श्रद्धेचा सिंधू!२

जे जे रुचले स्वीकृत केले 
संस्करणे उन्नतीस नेले
हिंदु जाति ज्या जीवनातला आद्य मानबिंदू!३

संस्कारांचा थोर वारसा
लाभला असे जया मानसा 
तो तो मानव पूर्ण सुसंस्कृत धैर्यशील बंधू!४

एकच आशा एक भावना 
विकल्पास मनि वाव उरेना
परंपरा जो पुरी जाणतो त्या प्रेमे वंदू! ५

"हिंदु" शब्द राष्ट्राचा वाचक 
तो उद्‌बोधक, तो तर प्रेरक
समान संस्कृति बंधन बघते ज्या प्रेमे बांधू!६ 

विजिगीषु अन् ज्ञानोपासक
कर्मयोगि अन् दीनोद्धारक
जागृत जो नित देशरक्षणी त्या मानू हिंदु!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित काव्यामधील एक काव्य.

Sunday, October 27, 2024

सारासार विचार, करी तूं सारासार विचार!

जय जय रघुवीर समर्थ!


सारासार विचार, करी तूं सारासार विचार!ध्रु.

मुळी कल्पना, कण हि सत्य ना
मृगजळासि ना उपाय तरणा 
विवेक करूनी मना माझिया वृत्ती त्वरित सुधार!१ 

शुद्ध आचरण, मधु संभाषण 
उभय सुसंगत, तें सद्‌वर्तन 
सुखदुःखें ही संसारांतुनि असत्य जाण त्रिवार !२ 

कल्पनेतुनी दुःख निर्मिती 
शुद्धज्ञाने लाभे शांती 
देहोऽहं ची फिटता भ्रांती शिवदर्शन घडणार !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.१०.१९७४
खालील श्लोकावर आधारित काव्य


विवेकें क्रिया आपुली पालटावी। 
अती आदरें शुद्ध क्रीया धरावी । 
जनीं बोलण्यासारिखें चाल बापा। 
मना कल्पना सोडि संसार तापा ।।

विवेकाने आपली वागणूक सुधारावी. अत्यादराने शुद्ध आचरण ठेवावे. समाजामध्ये बोलण्यासारखे चालावे. हे मना, केवळ कल्पनेतून निर्माण झालेला संसारताप सोडून दे.

Saturday, October 26, 2024

मज कळू दे हे, भगवंता!

मज कळू दे हे, भगवंता! ध्रु. 

तनमने वाणिने घडले 
ते म्हणू नये 'मी' केले!
तू एकच विश्वनियंता!१

तुझ्यामुळे हा सूर्य प्रकाशे
अमृतकिरणे शशांक वर्षे
चराचरावर तव सत्ता!२

तू चालविसी, तू खेळविसी 
तू बोलविसी, तूच प्रेरिसी 
तू कर्ता अन् करवीता!३

'मी पण' माझे सहज गळावे 
सोऽहं बोधावर मी यावे 
तू सत्संकल्पा दाता!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९/७/१९७४

माळिये जेउते नेले। तेउते निवांतचि गेले।
तया पाणिया ऐसे केले। होआवे गा।।
१२:१२०
(वरील ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या प्रवचनांमधील प्रवचन क्रमांक ११८ वर आधारित काव्य.)

Friday, October 25, 2024

स्वामींची आरती गाऊ! स्वामींस अंतरी पाहू!

स्वामींची आरती गाऊ!
स्वामींस अंतरी पाहू!ध्रु.

स्वरूप आनंद 
सोऽहं चा सुगंध 
भक्तीने, प्रेमाने घेऊ!१

स्वरूप माऊली 
श्रांतास सावली 
छायेत स्वानंदे राहू!२ 

ठायींच निवांत 
साधावा एकांत 
आसनी ध्यानस्थ होऊ!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
स्वामी स्वरूपानंदांवर लिहिलेलं काव्य.

Sunday, October 20, 2024

वेणाचे भाग्य उजळले!

जय जय रघुवीर समर्थ 

विष ते अमृत झाले 
वेणाचे भाग्य उजळले!ध्रु. 

माय तात जरि दूर सारती 
समर्थ प्रेमे धावत येती 
घननीळाने नीलकवच जणु 
कन्येसी घात‌ले!१ 

जननिंदेची नव्हती पर्वा 
देहाचा मग कुठला केवा? 
वेणाचे तर तनमन, अवघे रामपदी वाहिले!२ 

माया तुटली, भ्रांती फिटली
समर्थरूपें माय भेटली 
समर्थ पुढती, वेणा मागे टाकितसे पाउले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०२.१९७४
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित काव्यामधील हे एक काव्य.

Saturday, October 19, 2024

गोंदवल्याला यावे, रामा डोळे भरूनि पहावे!

॥ श्रीराम समर्थ ॥

गोंदवल्याला यावे, रामा डोळे भरूनि पहावे! 
नयनां मिटुनी घ्यावे, नाम गोंदवुनि घ्यावे! ध्रु.

श्वास न जावा नामावाचुन, अशी दक्षता घ्यावी 
श्रीरामाचा दास मारुती 'तो मी' खूण पटावी
प्रत्येकच तन श्रीरामाचे सुंदर मंदिर व्हावे!१ 

माझ्या गुरुचे नाव तुकाई शिकवी सोसायाला 
कठोर वरवर आतुन प्रेमळ अनुभव ऐसा आला 
गावे भावे रामनाम ते तसे गाववुनि घ्यावे!२

अन्नदान बहु रुचते रामा नामाचा मज छंद 
भ्रमर मनाचा सेवतसे नित भजनाचा मकरंद 
मना उलटता नाम जाहले अहोभाग्य समजावे!३

राघव माझ्यासंगे कैसा नित्यच हासे खेळे 
वियोगवेला येता त्याच्या नयनी आसू आले 
अमूर्त भगवंताला आपण नामाने बांधावे!४

'नामासाठी मी अवतरलो' पहा मला नामात 
हनुमंताशी बोला जनहो मनात जे जे येत 
मजला कळते-रामराज्य ते प्रपंचात आणावे!५
 
गोंधळ नामाचा प्रेमाचा लोपावे 'मी माझे' 
रामावरती राहो निष्ठा त्याची सत्ता गाजे 
हनुमंताने मन पवनाला नामे जोडुन द्यावे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
८/१२/१९९४ चंपाषष्ठी (मार्गशीर्ष)

महन्मंगले, देवि, दयावति, कसे तुला गाऊ?

॥ जय माताजी ॥ 

देवीचे स्तवन कसे करावयाचे ? देवीचे ध्यान कसे करावयाचे?
साधकाच्या अत्यल्प शक्तीची, मतीची त्याला जाणीव आहे म्हणूनच तो देवीला कुतूहलाने, विनम्रतेने प्रश्न करीत आहे -
++++++

महन्मंगले, देवि, दयावति, कसे तुला गाऊ? 
शक्तितत्त्व तू विविध स्वरूपी कसे तुला ध्याऊ? ध्रु.

सदाशिवाची तूच पार्वती 
विष्णूसन्निध तुझीच वसती 
रणचण्डी हो तुझीच मूर्ती 
आराध्या तू, योगिजनांची, कुठे तुला पाहू?१ 

तू ज्ञानाची उषा हासरी 
तू वायूची शीतल लहरी 
तू गरुडाची गगनि भरारी 
नसता कसले पुण्य गाठिशी जवळि  कसा येऊ?२

शक्तिसागरा दुरुनि पहावे 
विस्मितचित्ते विनम्र व्हावे 
हृदयमंदिरी तुज स्थापावे 
सामर्थ्याची धाव तोकडी परत कसा जाऊ?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०३.१२.१९७३

Friday, October 18, 2024

आत्ता बसला हादरा

पन्हाळा गडावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते तेव्हा इंग्रजांनी सिद्दी जोहरला तोफा, दारू-गोळा बंदुका आणि गोलंदाज पुरवून मदत केली होती. जे इंग्रज काही महिन्यापूर्वी व्यापाराची परवानगी मागत होते तेच आपल्यावर उलटले. पण महाराज पन्हाळा गडावरून सिद्दी जोहर च्या वेढ्यातुन सही सलामत निसटले आणि काही महिन्यातच इंग्रजांची राजापूरची वखार खणुन काढली आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करून ठेवले होते... त्या प्रसंगावर आधारित काव्य

आत्ता बसला हादरा

तोफ डागली पन्हाळ्यावरी, आत्ता बसला हादरा!
प्रति‌शोधाते शिवनेत्रांतून आयसगोळा सुटला!ध्रु.

सूड घेतल्‍याविना न शांती
टोपिकरांची स्वार्थी जाती
सापापरि हे सहज उलटती
हुकूम दिधला लष्करास झणि दगलबाज हे कैद करा!१

कुदळी लावा, खणा वखारी
जगा आगळे हे व्यापारी
वैऱ्याहुनही घातक वैरी
जेरबंद या करून यांचा सुयोग्य गौरव करा, करा!२

आजवरी जी पापे केली
हिशेब त्‍याचा द्याच या स्‍थली   
जप्ती यांते अता न टळली  
तोंड दावण्या या नच हिंमत, बोलायाते धैर्य जरा!३

मिजास यांची पुरी उतरणे
स्थान तयांचे योग्य दाविणे  
कैदच यांच्‍या नशिबी लिहिणे  
परक्या देशी नसते चाळे जन्मखोड करि घात पुरा!४

(चाल) स्‍वराज्य भांडारी जमू दे सारी संपत्ती
लूट अमीरांची, गरीबा कोणी ना जाचती  
शिलंगणातुन या गवसले सुंदरसे मोती
उपऱ्यांचा परि मऱ्हाटदेशी उतरविला तोरा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

तेव्हा मानव खरोखरी तो साक्षर होईल!

ओवी ऐकणे, ओवी वाचणे जेव्हा साधेल
तेव्हा मानव खरोखरी तो साक्षर होईल!ध्रु.

वाचन आपले आपल्या पुरते 
हळुहळु पोथी कळू लागते 
जे जे कळले हातुन सगळे माउली करवेल!१ 

ही तर संवादाची भाषा
सामंजस्याचीच मनीषा 
विश्वाचे आंगण मग भक्ता आंदण लाभेल!२ 

सद्‌गुरु पुढती बसले असती 
ते तर सगळे वदवून घेती 
उषःप्रभा मग हलके हलके पसरू लागेल!३

प्रपंच परमार्थाची शाळा 
जो तो नकळत शिकू लागला
मनपाटीवर प्रेमाक्षर शिशु गिरवू लागेल!४ 

सोपी सोपी अंकलिपी ही 
घ्यावी शिकुनी जन लवलाही 
ना तर चुटपुट मना शेवटी लागुन राहील!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५ जानेवारी २००४ गुरुवार

Wednesday, October 16, 2024

भगवंताचे नाम घोकणे, भगवंताचे नाम!

भगवंताचे नाम घोकणे, भगवंताचे नाम!ध्रु.

कार्यनाश जगि चिंता करते
कर्तव्याचा विसर पाडते 
मनी जागता भाव ठेवणे "कर्ता प्रभु श्रीराम"!१ 

व्यवहारी सुख कर्तव्याने 
परमार्थी सुख दृढ निष्ठेने 
देव जोडणे ध्येय एकले, वाटचाल अविराम!२ 

मीपण नडते, काम नासते 
शरणबुद्धि एकली तारते
अभिमानासी दूर कराया आळविणे श्रीराम!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६६ (१४ जून) वर आधारित काव्य.

अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोचत. मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे. राम कर्ता असे म्हणावे. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते. परमार्थ करणाऱ्याने कोणाचेही अंत:करण दुखवू नये.  पैसा नसून अडते व तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे. मी कर्ता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम कर्ता आहे ही परमार्थातील पहिली पायरी. जो सद्हेतूने कर्म करतो तोच खरा परमार्थी समजावा.

Tuesday, October 15, 2024

चित्तास करावे नामस्मरणी स्थिर!

चित्तास करावे नामस्मरणी स्थिर!ध्रु.

नाम वदावे, स्वये श्रवावे
रामकीर्तनी रंगुनि जावे 
ते नाम रुचो मुंगीस जशी साखर!१

कल्पनेत परमात्मा आणू 
सगुण करूनी तयास वानू 
मग उतावीळ ही चित्त होतसे धीर!२

सर्वाभूती ईश्वर दिसता 
नुरेल थारा कसला द्वैता 
ही समाधीच की आणिल नयनी नीर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०५.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५ (५ जानेवारी) वर आधारित काव्य.

नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही? त्यासाठी काय करावे? विचार येतील तसे जातील, तिकडे लक्ष देऊ नये. नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे, म्हणजे एकाग्रता होण्याला मदत होईल. मनुष्य अगदी एकटा असला तरी, अगर एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो. कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा व तेथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाचे प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी म्हणजे आपणास त्याचे ठिकाणी एकाग्र होता येईल. सर्वाभूती भगवद्भाव पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन. सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वैत कोठे राहिले? व जेथे द्वैत गेले तेथे आपोआप एकाग्रता आलीच. अशी एकाग्रता साधते तीच खरी समाधि होय.

Sunday, October 13, 2024

स्मरावा राम सर्व काळी!

स्मरावा राम सर्व काळी!ध्रु.

राम माउली, राम सावली 
परमार्थाची राम वाटुली 
नामाला भुलली!१ 

मन आवरिण्या यत्न करावा 
ठेवुनि हृदयी सख्या राघवा 
गाऊ नामावली!२ 

राम स्मरणे मर्म एकले 
त्या नामासी म्हणूनि धरले 
चिंता मग कसली?३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३६० (२५ डिसेंबर) वर आधारित काव्य.

"भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही" असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.

Saturday, October 12, 2024

नाम हाच भाला, रोखण्या विषयाचा घाला!

नाम हाच भाला, रोखण्या विषयाचा घाला!ध्रु.

नामावर विश्वास ठेवता 
नाम सदोदित कंठी धरता
नामि राहता, नामि रंगता रामरूप झाला!१

सत्संगति नामेच लाभते
नामोच्चारे भवभय पळते
नाम बोलता, नाम ऐकता, प्रिय व्हा रामाला!२

काळ काहिही करू धजेना 
विषयसर्पही डंख करेना 
नाम गर्जता, डंका पिटता राम मधुर हसला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १८१ (२९ जून) वर आधारित काव्य

परमार्थाचा अनुभव वाढीस लागण्याकरताच पुण्यतिथी साजरी करावी. पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधी ठरवा. नामात राहण्याचा प्रयत्न करा. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कलि मातत चाललेला आहे; त्याचा घाला चुकविणे असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणी काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. विषयांची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून नामात सत्संगतीही आहे. मायेने आपल्यावर विषयास्र सोडले की आपण त्यावर उलट भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे, म्हणजे विषय आपोआपच नाहीसा होईल.

Friday, October 11, 2024

प्रपंच सुख नच देतो, कळता, हाव कमी होते!

प्रपंच सुख नच देतो, कळता, हाव कमी होते!ध्रु

प्रारब्धे हा प्रपंच आला 
कर्तव्याचा भाग मानला
लोभ सरतसे थोडा थोडा, आसक्ती सुटते!१ 

समाधान भगवंतापाशी 
तिथे तिथे सौख्याच्या राशी
राम एक मानता आपुला वाट दिसू लागते!२ 

अज्ञानाची काजळरात 
मावळताक्षणि फुटे पहाट 
सोऽहं, सोऽहं वायुलहर ही शीतलता देते ! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८५ (२५ मार्च) वर आधारित काव्य. 

प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे; म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल व नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू.  प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका.  तसेच प्रपंचात समाधान हा फायदा आहे तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? कैदेतील माणसाला 'मी सुखी आहे ' असे कधी वाटेल का? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते, परंतु शहरातील लोक केवळ अभिमानामुळे व खेड्यातील लोक अज्ञानामुळे जसे वागावयास पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहून सुद्धा भगवंताचे प्रेम व समाधान आम्हास कसे मिळवता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही.

Thursday, October 10, 2024

मुरलीधर माधव आला! गीतेत 'मुरावे' वदला !

मुरलीधर माधव आला! 
गीतेत 'मुरावे' वदला ! ध्रु. 

श्रीगीता गंगासरिता 
घालिते न्हाऊ तुज आता 
श्रीकृष्ण बनवितो चेला! १ 

या मनास सुमन करावे
श्रीहरिचरणी अर्पावे 
उद्धार तुझा बघ झाला!२

वसुदेवसुतकरी वेणू 
त्या गोपाळाची धेनू 
हरिपदा चाटते कपिला!३ 

गीतेच्या अभ्यासाने 
घे दर्शन तू नेमाने 
ना खंड पडो ध्यानाला! ४ 

सोऽहं हे गीतासार 
जीवना खरा आधार
ना तुलना तव भाग्याला!५ 

जय कृष्ण कृष्ण तू म्हणता 
नावरेल गहिवर चित्त
श्रीराम वरित मौनाला!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.१२.२००८

दत्ता दिगंबरा यावे


दत्ता दिगंबरा यावे 
माझ्या मना सुधारावे!१

दत्ता दिगंबरा यावे 
संगती आपण चालावे!२

दत्ता दिगंबरा यावे 
भस्म ते स्वकरे लावावे!३

दत्ता दिगंबरा यावे 
संकटी सुशांत ठेवावे!४

दत्ता दिगंबरा यावे 
उंबराखाली बसवावे!५

दत्ता दिगंबरा यावे 
गायन आम्हा शिकवावे!६

दत्ता दिगंबरा यावे 
आशा समूळ खंडावी!७

दत्ता दिगंबरा यावे 
फिरस्ता मजला बनवावे!८

दत्ता दिगंबरा यावे 
उराशी आम्हा कवळावे!९

दत्ता दिगंबरा यावे 
चांगले ते ते लिहवावे!१०

दत्ता दिगंबरा यावे 
मागणे सगळे थांबावे!११

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
शुक्रवार ११ मार्च २००५

Sunday, October 6, 2024

मुक्तात्मा

 मुक्तात्मा

आहारं सात्त्विकं कृत्वा । रमेत् कृष्णचिन्तने ।। 
सात्त्विकः स हि मुक्तात्मा । तस्य शत्रुः करोति किम् ? ।। 

अर्थ - 

आपला आहार सात्त्विक ठेऊन श्रीकृष्ण चिंतनात नेहमी रमून जावे. असा माणूस सात्त्विक आणि मुक्तात्माच होय.  शत्रू त्याचे काय अकल्याण करू शकणार ?

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गीतादर्शन

करोकरी गीता घरोघरी दिवाळी !

करोकरी गीता घरोघरी दिवाळी !

गीतामृतं सदा पेयम् । श्रद्धया परया मुदा ।। 
तदा दीपोत्सवो मन्ये । प्रारब्धोऽयं गृहे गृहे ।।
 
अर्थ-

मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने गीतामृत नेहमीच प्यावे. त्या वेळेस मला तर असे वाटते की घराघरातून दीपोत्सव सुरु झाला आहे.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
दीपावली १९८५ गीतादर्शन

Saturday, October 5, 2024

गीतेचा लावत छंद!

गोविंद ! गोविंद ! गोविंद ! 
गीतेचा लावत छंद!ध्रु. 

गीता गाता गोपाळाची 
बेडी तुटते संसाराची 
गीतागायन आनंद!१ 

हृदयी होतो अवतीर्ण 
करतो भक्ता उत्तीर्ण 
हा नंदाचा आनंद!२

कधि बन्सीधर कधी चक्रधर
धर्मरक्षणा सदैव तत्पर 
तत्त्वाचा दे मकरंद!३ 

गोपांसंगे दहिदुधकाला 
समरसतेचा सुखद सोहळा 
देवकिनंदन गोविंद!४

कर्तव्याचे पालन करणे 
फलाशेत ना गुंतुन पडणे 
स्थितप्रज्ञ परमानंद!५ 

कधी सूक्ष्मसा कधी भव्यसा 
सोऽहं ऐसा धरा भरवसा 
इथे तिथे गोविंद!६ 

गीतादर्शन माधवदर्शन 
माधवदर्शन स्वरूपदर्शन 
नकळत गळला भवबंध!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२५.१२.२००८ गुरुवार

भाग्य माझे, ज्ञानराजा, करित मम समजावणी!

भाग्य माझे, ज्ञानराजा,
करित मम समजावणी!ध्रु.

भोगले त्याने असे जे, वानण्याला शब्द नाही 
माय नसता, तात नसता, माउली होऊन राही 
चार भावंडेहि करती धर्मक्षेत्री लावणी!१ 

चालणे त्यांचेच यात्रा, बोलणे ही वेद ते 
जाणण्याचे जे स्वये ते ज्ञानियाला ज्ञात ते 
चरित सारे चित्रमय ते दंग होतो चित्रणी!२ 

काय वानू थोरवी हो मौन होते वैखरी
वदन माझे हेच वदते 'श्रीहरि जय श्रीहरि'
चार नक्षत्रे जणू की विष्णुमयशी दर्शनी!३ 

वाचनी ज्ञानेश्वरी जर भाग्य याहुनि कोणते? 
भाग्य छे सौभाग्य ते अबिर कुंकुम वाटते 
धन्य सारी तीर्थक्षेत्रे आपल्या घरि येउनी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०३.१२.२००८ बुधवार

गीता कळते गाता गाता श्रद्धेने अभ्यास चालता

गीता कळते गाता गाता 
श्रद्धेने अभ्यास चालता!ध्रु.

गीते झरझर लिहिली जाती 
चाली भावानुकूल सुचती 
अंगी येई पार्थयोग्यता!१ 

संस्कृत भाषा बोजड नाही 
प्रेमाने सवयीची होई 
तृषा भागवी ही सुरसरिता!२
 
धर्म, सत्य नि कशी अहिंसा 
सुंदर ऐसी ती मीमांसा 
"तो मी" कळते बघता बघता!३

कर्ता मी हा गर्वच नाही 
फळ मजला हव्यासच नाही 
जरामरण याची ना चिंता!४

द्वंद्वे सरली त्रिगुण लंघिले 
भाग्य उजळले, भाग्य उजळले 
धर्म तिथे जय खात्री पटता!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१ ऑक्टोबर २००४
शुक्रवार, भाद्रपद संकष्ट चतुर्थी

भगवंत नांदतो निर्हेतुक नामात!

हे शब्द कोरुनी ठेव अंतरंगात 
भगवंत नांदतो निर्हेतुक नामात!ध्रु.

कर्मास हेतुचा स्पर्श नसो
हृदि भगवंताचा ध्यास असो 
उद्धार कराया सिद्ध प्रभूचा हात!१

जरी विषय लाभ झालेला 
परमात्मा सुदूर गेला -
इतिहास बोलका ठेव सदा ध्यानात!२

सद्वर्तन, निष्ठा श्रीरामी
मग समाधान अंतर्यामी 
भगवंत गुंततो निस्वार्थी प्रेमात!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
 
गोंदवलेकर महाराज यांची चरित्र मधील प्रवचन क्रमांक ५३ (२२ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो हेतूवर सर्व काही आहे. पुष्कळ पुण्यकर्मे केली, आणि काही तरी विषयाचा हेतु मनात धरला, तर काय उपयोग? मन जोपर्यंत तेथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग.  निर्हेतुकात भगवंत असतो, म्हणून आपली कर्मे तशी करावीत. आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो व भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो, याला काय करावे? उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून "तू भेटलास आता मला काही नको," अशी वृत्ती झाली पाहिजे, तरच मीपणा मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहेच; आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. सुख हे कोठून उत्पन्न करावयाचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. जसा "मी" भगवंताचा आहे तसे "सर्वजण" भगवंताचे आहेत. म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल. लोकांना सांगणे जेथे बंद होते तेथेच काही कृतीत येऊ लागेल. कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात काहीच शंका नाही.

नाते नवलाचे - गीतेचे

नाते नवलाचे-गीतेचे

गीता नाम मनुष्याणां । काचित् आश्चर्य बन्धुता । 
बद्धा यया प्रहृष्यन्ति । मुक्तास्तिष्ठन्ति स्थाणुवत् ।। 

अर्थ-

गीता हे व्यक्तीव्यक्तींना जोडणारे आश्चर्यकारक असे नाते आहे. या नात्याची जाणीव झाली की माणसांना हर्ष होतो आणि बंधुत्वाची कल्पनाच नसली तर माणसे खांबासारखी खिळून राहतात.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गीतादर्शन सप्टेंबर १९८४

हात कसे हे!

हात कसे हे!

कराभ्यां क्रियते कर्म 
दानं योग्याय दीयते। 
लिख्यते शुभसाहित्यम् 
प्रभाते करदर्शनम्।।

अर्थः 

हेच ते दोन्ही हात काम करणारे, भरभरून दान देणारे आणि संस्कारक्षम साहित्य लिहिणाराही हातच - अशा हातांचे दर्शन प्रभातकाली घ्यावे.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(०९.०६.१९८५ रोजी तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले सुभाषित)

Friday, October 4, 2024

हवा प्रपंच ज्याला त्याला परि हवा देव कोणाला?

हवा प्रपंच ज्याला त्याला 
परि हवा देव कोणाला?ध्रु.
 
प्रपंच भासत खरा 
भुलवित परि तो नरा 
देवाविषयी का न भरवसा-? 
प्रश्न मला पडला!१ 

वृत्ति न स्थिर राहते 
भोवऱ्यापरि ती गरगरते - 
अधिष्ठान का ठाम न घेते?
जो तो भरकटला!२ 

मनुज बरा मध्यम 
साधना घडेल जर उत्तम 
याच नराचा हो नारायण -
अतर्क्य प्रभुलीला!२ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६९ (९ मार्च) वर आधारित काव्य.

देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कोणीच म्हणत नाही. सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव 'असला तरी चालेल' म्हणजे प्रपंच तेवढा खरा असं ते मानून चालतात. देवाविषयी त्यांच्या मनात संशय असतो. मात्र वृत्ति कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढी लबाडी आपल्यामध्ये असावी. पण आपण स्वतः लबाडी करू नये. लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे. व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतील माणसे जास्त भेटली. ती व्यवहाराला व संगतीला फार चांगली असतात कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात.

Wednesday, October 2, 2024

सर्वसत्ताधीश जरी भगवंत अडकतो सहज नामजालकात!

सर्वसत्ताधीश जरी भगवंत 
अडकतो सहज नामजालकात!ध्रु.

भ्रमर कठीण तुळइ पोखरी 
कमळात झाला बंदिवान परी 
तैसा राम आहे नामाचा अंकित!१

नाम घेइ जो, जो, रामाचाच होतो
तयापाठि राम शोध घेत येतो 
नाम जपण्यात सामर्थ्य अनंत!२

बुद्धि पालटावी म्हणुनि नाम घ्यावे
विषय विस्मरावा म्हणुनि नाम घ्यावे
नामाची धरावी अखंड संगत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३३ (२ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

भगवंत सर्वसत्ताधीश खरा, पण एका बाबतीत तो अगदी लुळा पांगळा होतो. नामरूपी जाळ्यात तो सहज अडकतो. भगवंताचे नाव जो घेतो त्याचा शोध घेत भगवंत त्या इसमाचे मागोमाग जातो. म्हणजेच जो नाम घेतो त्याचे जवळ भगवंत असतो. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. नाम म्हणजेच भगवंत होय. सद्बुद्धि उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे.

श्रीनारायण प्रसन्न होता..

श्रीनारायण प्रसन्न होता
गेली निर्धनता, आली आली प्रसन्नता!ध्रु.

कृपा हरीची ऐशी झाली 
लक्ष्मी पाणी भरू लागती
हसली भाविकता!१

अटळ ठेविता नेम नि निष्ठा 
प्रसन्न श्री हरि बघता बघता 
फुलली सात्त्विकता!२

पूजन करिता दुःख ओसरे 
काळे केले घन अंधारे 
उदया ये सविता!३

अनंत हस्ते देत रमावर
कृतज्ञता हो आज अनावर 
तनु पुलकित आता!४

व्रत सांगे तो श्रीनारायण 
सत्य सत्य तो श्रीनारायण 
दावि भक्तिवाटा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जुलै १९८२