Saturday, October 26, 2024

मज कळू दे हे, भगवंता!

मज कळू दे हे, भगवंता! ध्रु. 

तनमने वाणिने घडले 
ते म्हणू नये 'मी' केले!
तू एकच विश्वनियंता!१

तुझ्यामुळे हा सूर्य प्रकाशे
अमृतकिरणे शशांक वर्षे
चराचरावर तव सत्ता!२

तू चालविसी, तू खेळविसी 
तू बोलविसी, तूच प्रेरिसी 
तू कर्ता अन् करवीता!३

'मी पण' माझे सहज गळावे 
सोऽहं बोधावर मी यावे 
तू सत्संकल्पा दाता!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९/७/१९७४

माळिये जेउते नेले। तेउते निवांतचि गेले।
तया पाणिया ऐसे केले। होआवे गा।।
१२:१२०
(वरील ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या प्रवचनांमधील प्रवचन क्रमांक ११८ वर आधारित काव्य.)

No comments:

Post a Comment