भाग्यवंत तो राहि जयासी
भगवंताचे अनुसंधान!ध्रु.
भगवंताचे अनुसंधान!ध्रु.
देहबुद्धिचे मूळ वासना
द्वंद्व निर्मिते मनी वासना
ती निपटाया नाम जणू की रघुनाथाचा आहे बाण!१
प्रपंच जरि नेकीने केला
अभिमानाने बंधन ठरला
बंधन सुटण्या, शस्त्र एकले, भक्ती म्हणती तया सुजाण!२
जन्मा कारण अंति जी मती
राम असावा वचनी चित्ती
भगवद् भक्ती तनी मुरण्याते सोऽहं सोऽहं पूरक ज्ञान!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५६ (४ जून) वर आधारित काव्य.
आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला? असे काही जण विचारतात. प्रपंच सचोटीचा जरी असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. जो विषयांना चिकटून राहतो त्याला त्यांचे सुखदुःख सोसणेच भाग असते. राम कर्ता म्हटल्याशिवाय, किंवा अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. जो त्या वासनेला मारतो तोच परमार्थाला लायक होतो. भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ति स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.
No comments:
Post a Comment