Sunday, August 10, 2025

श्रीरामकथेचे चिंतन करता करता श्रीराम जाहलो गीती गाता चरिता!

श्रीरामकथेचे चिंतन करता करता 
श्रीराम जाहलो गीती गाता चरिता!ध्रु.

'देहात राम' या देहच मंदिर आहे
सद्विचार स्फुरवी तोच अंतरी आहे 
हे जीवन गमले असते सत्याकरता!१

इंद्रिये जिंकता व्याकुळ दशरथ होतो
'श्रीराम हवा मज' माश्यासम तडफडतो 
अनुताप करी मज पावन बघता बघता!२

मज नाम अनावर नकळत कितिदा होते 
मन पवनासंगे गगना जाउन मिळते
श्रीराम चालवी भक्तिपथावर आता!३

धनकनककामिनी कांचनमृग हे सारे
'भुलु नको व्यर्थ रे' सावध करती सारे 
दक्षता अशी ही हवीच शीला करता!४

कर्तृत्व न अपुले श्रेय सर्व रामाचे 
ते उदात्त सुंदर वर्तन त्या भरताचे
श्रीरामपादुका नयनी झरवित सरिता!५

जे ज्याचे त्याला देता लाभे शांती-
जो विरक्त आतुन त्याची उमले भक्ती
शबरी हो ऋषि जणु बोरे रामा देता!६

तो रावण टपला सत्त्व हरण करण्याला 
मी हवे शिकाया सीमांना जपण्याला
बिंबतात तत्त्वे श्रीरामायण जगता!७

कर्तव्य कर्म ते लक्ष लावूनी करणे
मग अमन मनाचे सौमित्रासम होणे
श्रीरामानुज आदर्शच सेवेकरिता!८

षड्‌विकार शत्रू, त्यांचे दमन करावे
शत्रुघ्न तसा मी - मजला बनता यावे
असुनीहि नसावे उत्सुक शिकण्याकरता!९ 

जे कठोर ते कर्तव्यच जीवन असते
ते चुकारपण तर निश्चित मृत्यू असते
भक्ताचे जीवन मजला येवो जगता!१०

या मातृभूमिवर शतदा प्रेम करावे
सोन्याची लंका असो न मोहित व्हावे
मातीशी इथल्या अतूट नाते जुळता! ११

श्रीरामायण हे कितिदा गावे ध्यावे
नित नवेच मजला आकर्षण वाटावे
ते शिकवी जगण्या जीवनातली गीता!१२ 

तुज काय व्हायचे ठरव मानवा आधी
भवितव्य दिव्य मग तुझ्याच आहे हाती 
श्रीयत्नदेव मज खुणवी यत्नाकरता!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.०४.१९९०