Sunday, August 17, 2025

रामनाम ना सोडू जोंवर तनि शेवटचा श्वास!

ठेवुनि रामी पूर्ण भरवसा, पाळू कर्तव्यास! 
रामनाम ना सोडू जोंवर तनि शेवटचा श्वास!ध्रु.

पदीं माथा टेकतांना 
उचंबळती भावना
प्राजक्ताची फुले सांगती आम्हापरी तू हास!१

निष्ठा हवि बालक ध्रुवाची 
विष्णुभक्त श्रीप्रल्हादाची
गोपी बनुनी सगळ्या वृत्ती खेळतील का रास?२

बालक असले जरी अवगुणी
माय न ठेवी पान्हा चोरुनि
उदंड राहो रामी निष्ठा व्हावा भ्रांतिनिरास!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २३० (१७ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केल्यास तुम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर, जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशावेळी रामास सांगावे, "रामा! आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन, परंतु माझा अव्हेर करू नकोस, मी तुला शरण आलो आहे".  तुमचा हा विश्वास, ही निष्ठा अशीच कायम ठेवा अगदी शेवटच्या घटकेपर्यंत देवाच्या स्मरणात राहा.  निष्ठेचा परिणाम फार मोठा आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल.

No comments:

Post a Comment