Thursday, October 22, 2015

भूपाळी - प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी



भूपाळी - प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी

अल्बम : अण्णांची गाणी
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
गायक : श्री चारुदत्त आफळे
ध्वनीमुद्रण : साउंड व्हिजन स्टुडीओ, पुणे

प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी
सोऽहं घोषचि घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.

माझे माझे लोप पावु दे तुझे तुझे उगवु दे
कोण असे मी? तो मी, तो मी सहजपणे कळु दे
प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।१

दृष्टि निवळु दे तिमिर जाऊ दे आशीर्वाद हवा
अभ्यासाचा या भजनाचा छंद जडु दे जिवा
सुमने सु-मने अर्पण व्हावी कृपा करा सत्वरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।२

रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव
करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव
हरिमय होउन अम्हां जाणवो हरिमय नरनारी 
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।३

उदात्त उन्नत पावन मंगल जीवन हे व्हावे
सोऽहं सोऽहं म्हणता म्हणता ममत्व संपावे
सोऽहं फुंकर भरा बनू द्या या देहा बासरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।४

जवळ घेउनी शिकवा गीता ओढ अशी लागली
घास सानुले करुनी भरवा आम्हा गुरुमाउली
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जपो सदा वैखरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।५

द्वंद्व न उरले दु:ख संपले अनुभव हा यावा
तिमिर मावळे गगन उजळले जाणवु दे गारवा
चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।६

स्वागत करतो सद्गुरुराया उमलो जीवनि उषा
कृपाप्रसादे स्वामी अपुल्या शमु दे सगळी तृषा
भक्तवृंद हा प्रसन्न वदने विनम्र वंदन करी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।७

प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी
सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।



20 comments:

  1. Is there a translation of this poem. If so please share. Thanks

    ReplyDelete
    Replies
    1. Aa manas pooja che

      Delete
    2. खुप सुंदर भूपाळी शमिका ने गायन पण छान केले आहे.फक्त दुसरी ओळ अर्थ सोहम घोषची घुमत रहावा ..गाभारी सांगाल

      Delete
  2. "अभ्यासाचा या भजनाचा" कि "अभ्यासाचा या वचनाचा"?

    ReplyDelete
    Replies
    1. अभ्यासाचा या भजनाचा आहे. वचनाचा नव्हे.

      Delete
  3. वर दिलेले शब्द आणि व्हिडीओ मधील टायटल्स मध्ये फरक आहे.. ह्रस्व दीर्घाच्या चुकाही आहेत.. कृपया स्वामींनी सांगितलेले शुद्ध स्वरूपातील काव्य लोकांपर्यन्त पोचवावे.

    ReplyDelete
  4. हे स्वामींचे काव्य नाही.

    ReplyDelete
  5. स्वामी स्वरूपानंदांवर रचलेली भूपाळी आहे

    ReplyDelete
  6. I like “Abhyasacha ya vachanacha chand jadu de jiva”

    ReplyDelete
    Replies
    1. सोहं साधनेला स्वामी भजन म्हणत असत म्हणून अभ्यासाचा या भजनाचा..

      Delete
  7. Interested in the English translation of this song

    ReplyDelete
  8. Please give an English translation of the above.

    ReplyDelete
  9. Nice, Like verymach. 🚩🙏

    ReplyDelete
  10. अत्यंत सुमधुर शब्द वापरले आहेत त्यामुळे काव्य थेट मनात घुसते. रसाळ काव्य! अप्रतिम

    ReplyDelete
  11. फार छान गायन Feel like listening again and again every early mornings!!!

    ReplyDelete
  12. विरेंद्र पाटीलJuly 17, 2024 at 8:45 AM

    सुमधुर काव्य ऐकतच राहावे असे वाटते

    ReplyDelete
  13. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी रचलेली एक सुंदर भूपाळी वाचनात, व ऐकण्यात आली.....

    गाणगापूरच्या पुढे कडगंजी येथिल देवस्थानात रोज सकाळी ही भूपाळी म्हटली जाते....

    काय सुंदर शब्द रचना आहे...


    *मला जमली तशी त्याची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे*...

    *काहीं चुकल्यास दुरुस्ती सुचवावी*.

    सोबत शमिका भिडे यांनी म्हटलेली भूपाळी पाठवत आहे, डोळे बंद करून ऐका व अनुभव घ्या...

    🙏🙏


    प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी

    सोऽहं घोषचि घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.

    आयुष्याची प्रभात झाली, मनाच्या गाभाऱ्यात यावे गुरुनाथा आणि माझ्या मनात,तेजाचा दिवा पेटवावा आणी तुझ्या नावाचा जयघोष माझ्या मनात सतत घुमत रहावा...

    माझे माझे लोप पावु दे तुझे तुझे उगवु दे

    कोण असे मी? तो मी, तो मी सहजपणे कळु दे

    प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी

    सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।१

    सारखे सारखे हे माझे ते माझे असे माझ्या मनात चालले आहे ते तुझ्या कृपेने लोप पावू देत, आणि माझ्या जवळी जे जे आहे ते तुझे आणि तुझेच म्हणुन मनाचे भाव उमटू देत. मी कोण आहे माझी उत्पत्ती कशासाठी आहे हे मला सहजपणे कळू देत. प्रसन्नतेने माझे मन सदैव भरलेले असावे आणि त्याची खूण माझे चेहऱ्यावर दिसू देत, आणि माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुझ्या नावाचा जयघोष घुमत रहावा...



    दृष्टि निवळु दे तिमिर जाऊ दे आशीर्वाद हवा

    अभ्यासाचा या भजनाचा छंद जडु दे जिवा

    सुमने सु-मने अर्पण व्हावी कृपा करा सत्वरी

    सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।२

    आयुष्या कडे पाहण्याची माझी नजर सकारात्मक असू देत, माझ्या दृष्टी तील अंध: कार दूर करावा असा मला आशीर्वाद द्यावा, तुझ्या व्यासंगाची व भजनाचा छंद मला जडू देत, तुला चांगल्या भावनेने पुष्पे अर्पण करण्याची कृपा माझ्यावर व्हावी,आणि माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुझ्या नावाचा जयघोष घुमत रहावा...

    रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव

    करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव

    हरिमय होउन अम्हां जाणवो हरिमय नरनारी

    सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।३

    तुम्हीच राम तुम्हीच कृष्ण, तुम्हीच राम तीर्थ आहात, तुम्हीच , ज्ञानदेव तुम्हीच करुणाकर तुम्हीच आहात, कृपावंत तुम्ही तुम्हीच वासुदेव आहात, त्यामुळे आम्ही हरीमय होवूनी आम्हाला हरीमय झालेल्या नरनारी यांच्या मध्ये सामावून जावू द्यात आणि माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुझ्या नावाचा जयघोष घुमत रहावा...

    उदात्त उन्नत पावन मंगल जीवन हे व्हावे

    सोऽहं सोऽहं म्हणता म्हणता ममत्व संपावे

    सोऽहं फुंकर भरा बनू द्या या देहा बासरी

    सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।४

    माझे जीवन हे महानतेने भरलेले, जिवनात पुढे पुढे जाणारे माझा उद्धार करणारे मंगलमय व्हावे, तूझ्या नावाचा जयघोष करता करता माझ्यातील मी पण संपावे आणि तूझ्या नामाचा जयघोषाची फुंकर मारून माझ्या देहाचे बासरीत रूपांतर व्हावे आणि तुझ्या नामाचा जयघोष माझ्या मनाच्या गाभाऱ्यात सैदैव घुमत रहावा.

    जवळ घेउनी शिकवा गीता ओढ अशी लागली

    घास सानुले करुनी भरवा आम्हा गुरुमाउली

    राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जपो सदा वैखरी

    सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।५

    मला गीते मर्म समजून घेण्याची जिज्ञासा लागली आहे, तरी गुरू महाराज मला जवळ घेऊन गीतेचे तत्त्वज्ञान शिकवावी, गीतेतील मर्म लहान लहान करून आम्हाला भरवावे, माझे श्वसन हे राम कृष्ण राम कृष्ण असा जपाचा अखंड नामघोष करत राहो आणि तूझ्या नामाचा जयघोष माझ्या मनाच्या गाभाऱ्यात सदैव घुमत रहावा...

    द्वंद्व न उरले दु:ख संपले अनुभव हा यावा

    तिमिर मावळे गगन उजळले जाणवु दे गारवा

    चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी

    सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।६

    कोणतेही जड आणि चेतन अवस्था उरली नाही, सर्व दू: खे लोप पावली असा मला अनुभव द्यावा, अंध:कार दुर व्हावा, संपुर्ण मनाचा गाभारा उकळून निघावा आणि मनाला सुखद गारवा जाणवावा, ज्या ज्या माझ्या मनात तुझ्या विषयी गोड अमृत मयी भावना आहेत त्या त्या माझ्या कृतीत याव्याततुझ्या नामाचा जयघोष माझ्या मनाच्या गाभाऱ्यात सैदैव घुमत रहावा.

    स्वागत करतो सद्गुरुराया उमलो जीवनि उषा

    कृपाप्रसादे स्वामी अपुल्या शमु दे सगळी तृषा

    भक्तवृंद हा प्रसन्न वदने विनम्र वंदन करी

    सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।७

    सद्गुरू राया तुझे मी स्वागत करतो, माझ्या जीवनातील प्रात: काल अशीच उगवू दे, आणि आपल्या कृपा प्रसादाने माझी ईश्वर प्राप्तीची तहान अशीच भागवू दे, सगळे भक्त मंडळी प्रसन्न वदनाने तुला विनम्र वंदन करता आहेत, तुझ्या नामाचा जयघोष सगळ्या भक्तांच्या मनाच्या गाभाऱ्यात सैदैव घुमत रहावा.

    प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी

    सोऽहं घोषची घुमत रहावा मानसगाभारी ।

    आयुष्याची प्रभात झाली, मनाच्या गाभाऱ्यात यावे गुरुनाथा आणि माझ्या मनात,तेजाचा दिवा पेटवावा आणी तुझ्या नावाचा जयघोष माझ्या मनात सतत घुमत रहावा...

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. 🙏🙏
      "रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव" म्हणजे तुम्हीच रामकृष्ण (परमहंस), तुम्हीच (स्वामी) रामतीर्थ आणि तुम्हीच ज्ञानेश्वर माऊली असा असावा..

      Delete
    2. अभ्यासाचा या भजनाचा छंद जडु दे जिवा
      म्हणजे सोऽहं भजनाचा आणि सोऽहं ध्यानाच्या अभ्यासाचा मला छंद जडू दे असा अर्थ असावा.

      Delete