Sunday, July 15, 2018

महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

गडावरुनि अजुनि नच सुटला तोफेचा गोळा....
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!ध्रु.

तळपलेत येथे भाले
झेलण्या शिरावर घाले
रणकंदन तुंबळ चाले
रुधिरांत मावळे न्हाले
एक एक क्षण अतां भासतो युगसमान झाला!
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

या गजापुराच्या खिंडी
फुटु न दिली आम्ही कोंडी
पोचण्यास गडी शिवदिंडी
मी ठाण या स्थळी मांडी
कर्तव्यपालनी उणा तर नव्हे आत्मा कळवळला
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

छातीचा करुनी कोट
रोकले सागरी लोट
क्रोधात थरथरे ओठ
गिळला न जळाचा घोट
आतुरता दाटे या कानी अजुनी ना ध्वनि आला!
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

तोच ये कुठुनशी कानी
धऽधऽऽ  घुमत घनवाणी
मी कृतार्थ मजला मानी
नयनात साठते पाणी
चरणांशी अपुल्या रुजु व्हावा, भक्तिभाव भोळा!
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment