गोंदवलेकर महाराजांची गाऊ आरती! गाऊ आरती!
अमृतधारा पिउनी हरखे हृदयाची धरती!ध्रु.
आपुल्या हृदयाची धरती!
नाम रसायन औषध नामी निर्मळ होण्याला
स्वभाव बदले, मधुरपणा ये बोलाला कृतिला
सद्गुरुचरणी सगळी तीर्थें निवास करताती!१
दुजें न कोणी ठसे जधि मनीं भय सगळे सरले
एकपणाचा अनुभव देण्या भक्तिकमळ उमले
'राम कृष्ण हरि' नाम साधवी ध्यानातहि प्रगती!२
पुन्हां पुन्हां हे भाविक डोळे भरभरूनी येत
सारे सात्त्विक भाव वेगळ्या जगांत नेतात
अभावितपणे कृतज्ञतेने कर माझे जुळती!३
जरि न पाहिलें नामयोगि हे अंतरात आले
आले हृदयासनी माझिया हळूच ते बसले
महाराज मग बहुविध सेवा करवुनिया घेती!४
घर मज गमले, श्रीगोंदवले झाला आनंद
भजनसोहळा पुरा रंगला दे मग आल्हाद
दर्शन नाम, प्रसाद नामच सदगुरु देताती!५
"मी तुमचा हो, तुम्हीं माझे" अनुभव हा द्या हो
रामरूप जग महाराज हो मम दृष्टी पाहो
नामीं रति द्या भजनि रमाया द्या अंतःस्फूर्ति!६
नाम नि नामी एकरूप जधि रामनाम एक
चिंतन देई आणुनि ध्यानी ज्ञानाची मेख
श्रीरामाला लावा हृदयी ठेवा कर माथी!७
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराजांची आरती (audio)
No comments:
Post a Comment