Wednesday, January 30, 2019

सांगता..

विराम नच हा तुझ्या जीविता
ही यज्ञाची आज सांगता!ध्रु.

ज्योत तुझ्या जी अंतरातली
रामचिंतनी जरी निमाली
अता तेवतिल लक्ष ज्योती
उजळतील त्या साऱ्या जगता!

वसन पुराणे जसे फेकणे
झिजल्या देहा तसे त्यागणे
देहांतर स्वाभाविक मनुजा
ठाउक होते तुझिया चित्ता!

जगायचे तर जगतासाठी
मरायचे ही जगतासाठी
अवघे जीवन रामसमर्पित
तनु अमुची ही गिरविल कित्ता!

आसमंत दरवळे परिमले
खोड चंदनी अनली जळले
तव रक्षेचा पुनीत कणकण
वितरत जगती विक्रमवार्ता!

विनाशात निर्मिती हासते
त्यागांती आराध्य लाभते
धन्य मोहना प्राण अर्पुनी
तुवा दिधलि मरणा अमरता!

क्षमा तयांना जे जे चुकले
दयाघना ही तुझीच बाळे
त्यांच्यासाठी कर जुळलेले
रामनाम मुखि उमटत असता!

जय शांती जय जय सात्त्विकता
जय ऋजुता जय जय मानवता
अरुणोदय होणार निश्चये
सत्संकल्पे तम ओसरता!
ही यज्ञाची आज सांगता!

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment