Thursday, July 3, 2025

पोवाडा श्रीगुरुदेवांचा


गुरुदेव रानडे आले निंबाळ घराला केले
चल पोवाडा गा म्हटले। गुरुचरित असे उलगडले!ध्रु.

कट्टाने घेता नाम। या जिवा मिळे आराम 
सदगुरु घेववी नाम। भूमिका राहु दे ठाम
काळजी नको, भवभीति नको, जग आत्मानंदे भरले!१

आनंद आत बाहेर, सदगुरुकृपाही थोर
ओसरे सर्व काहूर, भक्तीचा आला पूर
वैराग्य भले, सवयच बनले, या मनास उन्मन केले!२

ना नेम न निष्ठा काही, तरी भाव गुरुपदी राही 
नित घेरी मजला येई, मस्तकही हलके होई
अभ्यास घेत गुरु हात धरत, चालवी नेम जग बोले!३

ना घेती जेथे नाम, तेथे न जरा आराम 
ते स्मशान कसले धाम, माणसे जिथे बेफाम 
घे रामनाम अवतरे राम, मन भाऊ त्याला बोले!४

भक्ती जर उदया आली, तो दसरा तीच दिवाळी 
जी ज्योत घराला उजळी, ती गुरुकृपा शुभ काळी 
ते बळ येते तुज हित सुचते, विश्वासे मम मन बोले!५

ज्ञानेश्वर मजशी बोले, तो नामदेवही बोले
पैठणात नाथे नेले, सज्जनगड मानस झाले 
ना अंत सुखा ऐकता तुका, हे संत आपले झाले!६ 

ध्यानाचा जडला छंद, नामाचा श्रवणी नाद
मग भोजन हेच प्रसाद, तो साद तसा प्रतिसाद 
जो जसा बघे, त्या तसा दिसे, तो तृप्त शेष जणु डोले!७

आजार तनाचा ज्यास, त्या सहण्याचा अभ्यास 
सोहं हे औषध खास, मी देह नव्हे रुजण्यास
उड उंच जरा, बघ वसुंधरा, मनमयूरनर्तन चाले!८ 

बोलणे न तत्त्वज्ञान, वागणेच तत्त्वज्ञान 
पुरुषास चिंतणे ध्यान, प्रकृती उपाधी जाण
सारून देह निपटून मोह, निजशिष्या मुक्तच केले!९

प्रार्थना करावी देवा। करवुनि घे काही सेवा 
स्वर्ग ही करी मग हेवा। नाम हा अमोलिक ठेवा 
नामास योग आनंद भोग, आईने लाडच केले!१०

अनुभव हा ज्याचा त्याला, जो साधन करतो त्याला 
येतसे न सांगायाला, तो शब्दहि मूकच झाला
थबकला काळ, तो जपत माळ संजीवन त्यातहि भरले!११

कालचे काल राहू दे व्हायचे काय होऊ दे
मज चालू क्षण साधू नामात दंग होऊ दे 
हा पुनर्जन्म सद्‌‌भाग्य परम शिष्याच्या वाट्या आले!१२

जन्म ना मरण संताला तो कालातीतच झाला
सच्छिष्य सद्‌‌गुरु झाला, वेगळा कुणी ना उरला
ती गुरुकृपा करविते जपा, मग आनंदाश्रू झरले!१३

देशाची सेवा हीच, ती समाजसेवा हीच
ना विकार करती जाच, बेभान होउनी नाच
पाहिले न जे, ऐकिले न जे, रामाचे भाग्य उजळले!१४

पोवाडा ऐसा गाता मन हादरताहे आता
मी निमित्त केवळ होता शब्दांचे वाहन बनता 
हरि गिरिधारी शिरि छत्र धरी मज निवांत निर्भय केले!१५

आनंद स्वरूपी आहे तू आत वळूनी पाहे
सुखदुःखे सोसत राहे सामर्थ्य गुरु देताहे
ना नडे कुठे रानडे वदे श्रीराम पदांवर लोळे!१६

निंबाळ घराला केले! 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३/४.०९.१९९८

No comments:

Post a Comment