Saturday, June 28, 2025

इच्छा रामाची, वाटु दे इच्छा मज माझी

इच्छा रामाची, वाटु दे इच्छा मज माझी!ध्रु.
 
अभिमानाचे उतरो ओझे 
अता सरू दे मी पण माझे 
कधी पाळतो, वाटो मजला आज्ञा रामाची!१ 

नीतिबंधने मला रुचावी 
अंतरि भगवद्भक्ति रुजावी 
फुलुनी यावी, फुले सुगंधी दारी मोगऱ्याची!२ 

मने माझिया कणखर व्हावे 
घाव टाकिचे हसत साहावे
पाषाणातुनि मूर्ती उमटो मेघश्यामाची!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १८० (२८ जून) वर आधारित काव्य.

अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे. मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ, दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. आपल्याला प्रिय तेवढीच आज्ञा आपण पाळतो हे बरे नव्हे. आपली व भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे. अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे मात्र पाप आहे. आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्यांनी समजून व जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत. आपल्या स्वतःच्या मताबद्दल स्वतःस पूर्ण खात्री असावी, मनाने आपण खंबीर झाले पाहिजे.  सत्कर्माला विघ्ने फार येतात, त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावी. आचार व विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.

No comments:

Post a Comment