Wednesday, August 30, 2017

प्रसाद पुष्पे - प्रार्थनेत आर्तता हवी.

प्रसाद पुष्पे - प्रार्थनेत आर्तता हवी.

त्वमेव माता च पिता त्वमेव -
सगळ्यांच्या नित्यपठणातला हा श्लोक! एकदा विचार करून पाहू या - कशा रीतीने म्हणतो आपण हा श्लोक.

या श्लोकातील उदात्त भावनेचा स्पर्श गाताना अंतःकरणाला झाला तरच काही ह्या म्हणण्याचा उपयोग!

भगवंताला हात जोडून, मनापासून नामस्मरण करून, त्याची सुंदर, रम्य, तेजोमय मूर्ती डोळ्यांपुढे आणून सावकाश हा श्लोक म्हणून पहावा म्हणजे आपल्या मनाला आयुष्यात कधीही निराशा स्पर्श करणार नाही.

देवाशी असलेल्या नात्याचे स्मरण राहील. आपल्या आत असलेला 'राम' इथे तिथे दिसायला लागेल.
आपण वैतागणार नाही.

ईश्वरानुरागी व्यक्तीच विरागी बनते आणि स्वानंद साम्राज्याचा अधिकारी होते. म्हणू या तर अर्थ जाणून -

त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव। त्वमेव विद्या द्रविणम् त्वमेव। त्वमेव सर्वं मम देव देव।

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, August 26, 2017

प्रसाद पुष्पे - गणपति बाप्पा मोरया!

प्रसाद पुष्पे - गणपति बाप्पा मोरया!

लहानांपासून थोरांपर्यंत, रंकापासून रावापर्यंत सर्वांना आवडणारा देव!

याचे जसे वर्णन करावे  तसे ते याला साजते आणि तरी तो तेवढ्याच स्तुतीत मावत नाही.

ज्ञानेश्वरीमधील गणेश वंदन पाहा, समर्थ रामदास कृत दासबोधातील गणेश वंदन पाहा, कवयित्री शांता शेळके यांचे 'गणराज रंगी नाचतो' ऐका.  गणपती अथर्वशीर्ष अर्थासह देहात मुरवा.
सारसबागेतील सिद्धिविनायक पहा! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती पाहा! सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आर्ततेने म्हणा.  तुम्हाला गहिवर आलाच पाहिजे.

तुम्हा आम्हा सगळ्यांचा आवडता गणेश, तो गुणेश ही आहे.

नेता असावा तर असा! विद्या वितरक असावा असा! सूक्ष्मदृष्टीने कृपेचा वर्षाव करणारा गणपती.

गर्जू या तर सारे गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Friday, August 25, 2017

प्रसाद पुष्पे - गणरायांचे आगमन

प्रसाद पुष्पे -  गणरायांचे आगमन

आज गणेश चतुर्थी! आज घरोघरी मंगलमूर्ती येणार. श्रींची स्थापना होणार.

तसं पाहिलं तर ही शाडू मातीची मूर्ती.  परंतु भाविक लोक त्या मृण्मय मूर्तीत चैतन्य ओततात. प्राण फुंकताक्षणी ती मूर्ती साक्षात जिवंत होते.

मोठया प्रेमाने आरत्या म्हणायच्या, अथर्वशीर्षाची आवर्तने करायची. दूर्वा वाहायच्या, मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा.

गणेशाने केली सूर्याची उपासना! माणसाला माणूस जोडून देऊन त्याचा आत्मविश्वास जागवला. स्त्रियांना स्वसंरक्षण करण्यासाठी समर्थ बनविले.

श्री व्यासमुनी महाभारत सांगत होते, गणपतीने ते स्वतः लिहून काढले.

असुरांचा नाश केला. धर्मध्वज उभारला. मूषकरूपी काळाचे वाहन केले.

जितक्या आनंदाने मूर्ती आणायची तितक्याच आनंदाने गौरींबरोबर तिची पाठवणी करायची.  जलतत्वात पृथ्वीतत्व मिसळले. आकाश आणि तेज या तत्वांच्या साक्षीने. वायू तर आहेच तिथे.

पुन्हा तो अनंत आहेच ज्याच्या त्याच्या आत. जगात पाहुणा म्हणून आलो, पाहुणा म्हणून परतणार. न गुंतता..

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, August 20, 2017

प्रसाद पुष्पे - इथे तिथे पडलेली फुले वेचावीत!

प्रसाद पुष्पे - इथे तिथे पडलेली फुले वेचावीत!

आयुष्यातले कारणी लागणारे क्षण फारच थोडे! ते आठवावेत.

छंद जडू द्या नाम घेण्याचा, छंद जडू द्या देव मूर्तीमधून ओळखायचा, छंद जडू द्या वेदना हसत सोसण्याचा.

माऊलीच्या ओव्या पुन्हा पुन्हा वाचाव्या. छंद जडू द्या दुसऱ्याची दुःखे ऐकून घेण्याचा.

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले

आपल्या वाट्यालाच दुःख का याचे उत्तर आहे या प्रश्नात.

आपण आलो एकटे, जाणारही एकटे, मग आता मधल्या काळातही वृत्ती 'उदासीन' असू द्यावी.

मनाने वरच्या पातळीवर वावरावे! नामाचा दोर घट्ट धरून ठेवला की कुठे दरीत कोसळणार नाही आपण.

जीवनाचा अवघड गड चढून जाऊ! मोकळी हवा घेऊ या!

नाम घेता घेता मन सु-मन करू या!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Friday, August 18, 2017

प्रसाद पुष्पे - पूजेमध्ये मन का रमत नाही?

प्रसाद पुष्पे - पूजेमध्ये मन का रमत नाही?

पूजेमध्ये मन का रमत नाही?
त्याला नको तिथे रमायला आवडते म्हणून.

एक काळ असा होता, मंदिरात जायला मिळत नाही म्हणून लोक तळमळत असत.

पूजा करण्याची संधी मिळते तो माणूस भाग्यवान! आपली पूजा भगवंताला पोचावी यासाठी मन संवेदनशील हवे.

आपणा स्वतःला करून घ्यायला आवडतील असेच सगळे उपचार मूर्ती पूजेमध्ये आहेत.

मूर्तीला स्नान घालताना, मूर्तीचे अंग पुसताना तर देवच आपल्या हातात नाही का आला?

सुविचारांच्या जलधारांनी आपण सुस्नात व्हावे. चंदनाच्या खोडासारखा देह झिजवावा. देवमूर्तीला नवनवी वस्त्रे नेसवावी, गंध लावावे , फुले वहावीत आणि तटस्थ ते ध्यान निरखावे.

मनुष्याला कर्म ही कटकट वाटते. पूजा एक सक्तीचे कर्म म्हणून न करता  अंतर्मुख होण्याची संधी साधून घ्यावी.

कर्म हेच पूजन आहे.

तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली, होय अपारा। तोषालागी!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, August 17, 2017

प्रसाद पुष्पे - प्रश्न चिंतेने सुटत नाहीत.

प्रसाद पुष्पे - प्रश्न चिंतेने सुटत नाहीत.

सारखी कसली ना कसली चिंता! काळजी! माणसाच्या मनाचा हा स्वभावच निरर्थक काळजी करत बसण्याचा!

आजारपण आले - चिंता! कर्ज फिटेना - चिंता! वरिष्ठ कोपतील - भीती आणि चिंता!

प्रश्न चिंतेने सुटत नाहीत तर चिंतनाने सुटतात. विचारांची देवाणघेवाण व्हावी लागते. आपली तळमळ जगाच्या ध्यानी आणून द्यावी, ज्ञानियाला वाट पुसावी.

प्रपंच आहे रामाचा। हे जाणे तो भाग्याचा!
अंतरि त्यांच्या रंगे राम, श्रीराम जय राम जयजयराम!

भय जावे, निर्भयता यावी, चंचलता जावी स्थिरता यावी, रडवेपणा जावा खिलाडू वृत्ती यावी.

रामनाम हे तनामनाचे रोग बरे करणारे औषध आहे.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे?

बलोपासना यासाठी, गुणोपासना यासाठी! साधना यासाठी सतत चालू ठेवायची.

गायत्री मंत्र जपायचा, अन्नदान करायचे, ज्ञानदान करायचे.

वेगळे रहायचे नाही समाजाशी समरसून जायचे.

मी तू पण जगन्नाथा होवो एकचि तत्त्वतः।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Tuesday, August 15, 2017

असाही होतो कृष्णजन्म!

असाही होतो कृष्णजन्म

अंधाऱ्या रात्री विचार सुंदर सुचला
श्रीकृष्णजन्म तो मनामनातून झाला!ध्रु.

मज नाम अनावर कर्मे करता झाले
दिवसाच्या अंती मन आनंदे न्हाले
भगवंत लिहाया रात्री बसवी मजला!१

जे चुकले ते ते मुक्त मने मानावे
परि सावधपण ते नंतर अंगी यावे
प्रत्येक साधुही चुकता चुकता शिकला!२

जरि स्वजन जाहले चूक स्पष्ट सांगावी
मन शुद्ध आपले हरिकृपा उमजावी
आत्म्याचे बल दे संरक्षण धर्माला!३

हे माझे नाही सदा मना शिकवावे
ते श्रेय यशाचे ज्याचे त्याला द्यावे
सिंधूत बिंदु तो कैसा मिसळुन गेला!४

मी देह मर्त्य मी क्षुद्रताच ही कारा
गर्जून सांगतो आत्मा बंध झुगारा
पिंजरा सोडुनी पक्षी उडुनी गेला!५

हरि वाजवी मुरली अजून श्रीगीतेची
तो वाट पाहतो अजून त्या गोपींची
मन उत्सुक झाले हरिच्या उपदेशाला!६

घन निळा पाहता श्याम मनाला दिसतो
चल ऊठ जाग रे श्याम असा जागवतो
जागृति मनाची स्फुर्तिप्रद जगताला!७

त्या पडून जाव्या भेदाच्याही भिंती
मग मने मनाशी सत्वर समरस होती
एकत्र जेवणे हरिचा काला कळला!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - काय होईल? कसे होईल?

प्रसाद पुष्पे - काय होईल? कसे होईल?

भीतियुक्त चिंता किंवा चिंतायुक्त भीती! का असे होते? माणसाचे मन त्याच्या देहाच्या सुख दुःखांशी अगदी जखडून बांधले गेले. 'मी देहच आहे' असा दृढ समज माणसाने करून घेतला आणि माणूस परतंत्रच झाला. वासनांचा गुलाम! समर्थांना अशा बिचाऱ्या माणसांची कीव येते. ते तर म्हणतात.

मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते
अकस्मात होणार होऊनि जाते

मन खंबीर बनले पाहिजे. जे काही बरं वाईट घडेल ते रामाच्या इच्छेनेच घडणार. शाश्वताचा बरा निश्चय झाला की कोणी अशाश्वतासाठी रडणार नाही, झुरणार नाही.

मी देह नव्हे! मला जन्म नाही, मरण नाही. सुख नाही दुःख पण नाही.

चिदानंद रूप: शिवोsहम् शिवोs हम्

ही आद्य शंकराचार्यांची शिकवण ध्यानी घेऊ या, अंगी मुरवू या.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, August 14, 2017

प्रसाद पुष्पे - देव देहात दे हात.

प्रसाद पुष्पे - देव देहात दे हात.

देवाचिये द्वारी - एवढे उद्गार निघाले मात्र छोटा नातू बोलून गेला उभा क्षणभरी..

हरिपाठातला सर्वात पहिला अभंग. हरि मुखे म्हणा - हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? ध्रुवपदच होऊन बसलं ते.

देवाचे द्वार कोणते? देवळाचा दरवाजा एवढाच मर्यादित अर्थ घ्यायचा का त्याचा? आणि मग क्षणभरच का उभे राहायचे तिथे? चिंतनाला चालना मिळत जाते.

चारी मुक्ती साधणारा तो चतुर हरिभक्त! हरि हरि! हा सोपा मंत्र जिभेच्या टोकावर बसलेला.

ज्ञानदेव महाराज  श्रीव्यासमुनींचा हवाला देत आहेत - द्वारकेचा राणा पांडवा घरी!

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:
तत्र श्रीविजयो भूतिध्रुवा नीतिर्मती मम।।

योगेश्वराला आपलासा करायचं तर आतला दरवाजा उघडायचा. ध्यानाला बसायचे. डोळे मिटून घ्यायचे आणि आतल्या घननीळाला त्याचे नाम घेत घेत पोटभर पाहून घ्यायचे. चंदनी पुरुष होऊन जायचे. आपल्या आतच तर आहे पंढरपूर-आळंदी-देहू सगळे काही.

लेखक - श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Saturday, August 12, 2017

प्रसाद पुष्पे - क्षमा! प्रार्थनेचा भाग!

प्रसाद पुष्पे - क्षमा! प्रार्थनेचा भाग!

क्षमा मागताना झाल्या चुकीबद्दल मनापासून वाईट वाटले पाहिजे. जिची क्षमा मागायची त्या व्यक्तीच्या मोठेपणाची जाणीव आपल्या शब्दशब्दातून प्रकट झाली पाहिजे.

क्षमा हा आपला अधिकार नाही तर क्षमा करणारी व्यक्ती आपल्यावर अनुग्रह करते अशी धारणा मनात बाळगावी.

क्षमायाचना करून लाभलेली क्षमा ही आपल्याला परिवर्तनाची लाभलेली संधी आहे.

बदल आतून घडलेला असला तरच तो स्थायी स्वरूपाचा, टिकाऊ असतो.

पृथ्वी - धरणीमाता खूप क्षमाशील असते, आपली आई देखील क्षमाशीलच असते. संत स्वभावतःच क्षमाशील असतात.

संत ज्ञानेश्वर म्हणजे तर मूर्तिमंत क्षमा! उगाच नाही त्यांना 'माउली' शब्दांनी हाका मारीत.

हा एकच सद्गुण अंगात बाणला तर माणसाचे आत्मिक बळ कितीतरी पटींनी वाढले असे जाणवेल.

शिवीला प्रतिशिवी हे उत्तर नव्हे. शिव्या ऐकताना मनोमन म्हणावे ज्याच्याजवळ जे असते तेच तर तो देत असतो. आपण त्या घेतल्याच नाहीत की कुठे जातील त्या?

उत्कटतेने मागितलेली क्षमा पुनर्जन्म घडविते.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Friday, August 11, 2017

प्रसाद पुष्पे - समाज पुरुषा तुला प्रणाम.

प्रसाद पुष्पे - समाज पुरुषा तुला प्रणाम.

जर हेतु शुद्ध असेल तर कर्म शुद्ध! मनुष्य कर्मात "मी माझे" मिसळतो आणि आयुष्यच गढूळ होऊन जाते.

वय हे वाढतच असते. कर्मे तर करावीच लागतात. मग ती सेवाभावाने, आनंदाने का करू नयेत? लोकांच्या सहकार्याविना आपले पावलोपावली अडत असते. ही जाण जर आपण मनात बाळगली तर आपण समाजाचे कृतज्ञ राहून आपल्या जीवनात अर्थ भरू शकू.

समाजाने जगात आणले, लहानाचा मोठा केले, संसार थाटून दिला, आजारात शुश्रूषा केली, समाजच शेवटी मूळ ठिकाणी पोचविणार.  जनी जनार्दन पहायला शिकू या.

ज्या प्रमाणे जन्मदात्रीचे ऋण कधीच फिटत नसते त्याप्रमाणे व्यक्ती समाजाची सेवा करील तेवढी थोडीच आहे.

व्यक्तीपेक्षा संस्थेचा आयुष्यकाल दीर्घ असतो. जे राव नाही करू शकत ते गाव करून दाखवतो.

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ!

सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, August 10, 2017

प्रसाद पुष्पे - आजोबाला सद्गुरु नातू!

प्रसाद पुष्पे - आजोबाला सद्गुरु नातू!

अनेकदा वाटते जर काही लिहावयाला नाही तर मग का बळेबळे लिहायला बसावे.  पण लगेच आतून आवाज येतो - लेखन एक साधनाच आहे असे समज.

काल दुपारचीच गोष्ट. अंगणात नातवाबरोबर खेळून त्याच्या इच्छेविरुद्ध वर फ्लॅटमधे आलो. नातू आत घेईना - दार लावू लागला. मी जरा रागाने दार जोरात ओढले, त्याची बोटे दारात सापडली. कळवळून ओरडला तो बालजीव.

वातावरणातला तणाव वाढला. काही काळाने नातू प्रसंग विसरूनही गेला. दुपारी आजोबाबरोबरच झोपला. पुन्हा त्यांच्याशी खेळायला तयार.

मग आपणही काही गोष्टी जीवनात प्रतिकूल घडल्या तर देवावर इतके रागवायचे का? रुसायचे का? त्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका घ्यायची? पूजा सुद्धा करायचा कंटाळा करायचा?

आपण शुद्ध बुद्धिवादीही नाही आणि भाविक भक्तही नाही. त्रिशंकूसारखी मधलीच स्थिती आपली.

देवा, वय वाढले त्याला इलाज नाही. पण लहान मुलाची निरागसता दे.  त्याच्यासारखे लवकर विसरायला, रडत रडत हसायला शिकव.

ते मूल जसे आजी आजोबांना बिलगते, तसं मला गोड स्वरात तुला आळवायला जमू दे.

नातवालाच गुरु करायला हवं नाही!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.
( हे १९९३ सालचे लेखन आहे)

Wednesday, August 9, 2017

प्रसाद पुष्पे - वाटाड्या हवा आहे.

प्रसाद पुष्पे - वाटाड्या हवा आहे.

खरंच देव आहे का? असला तर तो मला दिसेल का? तो माझ्या इच्छा पुरवील का? का रे? हसलास का असा?

हसू नको तर काय करू? अडाण्यातला अडाणी तू. देव आहेच आहे. यात कसलीही शंका नाही. पण आधी तू स्वतः मी कोण? याचा विचार कर. तू विचारत असलेले प्रश्न सुचवले कुणी?

सद्गुण, सौन्दर्य, त्याग, विशालता, औदार्य जाणवताच तू नतमस्तक होतोस ना? तिथेच देवपण आहे.

देव केवळ पहायचा नाही - अनुभवायचा आहे - नव्हे नव्हे  आपणच संस्कारांनी, उपासनेने तसं व्हायचे आहे.

तुकाराम पांडुरंग पहायला गेले - त्यांच्या हातून नामसंकीर्तन घडले, ध्यान चिंतन झाले - ते देहातच विदेही बनले आणि त्या सावळ्या विठ्ठलाहून कुणी वेगळे असे राहिलेच नाहीत. स्वतः पांडुरंग होऊन गेले ते.

तू भल्या पहाटे उठावेस, आन्हिके उरकून देवघरातल्या देवाला नमस्कार करून आसनावर बसावेस, मुखात नाम असावे, हळू हळू मनाला याची गोडी लागेल, मग काय देवाची आणि तुझी भेट नित्याचीच होत राहील.

हे बघ तू असे विचारण्यावरून तरी वाटते आहे देव तुला हवा आहे तुझ्या इच्छा पुरविण्यासाठी. चुकलास गड्या तू!

आपली अशी इच्छा - वासना ठेवूच नये कधी. इच्छा देवाची! तोच वाहतो अखंड चिंता अनंत या विश्वाची!

तू सश्रद्धच राहा. अश्रद्ध होऊ नकोस. देव होता नाही आले तरी चालेल. धडपडणारा माणूस हो. प्रेम करीत जा. आनंद वाटत जा. तुला इथे तिथे, आत बाहेर भगवंत जाणवल्याशिवाय राहणार नाही.

लेखक - श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - काय निवडून घेणार?

प्रसाद पुष्पे - काय निवडून घेणार?

या उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत। ते तत्वज्ञ संत। स्वीकारीती।।

संत सार तेवढे नेमके घेतात.  असार सहजपणे बाजूला सारतात. तिकडे बघतही नाहीत ते. कसे जमते त्यांना हे?

विवेकाने जमते. सद्गुरु हृदयात वास करतात आणि पावलोपावली जपतात, सन्मार्गावरच ठेवतात.

मी कोण? हे कळण्यासाठी मी कोण नाही हे सविस्तर कळले की काम भागले.

मी देह नव्हे, मी मन नव्हे, मी बुद्धी नव्हे. एकेक गोष्ट अंतरात चिंतनाने ठसत जायला हवी.

नामस्मरण चिंतनाला चालना देते.
प्रभाते मनी राम चिंतीत जावा. दिवसाच्या पहिल्या प्रहरात राम चिंतावा. आयुष्याच्या आरंभी, शैशवातच भक्त होता यावे.

लहानपणापासून हे संस्कार कथाकथन, भक्तिगीत गायन, स्तोत्र पठण, सूर्यनमस्कार, बलोपासना इत्यादी उपक्रमातून ठसविता येतील.

काय वाचायचे ते कळावे, काय पहायचे ते कळावे. जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे.  सुपासारखे व्हावे. जनी वंद्य ते सर्व भावे करावे.

सार सार को गहि रहै। थोथा देइ उडाय।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Monday, August 7, 2017

प्रसाद पुष्पे - तू वाटचाल चालू ठेव.

प्रसाद पुष्पे - तू वाटचाल चालू ठेव.

कुठेतरी, कधीतरी थांबायला लागणार आहे. अगदी खरे आहे. पण चालत असताना हा विचार कशाला चालू ठेवायचा?

आपण आपले चालत राहावे. भक्तिपंथेची जावे. तो भक्तीचा मार्ग आद्य रामदास मारुतिराय चालून गेले. आदिनाथ, आदिसिद्ध, आदिगुरु शंकर याच मार्गावरचे प्रवासी.

तेव्हा ओघाने आलेले काम मनामधले प्रेम ओतून कौशल्य पणाला लावून करायचे. नाम घेत राहायचे. एकदा का हे मन रामरंगी रंगले की देहाची अवस्था कोणतीही असो!

'अनुसंधाना कधी न चुकवावे'.

यासाठी करायचे काय? श्रवण चुकवायचे नाही. सत्संगाची संधी साधायची. सुमधुर आणि सत्य वचन बोलायचे. हा आपला, हा परका हा भेद मनातून निघून जावा यासाठी इथे तिथे त्या भगवंतालाच पहायला शिकायचे.

म्हणून तर प्रपंचात राहून परमार्थ करायचा. साधना करीत राहिले की अंतरंग, बहिरंग दोन्ही शुद्ध होतील.

समर्थांचे दोन श्लोक सर्व भाव ओतून म्हणू या.

सदासर्वदा योग तूझा घडावा। तुझे कारणी देह माझा पडावा।उपेक्षू नको गूणवंता अनंता। रघूनायका मागणे हेचि आता।।

उपासनेला दृढ चालवावे। भूदेव संतांसि सदा लवावे। सत्कर्मयोगे वय घालवावे। सर्वामुखी मंगल बोलवावे।।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Sunday, August 6, 2017

प्रसाद पुष्पे - शिशुपण बरवे हृदया वाटे.

प्रसाद पुष्पे - शिशुपण बरवे हृदया वाटे.

ज्या रंगांच्या काचांचा चष्मा आपण घालू त्या रंगाचे जग आपल्याला दिसणार. म्हणजे जग असायचे तसेच असते पण आपल्या मनातल्यासारखे ते आपल्याला भासते.

कोणाविषयी आपल्या मनात अढी असली, मन कलुषित असले की त्या व्यक्तीचे सत्कृत्य आपल्याला कौतुकास्पद नाही वाटत.

सगळे जग आपल्याला हसरे, नाचरे, विविध रंगी असे वाटायला हवे.  वृक्षवल्लरी, वनचरे आपली सोयरी धायरी व्हायला पाहिजेत. तर मग सृष्टीशी जवळीक साधू या.  माती पाणी, उजेड, वारा, आकाश यांचे हे जग. आपल्या देहाचे ही घटक नेमके तेच.

खेळावे जरा मातीत, करावे बागकाम शेती, प्यावे झऱ्याचे थंड मधुर पाणी, घ्यावे जरा ऊन अंगावर, सोसावा थोडा झोंबरा वारा. जगायला मनाचे का होईना बालपण चांगले. किती उशिरा कळते पण हे!

संतसाहित्य मनाच्या मशागतीला फार चांगले, बालकवींच्या कविता गाव्यात, उत्तमोत्तम ठिकाणे पहावीत, रात्री अभाळातलं चांदणं पहावे, देवाला स्मरावे आणि त्याला म्हणावे, तू जे दिलेस ते घेण्याला हे हात दुबळे ठरतात, तरी तुला माझा नमस्कार.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, August 5, 2017

प्रसाद पुष्पे - कधी होशील माणूस?

प्रसाद पुष्पे - कधी होशील माणूस?

मनुष्याचे मनुष्यपण कशात आहे? ते केवळ देहात नाही हे उघडच आहे.

आहारनिद्राभयमैथुनं च  सामान्ययेतत् पशुभि: नराणाम्

माणसाला मन दिलं आहे, त्याला बुद्धीचीही देणगी लाभली आहे देवाकडून.

माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हाच खरा धर्म.  जशा आपल्याला भावभावना आहेत तशाच त्या दुसऱ्यालाही आहेत.
'मन कोणाचे कधी न दुखवावे'
जर केवळ विकाराधीन झाला तर मनुष्य पशुत्वाकडे झुकला. त्याने नाशच ओढवून घेतला आणि मनुष्याने विवेकाने आपली क्रिया पालटली, तो संयम शिकला, सदाचारी बनला तर त्याचा प्रवास देवत्वाच्या दिशेने सुरु झाला असे समजावे.

मर्यादित अर्थाने का होईना आपण असे म्हणू शकतो की माणसाला कर्मस्वातंत्र्य आहे.  त्याने अटळ असलेले कर्मच अशा कौशल्याने करावे की ते करताना त्याच्या मनात फलाची अभिलाषा नसावी. कर्तृत्वाचा अभिमान नसावा. समर्पणाची भावना असावी.

सावता माळींनी आपला व्यवसाय कसा केला? जनीने सेवा चाकरी करता करता विठ्ठल कसा आपलासा केला?

जन्माला आल्याचे सार्थक त्यात आहे.

आपल्याकडे आचारभेद असलेले अनेक पंथ आहेत. पण सगळ्यांचा गाभा माणुसकी आहे, प्रेम आहे. वरवर पाहू नये. मनाने आत आत जावे.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, August 4, 2017

प्रसाद पुष्पे - कृपा आहेच, दृष्टी हवी!

प्रसाद पुष्पे - कृपा आहेच, दृष्टी हवी!

संत छातीवर हात ठेवून सांगतात "तुम्ही फक्त भगवंताचे नाव घ्यायला लागा, त्याची तुमच्यावर कृपा आहेच. फक्त ती कृपा ओळखण्याची दृष्टी हवी."

मनुष्य स्वभाव मात्र असा की जर काही चांगले घडले तर सगळे श्रेय आपल्याकडे घ्यायचे आणि काही वाईट घडले की मात्र त्याचे खापर देवाच्या माथी फोडायचे. म्हणजे माणसाला देव हवाय पण कशासाठी? त्याच्या बऱ्यावाईट इच्छा त्याने तातडीने पुरवाव्यात म्हणून आणि कारण असो नसो अनेकदा शिव्याच घ्याव्यात त्या देवाने.

अधःपाताचे कारण विवेक सुटणे.
'बरा निश्चयो शाश्वताचा करावा.'
आपण नेमके त्याच्या उलट वागतो.
देव स्वप्नात देखील कधी कोणाचे वाईट करणार नाही. तो तुमचे कशाला काय वाईट करील?
प्रपंचातील सुखदुःखे तुमच्या पूर्वसंचिताचे खेळ आहेत.
आता देवाला शिव्या घालून आणखी पापाचे धनी नका होऊ.

मूर्तीला देवपण आले टाकीचे घाव निमूटपणे सोसल्याने. तसेच आपल्यावर जर कौटुंबिक आपत्ती एकामागून एक येत असल्या तर धैर्य एकवटावे, निजनिष्ठेने नाम घ्यावे, प्रल्हाद बनावे.

भगवंताची कृपा चिंतनाने जाणवल्याखेरीज राहणार नाही.
कवि प्रदीप म्हणतात -
"दुनियाके पालनहार, तेरे फुलोंसेभी प्यार, तेरे काटोंसेभी
जो भी देना चाहे दे दे करतार, दुनियाके तारनहार."

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Thursday, August 3, 2017

प्रसाद पुष्पे - आस मुक्त श्वासाची..

प्रसाद पुष्पे - आस मुक्त श्वासाची.

जग काय म्हणेल? या भययुक्त भावनेने वागणे हा झाला व्यवहार.   अर्थात् जगाने आपल्याला चांगलेच म्हणावे असे वाटते तर मग जगाला आपली भक्ती दिसावी, औदार्य दिसावे, विद्वत्ता दिसावी, श्रीमंती दिसावी या भावनेतून गोष्टी घडत जातात. वेगवेगळे समारंभ पहा, माणूस कसा वागत असतो? झालंच तर जयंती, पुण्यतिथी यांचे कार्यक्रम पहा.

एकंदरीत सगळं वातावरण असं असतं की गोंधळायला, गुदमरायला होतं, मोकळेपणा वाटत नाही.

मुखवट्यांचे जग! आनंदप्रदर्शन नकली तसंच दुखवटा - तो सुद्धा नकली.

जो तो योजनापूर्वक अभिनय करतो. जगाला बेमालूमपणे फसवता फसवता आपणही फसतो.

यातून बाहेर नाही का पडता येणार? मोकळी हवा नाही का कुठेच मिळणार?

आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. मनातल्या मनात नाम घ्यावे. तो आतून साह्याला धावतो. विवेक सुचवतो. मात्र मग आता जनाचे न ऐकत बसता केवळ त्याचेच ऐकावे.

भगवंत काय म्हणेल? तो आपल्याकडे नेहमीच पहात असतो हे जाणून कुणाचेही मन न दुखवणे, स्वकर्तव्याला न विसरणे, कुणाविषयी अढी न ठेवणे हाच तो परमार्थ.

'तो दंभ नको, अभिमान नको, मज भक्ति हवी ती दे देवा!'

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Wednesday, August 2, 2017

प्रसाद पुष्पे - वज्र व्हावे या मनाचे.

प्रसाद पुष्पे - वज्र व्हावे या मनाचे.

लेचेपेचे मन काय कामाचे?
चंचल मन माणसाला नाचवते. त्याची धिंड काढते. गोविंदाचे पायी स्थिरावलेले मन त्याला आनंद देते.
मन हे व्रतांनी, नियमांनी बांधून घ्यावे.
स्वातंत्र्यवीरांचे मनच पाहा ना!
स्वातंत्र्यप्राप्ती हेच ध्येय असणारे ते म्हणतात.
"की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने,
लब्धप्रकाशइतिहास निसर्गमाने -
जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करि हे सतीचे!"

कणखर मनापुढे काळाचेही काही चालत नाही.
"बचेंगे तो और भी लडेंगे!" दत्ताजी शिंदेंची वाणी.
बलाढ्य रावणावर वनवासात असलेल्या राम लक्ष्मणाना विजय मिळवता आला. मनाची साथ लाभली.

या मनाला ज्याची गोडी लावावी त्याला ते चिकटते. गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटावा तसे!

समर्थांनी सज्जन मनाला भक्ति पंथानेच जाण्याचा उपदेश केला आणि त्याला विषयापासून विरक्त आणि रघुनाथाच्या ठिकाणी अनुरक्त करून दिले.

मनाला श्वासोच्छ्वासाच्या गतीशी जोडले आणि धरिता सो सोडता हम् शिकवले की आत चाललेला अजपाजप जाणवतो. हाच परमानंद.

भगवंताच्या ऐश्वर्याचा अनुभव येण्याला गीतेतील ११ वा अध्याय विश्वरूपदर्शन योग वारंवार वाचावा आणि लगेच १२ वा भक्ति योगाचा अध्याय म्हणावा.

संतांचे मेणाहून मऊ असे अंतःकरण प्रसंगी वज्राहून कणखर होते ते केवळ अंतरंग साधनेमुळेच.

उपासनेला दृढ चालवावे! ते यासाठीच.

निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, August 1, 2017

प्रसाद पुष्पे - उद्योगी तो सदा सुखी.

प्रसाद पुष्पे - उद्योगी तो सदा सुखी.

कंटाळा!
जगण्याचा कंटाळा आला म्हणणारा ही जगत असतोच. अंगात वर्षानुवर्षे जो आळस साठून राहिला ना तोच कंटाळा शब्दाने प्रकट होतो.
कशाचा कंटाळा येतो आपल्याला? पहाटे उठावेसेच वाटत नाही, देवाची पूजा करावीशी वाटत नाही, डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य अप्रिय वाटते. हा कंटाळा आपला चेहरा त्रासिक बनवतो.

आळोखे पिळोखे देणे, जांभया देत सुटणे, काहीतरी चाळा म्हणून मग विविध व्यसनं.  म्हणून म्हणतो 'कंटाळा' हा शब्द टाळा.

ज्याचा आपल्याला कंटाळा तेच काम प्रेमाने उत्साहाने, श्रद्धेने करू लागायचे. परिश्रम करायचे, घाम गाळायचा. भुकेहून दोन घास कमीच खायचे. नाम घ्यायचे, संत साहित्य थोडे तरी वाचायचे आणि संधी मिळेल तेव्हा सत्संग साधायचा. मनाचे दास नाही व्हायचे आपण. लहान मोठे मोह जिंकायला लागायचे.

'उद्योग' शब्द केवढा अर्थपूर्ण!

समर्थ रामदास भारतभर पायी हिंडले. देश पाहिला, स्थिती जाणली. मारुती स्थापून बलोपासना दिली, जीवनात 'राम' आणला.

संत तुकाराम! भंडारा डोंगरावर गेले. ध्यान साधना घडली. अभंगवाणी स्फुरली.

विविध ग्रंथ अभ्यासुया, पचवू या, जमेल तितके आचरणात आणू या.
नियमित व्यायाम करू या! चांगल्या उपक्रमांमधे व्यस्त राहुया!

कंटाळा शब्द हा टाळा, उद्योगी तो सदा सुखी
प्रयत्ने घडला राम, अर्धांगी जानकी सखी

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले