Tuesday, April 30, 2019

श्रीनवनाथांचा आदेश..

'अलख निरंजन' गजर गाजला
स्वाभिमान अंतरी जागला
उघडा डोळे पहा स्वदेश
श्रीनवनाथांचा आदेश!१
मृगेंद्र आपण नाही पत्ता
का माना परक्यांची सत्ता?
नरनारींनो बना सुवेष
श्रीनवनाथांचा आदेश!२
एकांती साधना घडावी
गुरुकृपा आहे जाणावी
भाषणात प्रकटो आवेश
श्रीनवनाथांचा आदेश!३
कोण आडवू शकतो येथे?
अन्यायाची चीड प्रकटे
पेटुन उठु दे भारत देश
श्रीनवनाथांचा आदेश!४
भिक्षेची तर अभिनव दीक्षा
घराघराची कसुन परीक्षा
आत्मा अमर्त्य हा संदेश
श्रीनवनाथांचा आदेश!५
समष्टीत मिसळावी व्यक्ती
शिवा जागवत आपण शक्ती
जय गुरु जय गुरु गर्जो देश
श्रीनवनाथांचा आदेश!६
अक्षर अक्षर वाचत जाता
गुरुचरितासह कळते गीता
आचरणी यावा आदेश
श्रीनवनाथांचा आदेश!७
बदला दृष्टी बदले सृष्टी
वितरा प्रीती जगात शांती
एकच नभ नि एकच देश
श्रीनवनाथांचा आदेश!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, April 28, 2019

देवाचा हा न्याय कसा?

देवाची जर सर्व लेकरे
देवाचा हा न्याय कसा?
दिव्यातळी अंधार कसा? ध्रु.
बाबा मी का माणूस नाही
मैत्रिभाव का मम मनि नाही
एक दूरचा एक जवळचा
मानत हा जगपिता कसा?१
सर्वांसाठी मधुरच पाणी
भास्कर तळपे समान गगनी
या लोकांचा धर्मच विपरित
माणुसकी विसरतो कसा?२
एकच धरती सगळ्यांसाठी
एक गगन हे डोईवरती
देवाच्या दुनियेत नसावा
ठाव तिळभरि दु:स्वासा!३
जे देवाला नच रुचणारे
ते आम्हाला नच पटणारे
द्या भेदाते मूठमाति अन्
कार्याचा उमटवा ठसा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३-४-१९६८

महात्मा फुले यांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील एक कविता..

Monday, April 15, 2019

विसरू कसे तुम्हाला?

हौतात्म्य प्राप्त झाले, राष्ट्रार्थ सर्व दिधले
जे रक्त सांडलेले, नाही अजून सुकले
हे राष्ट्रवीर तुम्हां अर्पित पुष्पमाला
विसरू कसे तुम्हाला? १

स्मृति आपुली अम्हाला संजीवनी ठरावी
कृती आपुली अम्हाला चैतन्यस्रोत व्हावी
हे राष्ट्रवीर तुम्ही रुधिरात चिंब न्हाला
विसरू कसे तुम्हाला? २

स्वातंत्र्य अगर मृत्यू ना अन्य ज्या विराम
ऐसा पुकारलात संग्राम अष्टयाम
हे राष्ट्रवीर आम्ही घेतोच या व्रताला
विसरू कसे तुम्हाला? ३

तुमचीच संतती ही त्यागास सिद्ध झाली
विसरून जातिपाति ती एकरूप झाली
हे राष्ट्रवीर आम्ही उच्चारितो प्रणाला
विसरू कसे तुम्हाला? ४

वरदान द्या असे की विरतील क्षुद्र स्वार्थ
वरदान द्या असे की साधेल देशस्वार्थ
हे राष्ट्रवीर प्रणती अति नम्र याचि काला
विसरू कसे तुम्हाला? ५

कर्तृत्व स्फूर्तिदायी, हौतात्म्य स्फूर्तिदायी
ते ऐक्य स्फूर्तिदायी, ते शौर्य स्फूर्तिदायी
हे राष्ट्रवीर वितरा आशीर्वचांसि सकला
विसरू कसे तुम्हाला? ६

मारो फिरंगी काटो हा घोष गगनभेदी
ते स्तंभ जे वधार्थ ठरल्यात यज्ञवेदी
हे राष्ट्रवीर चरणी उत्स्फूर्त पंक्तिमाला
विसरू कसे तुम्हाला? ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, April 14, 2019

भगवान रमण महर्षी..

प्रभातकाली रमण महर्षी अंतरात आला
या देही गुरुकृपा भोगवी मुक्तीचा सोहळा!
अरुणाचल शिव, अरुणाचल शिव
समीकरण, आगळाच अनुभव
देहो नाहं, कोsहं सोsहं प्रेमभरे वदला!१
पदयात्रा नित करीत असता
स्वरूपचिंतन हातुनि घडता
सर्वात्मक भक्ताला केले, कंठ म्हणुन दाटला!२
मौन हरीचे सुमधुर भाषण
मिटता डोळे स्वरूप दर्शन
इथे-तिथे जो तो परमात्मा अंतरि जाणवला!३
जेथुनि आलो तिथे जायचे
पुन्हा न तेथुन परतायाचे
परंधाम निर्देश महर्षे कौशल्ये केला!४
हृदयी करुणा स्पर्शी अमृत
दुनिया निद्रित आपण जागृत
स्वसंवेद्य ते आपण केले तळहाती आवळा!५
न बोलता ही बोध वितरता
शिरी कृपेचा हस्त ठेवता
अनुग्रहाने बद्ध कधीचा पूर्णमुक्त झाला!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, April 13, 2019

त्रयोदशाक्षरी मंत्र

श्रीराम जय राम जय जय राम ।।ध्रु. ।।

धाव मनाची बाहेर, दौडत जाई चौफेर
मना उलटता होते नाम ।।१।।

'चिंता' करतो विश्वाची', कैसी वचने बाळाची
नारायण त्या सार्थची नाम ।।२।।

वेड लागता नामाचे, बंधन गळले देहाचे
सोsहम् हंस: प्रभु श्रीराम ।।३।।

नकोस गुंतू तू कामी, तुझ्या मनाचा तू स्वामी
अंतरि वसला आत्माराम ।।४।।

'दासबोध' तू जाणावा, मनोबोध ही बाणावा
त्या दोन्हीतून दिसेल राम ।।५।।

वाणी तुकया देहुचा, अभंग हो त्याची वाचा
भंडारा ही घेतो नाम ।।६।।

मंडाले वा वाड्यात, लोकमान्य ते स्थिरचित्त
गीता त्यांना दे विश्राम ।।७।।

ग्रामसफाई करताना बापट गाती हरिभजना
श्रीहरि हे मुखि त्यांच्या नाम ।।८।।

मांडीवर खेळे बाळ, रुणझुणती त्याचे चाळ
त्याच्या कानी जावो नाम ।।९।।

नाम मनाचे अन्न असे, भक्ति भाव हा पोसतसे
कर्म घडतसे ते निष्काम ।। १०।।

प्रपंच आहे रामाचा, हे जाणे तो भाग्याचा
अंतरि त्याच्या रंगे नाम ।।११।।

चिंता कसली करू नये, रामाला विस्मरू नये
येता जाता घ्यावे नाम ।।१२।।

तनामनाचे रोग बरे, रामराय हे वैद्य खरे
अनुभव ऐसा देते नाम ।।१३।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Friday, April 5, 2019

बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा? मामा, नच गेला निजधामा?

पुन्हा पुन्हा निरखुनि बोटांना काय पाहता मामा?
अहो काय पाहता मामा?
बोटे तुटली? रक्त ठिबकले? नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

यमुनाडोही जसा कालिया
तसे महाली राहिलात या
आज तुम्हाला परि मर्दाया
शिवकृष्णाने उडी घेतली, आक्रमकाला नसे क्षमा!
आक्रमकाला नसे क्षमा!
बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

आठवते का लालमहाली
शिवाशिवी तिमिरांत रंगली
रक्तसिंचने, धरणी भिजली
तधि जनान्यात दडला ना? पळता भुइ थोडी ना?
मामा, पळता भुइ थोडी ना?
बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

ललनांना नच कधीहि वधणे
मावळजन हे मुळात जाणे
तिमिरी न कळे, कुणा मारणे
दैवगतीने मेली कोणी? दोष द्यायचा कसा कुणा?
अहो दोष द्यायचा कसा कुणा?
बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

जसा मारुती दाढी जाळी
तसा शिवाजी तुम्हास पोळी
केवळ बोटे तुटणे भाळी
रक्त ठिबकले, तया ठिबकु द्या, जान बची पर आबरू ना!
बोटे तुटली, रक्त ठिबकले, नच गेला निजधामा?
मामा, नच गेला निजधामा?

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, April 3, 2019

आळवी शिव भैरवी...

जीवनाच्या सांजवेळी
दीपकळी का थरथरावी?
तेल आले सरत का ते
देव जवळी बोलवी
आळवी शिव भैरवी!ध्रु.
चारित्र्य प्रभु श्रीरामसे
चातुर्य अंगी कृष्णसे
पावित्र्य गंगेचे जसे
गांभीर्य वदनी सिंधुसे
लीन अवघे ईशचरणी, यत्न थकले मानवी
आळवी शिव भैरवी!१
सोडूनि देउनि नांगर
धर्मार्थ केला संगर
नच द्वेष अथवा मत्सर
शिवला मनाला रतिभर
प्रभुकार्य हे निजकार्य ना हा भाव जीवा तोषवी
आळवी शिव भैरवी!२
संकल्प जे रुजले मनीं
ते निर्मिले नारायणी
सिद्धीस त्यांना नेउनी
कृतकृत्य केले जीवनी
कर्तृत्व केवळ आपुले आभास अवघ्या नाचवी
आळवी शिव भैरवी!३
द्वैतास थारा ना अतां
वरण्या सजे सायुज्यता
साफल्य माला घालिता
तृप्तीच पावे तृप्तता
जाणीव देहाची नुरे मन रंगले ते राघवी
आळवी शिव भैरवी!४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, April 1, 2019

डॉ केशव बळीराम हेडगेवार

'असे हिंदु मी, संघ हा प्राण माझा'
तदाकार हा साधु झाला कधीचा
जये होम केला तनाचा, मनाचा
अनासक्त सन्मार्ग त्या केशवाचा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले