घरात गीता, करात गीता, मनात गीता नित्य असो!
“मी तर अर्जुन, गुरु यदुनंदन” भाव सोवळा आत वसो!ध्रु.
“कर्तव्याचे स्मरण सदा” मग आलस्याला वाव कुठे?
कृष्णच कर्ता, तो फलभोक्ता मी माझे ला वाव कुठे?
मन पवनाला जोडुन देता श्वासोच्छ्वासी श्याम असो! १
पक्व फळापरि मी पण गळता कामक्रोधा ना थारा
भारतीय युद्धाच्या अंती धर्मराज्य घुमला नारा
धर्म जिथे श्रीकृष्ण तिथे विजय नीतिचा असो असो! २
हृदयी माधव वास करतसे आत पाहता तो दिसतो
स्वकर्मकुसुमे पदी वाहता वासुदेव हसतो खुलतो
कर्तव्याने घडते पूजन आलस्याचे नाव नसो! ३
हसरी मुद्रा मनहि मोकळे जसे उमलले अरविंद
वदे वैखरी अविरत प्रेमे गोविंद गोविंद गोविंद
नर नारायण यत्ने घडतो गिरवायाला धडा असो! ४
जो जो जेथे असेल तेथुन करत राहु दे उपासना
स्वधर्मपालन यज्ञ खरोखर ती समजावी हरिकरुणा
सकाम कर्मे सहज सुटावी ध्यास मनाला असो असो! ५
मरणाचे भय आता कुठले? भित्रा झालासे निधडा
जीवन आहे कुरुक्षेत्र हे झुंजायाचे हाच धडा
यश लाभो वा लाभो अपयश तमा तयाची जरा नसो! ६
त्यागद्वारा भगवत्प्राप्ती निषिद्ध कर्मे टाकावी
आलस्याला नकोच थारा शास्त्राज्ञा ती पाळावी
गुरुपदसेवा स्वकर्म घडता भाव वाढता असो असो! ७
कृष्ण कृष्ण म्हण मना माझिया हृदयी वसतो गोविंद
अभ्यासाला नेमे बसता आनंद आनंद आनंद
ऐसी गीता कळु दे रामा स्वप्न उद्याचे सत्य असो! ८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.९.१९९२