Monday, August 28, 2023

जाणतो भक्तिच मी पार्था!

जाणतो भक्तिच मी पार्था!ध्रु.

असे भुकेला मी भावाचा
भक्त माझा मी भक्ताचा
त्याविण कुणी न आवडता!१

पान, फूल जे हाती आले
फल ना, जल तर कोठे गेले?
रंगतो ते सेवन करिता!२

पतिव्रतेसी जैसी शुचिता
मज आवडते ती भाविकता
मजसी कसली कमतरता!३

वस्तू असती निमित्त केवळ 
भक्तिभाव होण्यासी निर्मळ
भाव मग वरितो व्यापकता!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०३.१९७४ 


(पै भक्ति एकी मी जाणे
तेथ साने थोर न म्हणे
आम्ही भावाचे पाहुणे
भलतेया
येर पत्र पुष्प फळ
हे भजावया मिस केवळ
वाचूनि आमुचा लाग निष्कळ
भक्तितत्त्व

या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ८४ वर आधारित काव्य).

Sunday, August 27, 2023

आनंदी ठेवा! स्वामी, आनंदी ठेवा!

परिस्थिती ही असो कशी ही
आनंदी ठेवा! स्वामी, आनंदी ठेवा!ध्रु.

' देह नव्हे मी ' शिकवण अपुली
आपण गमता ज्ञान माउली
वंदन गुरुदेवा!१

"राम कृष्ण हरि" नाम स्मरता
सोऽहं मुरली अंतरि घुमता
घडेल गुरुसेवा!२

अभ्यासाचा छंद लावला
काही पालट नकळत घडला
सात्त्विक हा मेवा!३

प्रसन्नदर्शन आम्ही व्हावे
कंटकांतही सुमन हसावे
स्वरूपीच ठेवा!४

चैतन्याचे स्वरूप अक्षय
परमार्थाचे क्षेत्र निरामय
अनुभव द्या देवा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.११.१९८५

Saturday, August 26, 2023

ती खरी शरणागती!

ती खरी शरणागती!ध्रु.

वाचा देवा अर्पण करणे
नाम तयाचे संतत घेणे
नयन जलें डंवरती!१

चित्त द्यायचे असे हरीला
तयामधे तो सतत चिंतिला
विषय न आकर्षिती!२

तदाकार जर वृत्ती झाली
अहं वाहिला हरिपदकमली
गांग रिगे महोदधी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.१२.१९७४

(तया अहं वाचा चित्त आंग
देऊनियां शरण रिग
महोदधी का गांग
रिगाले जैसे

या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आणि स्वामी माधव नाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १९० वर आधारित काव्य).

पार्था, येउनि मिळशिल मला!

शपथ घेउनी तुला सांगतो, येउनि मिळशिल मला
पार्था, येउनि मिळशिल मला! ध्रु.

चंचल मानस हे आवरण्या
सोऽहं बोधी हवे राहण्या
बोध वाढता, चित्त स्थिरावे, आनंदचि उरला!१

भगवद्दर्शनि रंगुनि जाता
तू "तो" होशिल बघता बघता
जीवन्मुक्तचि स्वये येउनी मजपाशी पोचला!२

सोऽहं भावी रंगुनि जाता
पटे जिण्याची मग सार्थकता
भगवंतच प्राप्तव्य एक मग ध्यास जरी लागला!३

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०२.१९७४
सारंग भूपाली 

(तू मन बुद्धी साचेसी
जरी माझिया स्वरूपी अर्पिसी
तरी मातेची गा पावसी
हे माझी भाक

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ६५ वर आधारित काव्य).

Sunday, August 20, 2023

ते माया तरले तरले!

सर्वभावे मजसी भजले, ते माया तरले तरले!ध्रु.

त्रिगुणात्मक माझी माया
अवघड ती जनां तराया
अज्ञाने, अहंपणाने जग मायेतच गुरफटले!१

करू जाता काहि उपाय
तो होतच जाइ अपाय
तरणेच राहिले दूर हे नवलचि येथे घडले!२

सत् केवळ मी भगवंत
जाणती न कोणी भ्रांत
"तोच मी" कळुनि ना सगळे भोवऱ्यात फिरले फिरले!३

सद्गुरूच करतिल सोय
उरणार न मायातोय
सोऽहंच्या भजने भक्त मजमाजी मिसळुनि गेले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०२.१९७४ 

(येथ एकचि लीला तरले
जे सर्वभावे मज भजले
तया ऐलिच थडी सरले
मायाजळ
जया सद्गुरू तारू फुडे
जे अनुभवाचे कासे गाढे
जया आत्म निवेदन तरांडे
आकळले 

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ६२ वर आधारित काव्य).

Thursday, August 17, 2023

आत बाहेर तोच ईश्वर!

आत बाहेर तोच ईश्वर!ध्रु.

सर्व भूतांत, सर्व स्थानांत
सर्व कालात, सर्व दिशांत
ज्याचा वावर, तोच ईश्वर!१

लपुनि राहतो, दृष्टी न पडतो
साक्षित्वे पाहतो, कुठे हा दडतो?
शोधिता अंतर, सापडे ईश्वर!२

कोण मी जाणता, कोण मी शोधता
कोण मी पुसता, कोण मी कळता
येती उद्गार, मीच ईश्वर!३

आसन ढळेना, समाधि भंगेना
अज्ञान छळेना, आनंद मावेना
भूती साकार दिसतो ईश्वर!४

रचना : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०३.१९७४

(ऐसेनि जे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी
जगद्रूपा मनी साठऊनी माते
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत
हा भक्तियोगु निश्चित
जाण माझा

वरील ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ९२ वर आधारित काव्य )

Wednesday, August 16, 2023

मी, तेथे वास करी!

जे मन निर्मळ, चोखटे, सुंदर, तेथे वास करी!
मी, तेथे वास करी!ध्रु.

परदुःखाने दुःखी होते
परसौख्याने जे सुखावते 
ते मन मंदिर गमते माते हासत तेथ शिरी!१

चैतन्याशी समरस होता
आत्मरूपता सहज पावता
अनुसंधानी संतत राही ते मन प्रिय भारी!२

ऐसा साधक क्षेत्र होतसे
तीर्थ योग्यता त्यास येतसे
मी संन्यासी त्या क्षेत्रीचा  होउनि वास करी!३

झोपेतहि वैराग्य न त्यजते
मनमाहेरी रमते रमते
मम अनुरागी जरी विरागी लावित त्यास उरी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०३.१९७४

(तरी जयाचे चोखटे मानसी
मी होऊन क्षेत्रसंन्यासी
जया निजेलियाते उपासी
वैराग्य गा

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ७४ वर आधारित काव्य).

Sunday, August 13, 2023

रमावे भगवंताच्या ध्यानी!

बसुनिया रम्य शांतशा स्थानी
रमावे भगवंताच्या ध्यानी!ध्रु.

आदरपूर्वक सद्गुरु स्मरता
सारे सात्त्विक भाव उमलता
कोवळीक ये मनी!१

विषयांचा मग नुरेल आठव
यास्तव भगवत्प्रेमा जागव
जाइल अहंभाव विरुनी!२

मुद्दलात हे मनची गेले
स्वरूप ठायी केवळ उरले
सुखद त्या सोऽहंच्या चिंतनी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.०२.१९७४

(जेथ स्मरतेनि आदरे
सबाह्य सात्त्विके भरे
जव काठिण्य विरे
अहंभावाचे
विषयांचा विसरु पडे
इंद्रियांची कसमस मोडे
मनाची घडी घडे
हृदयामाजी

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ५४ वर आधारित काव्य).

Saturday, August 12, 2023

तू देह नव्हेसी जीवा

तू देह नव्हेसी जीवा,
घे ध्यानी घे राजीवा!ध्रु.

परब्रह्म तू, आनंदचि तू
बंधनि गुंतसि कशासाठि तू?
स्वरूप ओळख तुझे मूळचे
भिऊ नकोसी भवा!१

देहोऽहं संकल्प बाधला
दुःखाचा कोसळला घाला
सोऽहं सोऽहं म्हणता म्हणता
मिळशिल जाउनि शिवा!२

झटकुनि टाकी भ्रम देहोऽहम्
ध्यास धरी रे सोऽहं, सोऽहं
अविनाशी, आनंदरूप तू 
जाणशील केधवां?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०२.१९७४

(जैसा किडाळाचा दोषु जाये
तरी पंधरे तेचि होये
तैसे जीवा ब्रह्मत्व आहे
संकल्प लोपी

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ५२ वर आधारित काव्य.)

Wednesday, August 9, 2023

अधिकारी नव्हे!

जो रसनेच्या अंकित झाला
अधिकारी नव्हे! अधिकारी नव्हे!

जो निद्रेने खरीदलेला
अधिकारी नव्हे! अधिकारी नव्हे!

बळे इंद्रियां कोंडतसे तो
अधिकारी नव्हे! अधिकारी नव्हे!

चिंतितसे विषयांस मनी तो
अधिकारी नव्हे! अधिकारी नव्हे!

आत्मचिंतना वेळ न ज्या -
अधिकारी नव्हे! अधिकारी नव्हे!

कंटाळत जो साधनेस तो
अधिकारी नव्हे! अधिकारी नव्हे!

अडचण बघतां धीर सोडि तो
अधिकारी नव्हे! अधिकारी नव्हे!

देहचिंतनी जो गढला तो
अधिकारी नव्हे! अधिकारी नव्हे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०२.१९७४

(जो रसनेंद्रियाचा अंकिला
का निद्रेसी जीवे विकला
तो नाही एथ म्हणितला
अधिकारिया

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ५५ वर आधारित काव्य)

Sunday, August 6, 2023

पाहिजे अभ्यासचि केला!

सोऽहं बोधी स्थिरावयाचे असेल जर तुजला  -
पाहिजे अभ्यासचि केला!ध्रु.

मन पवनाची बांधुनि गाठी
सहज स्मरावा श्रीजगजेठी
विषयांची सुटण्यास संगती
एकांतच चांगला!१

ध्याना बसणे, मौन पाळणे
डोळे मिटणे, आत पाहणे
सोऽहं स्मरणी सहज रंगणे
जमे जया तो भला!२

"तत् त्वम् असि" हे बोल शुभंकर
सुधा वर्षती ते तप्तांवर
कौमुदिने जणु धवळे अंबर-
विस्मय का वाटला?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०२.१९७४

देस भजनी धुमाळी

तू प्राप्तीची चाड वाहसी
परि अभ्यासी दक्षु नव्हसी
ते संग पां काय बिहसी
दुवाडपणा

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ५६ वर आधारित काव्य)

Saturday, August 5, 2023

मन करा रे निर्मळ, तेथे नांदेल गोपाळ!

मन करा रे निर्मळ, तेथे नांदेल गोपाळ!ध्रु.

मन चंचल, चंचल
त्यासी करणे निश्चल
बहिर्मुख ऐसे मन कधी अंतरी वळेल?१

"देह नव्हे मी" हे घोका
देहासक्ती मोठा धोका
सोऽहं बोधाचा अभ्यास गुरुकृपेने साधेल!२

होता मानस प्रशांत 
आत हासे भगवंत
"परमात्मा जो शाश्वत तोच मी" ऐसे कळेल!३

मन ऐसे वश होता
वासनेची नुरे वार्ता
मूळरूप परमात्मा स्वये साधक होईल!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०२.१९७४
यमन कल्याण केरवा

(तया स्वांत:करणजिता
सकळ कामोपशांता
परमात्मापरौता
दुरी नाही

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ५१ वर आधारित काव्य)

Friday, August 4, 2023

नरजन्मा जर यावे! "देहीच विदेही" व्हावे!

नरजन्मा जर यावे! "देहीच विदेही" व्हावे!ध्रु.
 
विश्वाला व्यापुन असले 
जे अंतर्बाह्य विनटले 
दृष्टीस अगोचर ऐसे 
त्वा परब्रह्मची व्हावे!१ 

देहांगे चलन वलन 
परि अखंड अनुसंधान 
मी केवळ आत्माराम हे 
अंत:करणि ठसावे!२ 

आत्यंतिक जो आनंद 
तो शाश्वत आत्मानंद 
सर्व विश्व आपण नटलो 
हे पदोपदी जाणावे!३ 

मग जळी स्थळी भगवंत 
प्रत्येक वस्तुमात्रात 
आपल्याहि अंतर्बाह्य 
अनुभवास ऐसे यावे!४ 

देहाने करि संसार
मनि सारासार विचार 
' तो ' परब्रह्म साकार 
हे प्रतीत सकलां व्हावे!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०४.०२.१९७४
(अथवा आत्मप्रकाशे चोखे 
जो आपणपेचि विश्व देखे 
तो देहेचि परब्रम्ह सुखे 
मानू येईल 
ज्ञानेश्वरीतल्या वरील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ४३ वर आधारित हे काव्य.)

Tuesday, August 1, 2023

मच्छिंद्रनाथ! हा मच्छिंद्रनाथ!

मच्छिंद्रा तू येथुन पुढती
नाम लाव नाथ!
जन गौरविती तुजला प्रेमे
मच्छिंद्रनाथ! हा मच्छिंद्रनाथ!ध्रु.

प्रवास आहे सारा उलटा, बाहेरुन आत
पदोपदी झगडावे लागे, करी दोन हात
वीराच्या आवेशा दाखव, शौर्य देत साथ!१

आदिनाथ जरी नाही बोलत, कौतुक त्या वाटे
अत्रितनय मी तू तनयासम नेत्री नीर लोटे
अकुंठित गती, विशेष रस तुज साऱ्या शास्त्रात!२

भिक्षा नसते भीक मागणे दीक्षा ती आहे
चेला तो तर असे चांगला, पद रोवुन राहे
विशुद्ध जर मन, कामक्रोध ही दुबळे ठरतात!३

मी शिव, मी शिव अशी भावना आवडसी दत्ता
निःस्पृहपण तव, निधडी छाती कौतुक धीमंता
धरेस दे आधार शब्द ना अशक्य तव कोषात!४

मोहाचा करी होम तपस्या स्वार्थाचा अंत
सत्संगाने, सद्गुरुवचने निपजतात संत
अवघा भारत घाल पालथा कसली ना भ्रांत!५

तो देणारा, तू घेणारा ही नामी जोडी
तत्त्वज्ञानी तूहि विरागी जनां तुझी गोडी
उतणे ना मातणे कदापि लाखाची गोष्ट!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०२.२००५

अभिनव मंगलाष्टक



सावधान! सावधान!
शुभमंगल सावधान!ध्रु.

वधूमाता, वधूपिता
वरमाता, वरपिता
मांगल्या आवाहन!१

प्रापंचिक दृढ पाया
देवाची शिरी छाया
मन राखा देत ध्यान!२

नरनारी ही पूरक
उभय कुलां उद्धारक
युगुलाला सूत्र छान!३

उभयांनी येत जात
संसारी हसत गात
गावे नित मधुर गान!४

धर्म अर्थ काम मोक्ष
संतांची हीच साक्ष
उपकारक आत्मज्ञान!५

घेतलीत संधि जशी
पुढिलांना द्यावी तशी
वाढवीत रोप सान!६

सद्गुरू नि कुलदैवत
सूक्ष्मत्वे बघत असत
गौरविणे देत मान!७

हे अष्टक येथ पूर्ण
काढावे न्यून भरुन
साक्षेपे यत्न करुन!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले