Saturday, August 26, 2023

पार्था, येउनि मिळशिल मला!

शपथ घेउनी तुला सांगतो, येउनि मिळशिल मला
पार्था, येउनि मिळशिल मला! ध्रु.

चंचल मानस हे आवरण्या
सोऽहं बोधी हवे राहण्या
बोध वाढता, चित्त स्थिरावे, आनंदचि उरला!१

भगवद्दर्शनि रंगुनि जाता
तू "तो" होशिल बघता बघता
जीवन्मुक्तचि स्वये येउनी मजपाशी पोचला!२

सोऽहं भावी रंगुनि जाता
पटे जिण्याची मग सार्थकता
भगवंतच प्राप्तव्य एक मग ध्यास जरी लागला!३

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०२.१९७४
सारंग भूपाली 

(तू मन बुद्धी साचेसी
जरी माझिया स्वरूपी अर्पिसी
तरी मातेची गा पावसी
हे माझी भाक

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ६५ वर आधारित काव्य).

No comments:

Post a Comment