Friday, August 4, 2023

नरजन्मा जर यावे! "देहीच विदेही" व्हावे!

नरजन्मा जर यावे! "देहीच विदेही" व्हावे!ध्रु.
 
विश्वाला व्यापुन असले 
जे अंतर्बाह्य विनटले 
दृष्टीस अगोचर ऐसे 
त्वा परब्रह्मची व्हावे!१ 

देहांगे चलन वलन 
परि अखंड अनुसंधान 
मी केवळ आत्माराम हे 
अंत:करणि ठसावे!२ 

आत्यंतिक जो आनंद 
तो शाश्वत आत्मानंद 
सर्व विश्व आपण नटलो 
हे पदोपदी जाणावे!३ 

मग जळी स्थळी भगवंत 
प्रत्येक वस्तुमात्रात 
आपल्याहि अंतर्बाह्य 
अनुभवास ऐसे यावे!४ 

देहाने करि संसार
मनि सारासार विचार 
' तो ' परब्रह्म साकार 
हे प्रतीत सकलां व्हावे!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०४.०२.१९७४
(अथवा आत्मप्रकाशे चोखे 
जो आपणपेचि विश्व देखे 
तो देहेचि परब्रम्ह सुखे 
मानू येईल 
ज्ञानेश्वरीतल्या वरील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ४३ वर आधारित हे काव्य.)

No comments:

Post a Comment