Tuesday, October 14, 2025

देवा, घालवि मम अभिमान!

देवा, घालवि मम अभिमान!ध्रु.

'मी कर्ता' ही नसो भावना 
तीतच असती अमित यातना
करुनि घे तव नामाचे गान!१ 

तव इच्छेने ठेव कसा ही 
मजसी बनु दे देहि विदेही 
राखि रे तुजसी अनुसंधान!२

प्रेम वाढु दे नामस्मरणी 
दृढ श्रद्धा दे तुझिया चरणी 
कोण हे तुजविण देइल दान?

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २८८ (१४ ऑक्टोबर) वर आधारित काव्य.

Saturday, October 4, 2025

भगवंताची भेट - सुखाचे हे सुख

भगवंताची भेट - सुखाचे हे सुख
तयाचा वियोग दुःखाचे हे दुःख! ध्रु.
 
जगी नाही सुख 
जगी नाही दुःख 
संयोगि-वियोगी खरे सुख दुःख!१

गुरु कृपावंत 
ब्रह्म दाखवित 
आपली आपणा पटावी ओळख!२

नामाचे स्मरण 
अमोघ साधन 
देव देइ हाती केवढे कौतुक!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २७८ (४ ऑक्टोबर) वर आधारित काव्य.

Friday, October 3, 2025

जावे रामाच्या दर्शना, तर आड येत "मीपणा"!

जावे रामाच्या दर्शना 
तर आड येत "मीपणा"! ध्रु.

अहंकार हा मधला पडदा
दर्शन घडविल कसे मग वदा?
भाकणे रामाची करुणा!१

नाम स्मरता पळती चिंता 
शांति लाभते अशांत चित्ता 
बसावे स्वस्थानी ध्याना!२

जे भोगू ते आनंदाने 
भजन करू ते ओलाव्याने 
राम तो निरसिल अज्ञाना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २७७ (३ ऑक्टोबर) वर आधारित काव्य .

Thursday, October 2, 2025

मी नाही कोठे गेलो

मी नाही कोठे गेलो -
तुमच्याच अंतरी भरलो ! धृ.

जी शिकवण ती मी साई 
मी श्रद्धा सबुरी पाही 
विश्वाला व्यापुनि उरलो!१

मज स्मराल जेव्हा जेव्हा
तुमच्याच जवळ मी तेव्हा
सुमनातुन गंधच झालो!२

हा देह पाच तत्त्वांचा 
कुठवर हा राखायाचा? 
मी श्वासोच्छ्वासी भरलो!३

दिसता कुणि दीन भुकेला 
त्या मुखी घास हो घाला 
तो संतोषच मी झालो!४

सर्वात्मक आपण व्हावे 
तोषूनि जना सुखवावे 
सेवेतच मी दरवळलो !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
११.१०.१९७८ (दसरा)
पहाटे ४। नंतर

कशास वादविवाद? लागला प्रभुनामाचा नाद!

कशास वादविवाद?
लागला प्रभुनामाचा नाद!ध्रु.

श्वासासंगे नाम जुळावे 
अनुसंधानी सुख लाभावे 
उमलता जीवनि ज्ञानप्रभात!१

दुःख सुखावे रामा स्मरता 
ध्यावा राघव उठता बसता
साधता स्वतःशीच संवाद!२

अपणापाशी सुख सापडते
अनुसंधानी सुखे राहते
नाम जणु चिंतामणि हातात!३

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २७३ (२९ सप्टेंबर) वर आधारित काव्य.