रूपे आली गेली, मागे उरे नाम! ध्रु.
नामामागे रूप
येत आपोआप
साधका तू घेई प्रेमें रामनाम!१
रूप जड खूण
नाम सूक्ष्म खूण
सदाचेच राही तुझ्यापाशि नाम!२
नाम हाच देव
ध्यानि घे सदैव
रूपास व्यापुन राहिलेले नाम!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २९६ (२२ ऑक्टोबर) वर आधारित काव्य.
जगतामध्ये सर्व परमात्माच भरलेला आहे असे मानल्यावर जगातील यच्चयावत वस्तूंचे मूलद्रव्य एकच असणार हे ओघानेच आले. शिवाय अनेक रूपे आली आणि गेली तरी ते मूलद्रव्य कायमच राहते. म्हणून भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. रूप जरी जड असले तरी रूपांचे ज्ञान सूक्ष्म असते. भगवंताच्या रूपाचे सर्व ज्ञान त्याच्या नामात साठविले आहे. एक नाम घेतले की त्यामध्ये भगवंताचे समग्र वर्णन येते. नामाच्या मागे रूप आपोआप येते. रूप हे भगवंताची जड खूण आहे तर नाम हे त्याची सूक्ष्म खूण आहे. भगवंताचे नाम घेतले की त्याच्या लीला आठवतील. नाम हे रूपापेक्षा जास्त व्यापक आहे. भगवंताचे नाम घेतले की त्याचे गुण मनासमोर येतात. नाम म्हणजे ईश्वर होय. हे त्याचे नाम तुम्ही आवडीने घ्या व अखंड घ्या व आनंदात राहा.
No comments:
Post a Comment