माझ्या वडीलांना म्हणजे श्री श्रीराम बाळकृष्ण आठवले यांना नुकतीच गीता अभंगात सुचली. आजपासून रोज एक अध्याय या ब्लॉगवर देत आहे
अभंगात गीता रचावीशी वाटे
द्यावे वरदान गजानना ।।१।।
अनुसंधानाने असाध्य ते साधे
सांगे स्वानुभवे तुकाराम ।।२।।
माझे मनपण जावे विलयाला
ठेवितो श्रीराम पदी माथा ।।३।।
सद्गुरु धावला स्वामिराया माझा
पुरवितो स्फुर्ती कानी आले ।।४।।
अध्याय १ : अर्जुनविषादयोग
लढावे की जावे काहीच कळेना
पार्थ पछाडला अज्ञानाने ।।१।।
युद्धाचे कर्तव्य टाळायाला पाही
कारणे ही नाना पुढे करी ।।२।।
मी न लढणार मारोत मला ते
ऐसे वेड्यापरी बरळला ।।३।।
उभे राहवेना धनु पेलवेना
गळाले तयाचे अवसान ।।४।।
अर्जुनाची ऐशी दशा अहंतेने
मायेचा पडदा डोळ्यावर ।।५।।
सूत्रधार कृष्ण याचा खरा अर्थ
मोहपीडिताला कळेचिना ।।६।।
No comments:
Post a Comment