Friday, January 4, 2019

केसरी गर्जून उठला..

शाळेचे मर्यादित क्षेत्र या पुरुषसिंहांना अपुरे पडू लागले. भरतखंडातील ३० कोटी प्रजाजनांना आवाहन करून राष्ट्रप्रेमाने भारून टाकावयाचे होते! एकत्र विचामंथनातून 'केसरी' साप्ताहिक मराठीत आणि 'मराठा' पत्र इंग्रजीत काढण्याचे ठरले. ४ जानेवारी १८८१ पुण्यामधून केसरी गर्जून उठला!

पुच्छ आपटूनि रक्तवर्णदृष्टि फेकितो
'केसरी' च गर्जतो! केसरीच गर्जतो!ध्रु.

पारतंत्र्य फेकण्यास
संघशक्ति जागण्यास
लेखणीस खड्गधार पत्रकार लावतो!१

अग्रक्रम शिक्षणास
अस्मिता फुलावयास
सत्वजागृती करीत दैन्य सर्व झटकतो!२

शासन जर अन्यायी
लढणे न्यायापायी
एक पाय बंदिगृही ठेवुनीच ठाकतो!३

लेख अग्निगोल ते
जळणारे जणु पलिते
घनतिमिरी हा प्रशस्त मार्ग जना दावतो!४

अभिनवा त्रिमूर्तिही
देत स्फूर्ति प्रत्यही
मनामनात तत्क्षणी "देशदेव" जागतो!५

एकजूट ती अभंग
कर्तृत्वा चढत रंग
काळ ठाकुनी क्षणेक विस्मयेच पाहतो!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment