Saturday, January 26, 2019

भारतभूचे अम्ही शिपाई, अम्हांस ठावे पुढे चालणे

भारतभूचे अम्ही शिपाई, अम्हांस ठावे पुढे चालणे
कोण आडवू शकेल आम्हां, गाऊ आम्ही एकच गाणे
उत्साहाने पुढे चालणे!ध्रु.

नव्या युगाचा झडे चौघडा
अन्यायाशी देऊ या लढा
उठा वीर हो निद्रा सोडा
साम्राज्याच्या दुष्ट रुढीला मुळापासुनि पुरे उखडणे
अम्हांस ठावे पुढे चालणे!१

भारतभू तर अमुची माता
शिकवी आम्हा शांती गीता
समता आणि विश्वबंधुता
मंत्र तिचा तो वितरुनि जगती विश्व आपुला निवास करणे
अम्हांस ठावे पुढे चालणे!२

गुलाम नाही कुणी कुणाचा
घोष असे हा स्वातंत्र्याचा
ध्वज उंचावू मानवतेचा
वैफल्याचे बंध तोडुनि आशागगनी स्वैर विहरणे
अम्हांस ठावे पुढे चालणे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११ जानेवारी १९५६

No comments:

Post a Comment