Saturday, January 12, 2019

सौभाग्यासह स्वराज्य द्यावे करुणा कर माते..

शहाजीराजांना दगाबाजीने कैद करण्यात आले ! जणू काही यवनसत्तेने जिजाऊंना सवाल टाकला, बोला काय हवं? स्वराज्य की सौभाग्य?

जिजाऊंनी पदर पसरला हात जोडले, पण हे सर्व आई जगदंबेपुढे! त्यांनी सौभाग्य आणि स्वराज्य दोन्ही मागून घेतली.  कलियुगातील सावित्रीने आपली तपस्याच पणाला लावली जणू!

जगदंबे पसरुनी पदर मी
दान एक मागते
सौभाग्यासह स्वराज्य द्यावे
करुणा कर माते!ध्रु.

घन आषाढी जमुनी भवती
पुनवेच्या चंद्रास ग्रासती
मंगलसूत्रा हात घालती
दूत यमाचे पाश फेकुनी भिववित आम्हांते
सौभाग्यासह स्वराज्य द्यावे
करुणा कर माते!१

तुझाच तान्हा घेउनि सेना
सेवी सज्जना, दंडि दुर्जना
कार्य तुझे हे अतां पावना
धैर्याची दे ढाल, येउ दे अगणित विघ्नाते
सौभाग्यासह स्वराज्य द्यावे
करुणा कर माते!२

लेक लाडकी व्याकुळ झाली
तुझ्याच दारी म्हणुनि तिष्ठली
सर अश्रूंची झरली गाली
सावित्रीच्या निर्धारा दे हसण्या यमधर्माते
सौभाग्यासह स्वराज्य द्यावे
करुणा कर माते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment